
आशियायी कुस्ती स्पर्धेसाठी सोहम मोरेची निवड
हिंजवडी, ता. २१ : जूनमध्ये किर्गिझस्थान (बिस्केक) येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील ग्रीकोरोमन आशियायी चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. यात मारुंजी येथील पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीतील सोहम मोरे याने स्थान मिळवले आहे. ७१ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व तो करणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ निवड चाचणीचे आयोजन अखिल भारतीय कुस्ती महासंघाने पंजाब येथे केले होते. या चाचणी स्पर्धेत देशभरातील विविध वजन गटातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चारशे खेळाडू सहभागी झाले होते तर महाराष्ट्रातून अनेक कुमार खेळाडूंसह सोहम मोरेने ७१ किलो वजन गटात सहभाग घेऊन हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या पहिलवानांना अस्मान दाखवून, भारतीय स्तरावरील महाराष्ट्राच्या कुस्तीचा दबदबा कायम राखला आहे.
सोहम हा कुस्तीगीर रुस्तुम-ए-हिंद पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षांपासून सराव करत आहे. त्याने आजवर राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत. त्याला प्रा. किसन बुचडे, प्रशिक्षक नरेंद्र कुमार, पवन गोरे, विनोद गोरे, प्रा. संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कपिल बुचडे, उत्कर्ष काळे, समीर देसाई, मिलिंद झोडगे, महेश घुले या पहिलवान मंडळींनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ
पै. सोहम मोरे
फोटोः 03882