हिंजवडी परिसरातील शेतीला अवकाळीचा फटका
सरकारकडून पंचनामे तर सोडाच बळीराजाची विचारपूसही नाही

हिंजवडी परिसरातील शेतीला अवकाळीचा फटका सरकारकडून पंचनामे तर सोडाच बळीराजाची विचारपूसही नाही

बेलाजी पात्रे
हिंजवडी, ता. २१ : आयटी पार्क म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हिंजवडी परिसरातील बळीराजाने आयटीच्या झगमगाटात अद्यापही जमिनी जपल्या आहेत. निष्ठेने जमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीचा फटका बसला आहे. शेकडो एकरावरील शेतीचे मोठे नुकसान होऊनही अद्याप कुठला पंचनामा ना झाला, ना कोणी विचारपूस केली.
अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू ही पिके तर अक्षरक्षः झोपली आहेत. मात्र, आठवडा उलटला तरी अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे बळीराजावर ओढवलेल्या संकटाच्या बाबतीत महसूल प्रशासन किती उदासीन आहे, याची प्रचिती शेतकऱ्यांना येत आहे.
हिंजवडी परसरात आजही शेती हे प्रमुख उत्पन्नापैकी एक साधन असून, हिंजवडीसह लगतच्या ताथवडे, माण, मारुंजी, नेरे, जांबे, पुणावळे, कासारसाई या गावात शेतीत हजारो हेक्टरवर उन्हाळ्यात ज्वारी, बाजरी, गहू, कांदा, लसूण, पालेभाज्या, फळ भाज्या, आंबा, डाळिंब आदी पिके घेतली जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने सर्व पिके भुईसपाट झाली आहेत. परंतु पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
शेतीचे किती नुकसान झाले, याबाबत कृषी खात्याकडून आम्हाला रिपोर्ट येतो. त्यानुसार त्या-त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांची ग्रामस्तरीय समिती पंचनामे करते. आम्हाला याबाबत नुकतीच कृषी खात्याची माहिती प्राप्त झाली असून, पंचनामे करण्याचे परवा आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन-तीन दिवसात पंचनामे संपतील.
- अभय चव्हाण, तहसीलदार मुळशी


आम्हाला तहसीलदारांचे पंचनामे करण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. संप असल्याने पंचनामे करण्यास थोडा विलंब झाला आहे. उद्यापासून पंचनामे केले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे, अशांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून त्यांची तत्काळ पंचनामे करून भरपाई मिळण्यासाठी प्रक्रिया केली जाईल.
- सागर शेलार, गावककामगार तलाठी हिंजवडी


आमच्या हिंजवडी भागातील शेतकरी सधन आणि समाधानी असल्याने तक्रारीचा सूर आळविण्यास कोणालाही फारसे आवडत नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांना शेती हाच पर्याय आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतीचे युद्ध पातळीवर पंचनामे करून, त्यांना भरपाई देणे गरजेचं आहे पण असे होत नाही, याचे वाईट वाटते.
- गणेश साखरे
शेतकरी हिंजवडी


अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे. सरकारच्या घोषणा आणि अधिकाऱ्यांचा असणारा निष्काळजीपणा यामुळे नाराजीची भावना वाढीस लागेल. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी.
- कैलास जाधव
आधुनिक शेतकरी नेरे


फोटो ओळ
हिंजवडी : परिसरातील ज्वारी पिकाचे अवकाळी पावसात झालेले नुकसान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com