‘आयटीयन्स’च्या मुळावर मुळेचे दूषित पाणी आरोग्य धोक्यात ः दुर्गंधी सुटलेले दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर नामुष्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयटीयन्स’च्या मुळावर मुळेचे दूषित पाणी
आरोग्य धोक्यात ः दुर्गंधी सुटलेले दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर नामुष्की
‘आयटीयन्स’च्या मुळावर मुळेचे दूषित पाणी आरोग्य धोक्यात ः दुर्गंधी सुटलेले दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर नामुष्की

‘आयटीयन्स’च्या मुळावर मुळेचे दूषित पाणी आरोग्य धोक्यात ः दुर्गंधी सुटलेले दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर नामुष्की

sakal_logo
By

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी, ता. ३ : माहिती तंत्रज्ञानामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या आयटी पार्क हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशांना व स्थानिक नागरिकांवर प्रचंड दुर्गंधी सुटलेले दूषित पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. गावलगतच्या मुळा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह गेल्या काही महिन्यांपासून वाहता नसल्याने साठलेल्या पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आली आहे. डासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
नदीपात्राला हिरवा रंग प्राप्त झाला आहे. ते पाणी पिऊन व रोगराईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जलसृष्टीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नदीपात्रातील रोगराईला आमंत्रण देणारे व पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे हे दूषित पाणी जाण्यासाठी ते वाहते असण्याची गरज आहे. त्यासाठी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा तसेच मुळा नदीलगतची गावे नदीचेच पाणी पितात. त्यामुळे या पाण्याचे ऑडिटदेखील करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंजवडीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य विक्रम साखरे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख व खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे. हिंजवडी येथील ब्ल्यू रिज ही सुमारे दोन हजार सदनिका व दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असलेली प्रचंड मोठी टाऊनशिप या मुळा नदी किनारी वसली आहे. आयटीमुळे प्रचंड डेव्हलपमेंट झाल्याने आजूबाजूला मोठे शहरीकरण झाले आहे. हे सर्व नागरिक याच नदीतील पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी घेतात.

शेतकऱ्यांचा संताप
नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याने विशेष म्हणजे ते शेतीलासुद्धा वापरता येत नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा संताप व्यक्त करत आहेत. पाणी वाहते राहिल्याने स्वच्छ राहील. मात्र, सध्या ते वापरण्या व पिण्यायोग्य राहिले नाही. पावसाळ्यापर्यंत अधून-मधून पाणी सोडल्यास नदी पात्रातील शेवाळ, राडारोडा, जलपर्णी निघून जाईल. दुर्गंधी येणार नाही, असे अनेकांनी मत व्यक्त केले

‘‘मुळा नदी केवळ नावालाच नदी उरली आहे. नदीपात्रातील पाणी वाहते असणे गरजेचे आहे. पाणी साचून राहिल्याने जास्त प्रदूषित होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना, तसेच स्थानिक शेतकऱ्यांना होत आहे. धरणातून पाणी सोडल्यास पाणी वाहते राहील. नदीपात्र स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल. रोगराई नाहीशी होईल व पिण्यायोग्य पाणी मिळेल.
- विक्रम साखरे, माजी सरपंच, विद्यमान सदस्य, हिंजवडी

फोटो ः 03941