ताथवडेकर अरुंद भुयारी मार्गामुळे त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताथवडेकर अरुंद भुयारी मार्गामुळे त्रस्त
ताथवडेकर अरुंद भुयारी मार्गामुळे त्रस्त

ताथवडेकर अरुंद भुयारी मार्गामुळे त्रस्त

sakal_logo
By

प्रश्‍न भुयारी मार्गांचा - भाग : २

------------------------------------------
अरुंद भुयारी मार्गामुळे ताथवडेकर त्रस्त
साठणारे सांडपाणी ठरतेय डोकेदुखी, वाहतूक कोंडीत भर

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा

वाकड, ता. १४ : ताथवडे सेवा रस्त्याच्या दुतर्फा मोठे शहरीकरण झाले आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या असंख्य नामंकित शिक्षण संस्था व शाळादेखील या भागात अवतरल्याने हजारो विद्यार्थांची मोठी वर्दळ येथे असते. मात्र, येथील भुयारी पुलाची गेल्या ५-६ वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. सांडपाणी, झिरपणारे व पावसाचे पाणी वारंवार पुलाखाली साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळेच येथील वाहतूक समस्या जटिल बनली आहे.

विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा...
भुयारी मार्ग पुलाजवळ विद्यार्थी, कामगार व रहिवाशांची रोजच जणू सत्व परीक्षाच सुरू असते. वाहनांच्या लांबच लांब रांगामुळे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी-कधी तब्बल एक-दीड तास स्कूल बसमध्ये अडकून पडावं लागतं. काही वेळा हा अनुभव ऐन परीक्षेत येतो. त्यामुळे वाटेतील हे सांडपाणी विद्यार्थ्यांच्याही डोळ्यांत पाणी आणते. नुकत्याच झालेल्या दहावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षार्थींना पेपरपूर्वी रस्त्यातच मोठ्या अग्निपरीक्षेचा सामना करावा लागला तोही तब्बल पंधरा दिवस सलग. परीक्षेला जाताना विद्यार्थी घरून मोठ्या उत्साहाने निघतात. मात्र, हा पूल येताच त्यांच्या आनंदावर विरजण पडते. पेपर बुडण्याच्या भीतीने त्यांची गाळण उडते.

सहनशीलतेचा अंत पहातेय
नाईलाजाने पालक विद्यार्थ्यांच्या हाताला धरून अक्षरश: घाण पाण्यातून वाट काढतात. ही हेळसांड नित्याची बाब आहे. प्रशासन जणू विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ व रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. तर; हा भुयारी पूल सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. ताथवडे चौकात जिल्हा परिषदेची तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आहेत. इंदिरा, ब्लॉसम, अक्षरा, पोतदार, अश्विनी यासह अन्य शाळा व महाविद्यालये आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडून शाळा गाठताना विद्यार्थ्यांची मोठी कसरत होते.


ही समस्या सोडविण्यासाठी मी वारंवार पाठपुरावा केला, आयआरबी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांना याचे गांभीर्य नाही. ते याकडे नेहमीच काणाडोळा करतात. पावसाळ्यात ही समस्यां गंभीर रूप धारण करते. त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना मोठे जनआंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. रास्ता रोको केल्याशिवाय प्रशासनाचे डोळे उघडणार नाहीत.
- संदीप पवार, युवा नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

फलकाद्वारे दुर्लक्षावर निशाणा
या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी नामी शक्कल लढवली होती. त्यांनी रस्त्याच्या चहूबाजूंनी फ्लेक्स लावून, हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करीत आहोत. आपणही करा, असे आवाहन करत एक संकेतस्थळ दिले होते. नागरिकांनी त्यावर तक्रार नोंदवावी. जेणे करून केंद्र सरकारला जाग येईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फोटो ः 03824