प्रश्‍न भुयारी मार्गांचा - भाग १
------------------------

विकासाची उंची वाढली; भुयारी मार्गाची कधी वाढणार?
पुनावळेमध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका

प्रश्‍न भुयारी मार्गांचा - भाग १ ------------------------ विकासाची उंची वाढली; भुयारी मार्गाची कधी वाढणार? पुनावळेमध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका

तपासली आहे
-------------



बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा

लीड
---------
गावपण गेले, पुनावळे स्मार्ट उपनगर झाले. झपाट्याने विस्तारलेल्या या गावात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्यात. लोकांचे राहणीमान उंचावले मात्र, गेल्या तीस वर्षात येथील भुयारी मार्गाची उंची आणि रुंदी मात्र काही केल्या वाढत नाही. अनेक वर्षांपासून हा पूल वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहे. भुयारी मार्गामुळे होणाऱ्या अडचणींची मालिका आजपासून....

------------------------------------------------
हिंजवडी, ता. ४ ः महापालिका प्रशासनातील समन्वयाचा अभाव, एकमेकांकडे बोट दाखविण्याची वृत्ती, चालढकलपणा आणि अधिकाऱ्यांमध्ये नसलेली दूरदृष्टी अन् इच्छाशक्ती यामुळे पुलाची उंची व रस्त्यांची रुंदी इतक्या वर्षात वाढू शकली नाही. परिणामी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुनावळे येथील भुयारी मार्ग अन सेवा रस्ता म्हणजे मोठे अग्नी दिव्य बनले आहे. नव्वदच्या दशकात बनलेला हा पूल सध्या वाहतूक कोंडीचे मूळ आहे.

हिंजवडीजवळ असलेला पुनावळेचा हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. अत्यंत वर्दळ असलेल्या ‘हिंजवडी आयटी पार्क’ मधून पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने रावेत, देहूरोड, प्राधिकरण, चिंचवड आदी भागात जाण्यासाठी आयटीयन्स या मार्गाचा वापर करतात. अनेक मोठाले शोरूम, उच्च शिक्षण देणाऱ्या असंख्य नामंकित शिक्षण संस्था व शाळा या भागात असल्याने हजारो विद्यार्थांची येथे मोठी वर्दळ असते. स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थी, कामगार, नोकरदार, आयटीयन्स या सर्वांना दररोज वाहतूक कोंडीच्या यातनांचा सामना करावा लागतोय. मात्र, याचे अधिकाऱ्यांना गांभीर्य आहे, ना प्रशासनाला ना लोकप्रतिनिधींना.

पहिल्याच पावसात मोठा डोह
पहिल्याच पावसात या पुलाखाली तब्बल पाच-सहा फूट पाणी साचते. पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. थोड्या पावसातच येथे प्रचंड पाणी साचल्याने तासन-तास वाहतूक ठप्प होते. याचा सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो. स्कूल बसमध्ये विद्यार्थी उपाशीपोटी तासनतास अडकून पडतात. अनेकदा परीक्षांना उशीर होतो. अशा वेळी ग्रामस्थ मंडळी, तरुण रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करतात. एवढेच काय तर एका सुजाण ग्रामस्थाने येथील सेवा रस्ता स्व खर्चाने दुरुस्त केला होता. मात्र, अधिकाऱ्यांना काही फरक पडला नाही.


वाहतूक कोंडीला कंटाळून ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यात प्रामुख्याने महापालिका प्रशासनाची चूक आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करुण जनहिताला प्राधान्य दिले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी हा विषय राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीतला आहे, असे सांगून हात झटकलेत. एकंदरीत कोणालाही गांभीर्य नाही.
- चेतन भुजबळ, संचालक, संत तुकाराम सह साखर कारखाना.

महामार्ग आणि महापालिका प्रशासन यांच्यात अनेकदा झालेल्या बैठकात आम्ही महामार्ग प्रशासनाला जागा ताब्यात द्यायच्या आणि त्यांनी रस्ते करायचे याबाबत आमच्यात एकमत झाले आहे. सेवा रस्त्याला समांतर असणाऱ्या आरक्षित रस्त्यासाठी सुमारे ४० टक्के भूसंपादन झाले आहे. काही अतिक्रमणे काढणे बाकी आहेत. त्यावर नगर रचना विभागाचे विकास आराखडा अहवाल (डीपीआर)
बनविण्याचे काम चालू आहे.
- प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता, बीआरटीएस.

महामार्ग अधिकाऱ्यांना गांभीर्य कळेना !

याबाबत महामार्ग प्रशासनाचे धोरण जाणण्यासाठी महामार्ग विभागाचे अधिकारी संजय कदम यांच्याशी १५ वेळा संपर्क साधला. अनेकदा मेसेज केले.
मात्र, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. मात्र; एका कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने हा बाह्यवळण मार्ग अस्तित्वात आला. तेव्हा एवढे शहरीकरण नव्हते. मात्र, रिंगरोड प्रस्तावित आहे. त्यातच शहरीकरणाबरोबर महापालिकेने आम्हाला दोष न देता पर्यायी रस्ते उभारावेत. आम्ही देखील सल्लागार संस्था (कन्सल्टंनसी) नेमली असून, सर्वेक्षण सुरू आहे.’

------------------
आजवर झालेले प्रयत्न -
------------------
१) नितीन गडकरी यांची माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. फलकबाजीद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षावर निशाणा साधला.
२) नितीन गडकरींची संत तुकाराम कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ व पुनावळे ग्रामस्थांनी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, प्रश्‍न तसाच.
३) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे समस्या सोडविण्याची ग्रामस्थांचे साकडे.
४) खासदार श्रीरंग बारणे व आमदार अश्विनी जगताप यांना भेटून माजी नगरसेविका रेखा दर्शले यांच्यासह जांबे, सांगवडे, नेरे, मारुंजी या गावातील सरपंच व ग्रामस्थांनी निवेदन दिले.
५) राष्ट्रवादीचे नेते संदीप पवार यांचा आयआरबीकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा, तीव्र आंदोलनाचाही इशारा.
६) गेल्या महिन्यात आमदार उमा खापरे व अश्विनी जगताप यांची महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा काढण्याची आग्रही मागणी.


--------------------------------------------------
फोटो ः 40845

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com