
Traffic Jam : आयटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीचा बोजवारा
वाकड : जोरदार अवकाळी पाऊस अन अचानक वाहतूक मार्गात केलेला बदल यामुळे हिंजवडी-वाकड परिसरात गुरुवारी (ता. ४) सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तब्बल तीन तासाहून अधिक काळ आयटीयन्ससह सर्वांनाच कोंडीचा सामना करावा लागला. मग काय आयटीयन्सनीही सोशल मीडियावर गाऱ्हाण्यांचा पाऊस पाडला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वरिष्ठ पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी या रस्त्यांची पाहणी केली. तात्पुरते उपाय करण्यात आले.

सहआयुक्त संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, वाकडचे सहायक निरीक्षक नितीन अंभोरे, हिंजवडीचे गणेश पवार व महापालिका अधिकारी उपस्थित होते. वाकड वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर भूमकर नगर, कस्तुरी चौक, विनोदे नगर या मार्गात एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र हा झालेला बदल त्यात सायंकाळी आयटी सुटण्याच्या वेळेस झालेला जोरदार पाऊस यामुळे जागोजागी रस्त्यात पाणी साठले, भूमकर ब्रिज, हॉटेल टिपटॉप, सयाजी अंडरपास अक्षरश: पाण्याने भरल्याने वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला.
कस्तुरी चौक, विनोदेनगर चौक अन लक्ष्मी चौक रस्त्यावर वाहनांच्या मोठाल्या रांगा लागून प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी केलेल्या बदलामुळे डोळ्यांसमोर घर दिसत असताना घरी पोहचायला तब्बल तासभर वेळ लागतअसल्याची नाराजी व संताप शेकडो रहिवाशांनी व्यक्त केला होता अखेर वाहतूक विभागाने शुक्रवारी यात बदल करून भूमकर चौकात एक लहानसा एक्झिट पॉईंट भूमकर वस्ती, इंडियन ऑईल पंप कस्तुरी व मधूबन चौकाकडे जाण्यासाठी करण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भूमकर वस्ती भुयारी मार्गात पावसात गुडघाभर पाणी साठते. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी निर्धावलेले अधिकारी वर्षभर कुठलीच हालचाल करत नाहीत. असा एखादा मोठा पाऊस झाल्यास पाणी साठून वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला की तात्पुरती मलमपट्टी करून दिखावा करतात. तर हॉटेल टीपटॉप समोर अंडरपास होताना पाण्याचा निचरा होण्याची कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही.
बालेवाडी क्रीडा संकुलासमोर जांभुळकर चौकात व, इंडियन ऑईल चौकात मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू होणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसांत हिंजवडीतील वाहतूक वाकड हद्दीतून वाळवावी लागणार असल्याने ऐनवेळी लोड येऊ नये म्हणून हे प्रयोग सुरू आहेत. सकाळी आम्ही भुयारी मार्गांची आणि रस्त्यांची पाहणी केली आहे. ड्रेनेजचे कामही करण्यात आले आहे. तर भूमकर चौकात नव्याने एक एक्झिट पॉईंट तयार केला आहे.
- डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उपायुक्त
भूमकर चौक, वाकड भुजबळ चौक, पुनावळे आणि ताथवडे या भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होण्याची कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे येथील वाहतूक समस्या सूटणे अवघड आहे. जर महापालिका प्रशासनाने डांगे चौकाच्या धर्तीवर वाकड, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे येथे ग्रेड सेपरेटर उभरले तर समस्या कायमची सुटू शकते.
- राम वाकडकर शहर उपाध्यक्ष भाजपा
एकेरी वाहतूकीमुळे विनोदे नगर , विनोदे वस्ती व येळवंडे नगर परिसरातील सर्वच सोसायटी रहिवाशांना प्रचंड कोंडीचा सामना करावा लागतो आहे . परतीला सर्व गावाला वळसा घेऊन यावे लागते त्यामुळे मुलांना शाळेत सोडणे , ऑफिसला जाणे, भाजी घ्यावयास जाणे व इतर कामे करण्यास प्रचंड त्रास व वेळ वाया जातो. गृहिणीची प्रचंड कसरत होते . एकेरी वाहतुकीचा निर्णय घेताना ह्या परिसरातील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता
- राजीव बिरारी सचिव ओपस ७७ सोसायटी
पोलिसांनी सारासार विचार करून अंमलबजावणी करण्याची गरज आहे शंभर मीटर अंतरावर जाण्यासाठी तब्बल दोन ते तीन किमीचा वळसा मारून जावे लागते त्यात प्रचंड कोंडी असल्याने एवढ्या अंतसाठी एक ते दीड तास लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे प्रायोगिक तत्व सुरू असताना रहिवाशांची मात्र सत्व परीक्षाच सुरू आहे. पोलिसांनी अन्य काही तोडगा काढावा मात्र वाहतूक पूर्ववत करावी.
- बाळासाहेब विनोदे संचालक संत तुकाराम सह कारखाना
चार दिवसांपासुन जो भूमकर चौक ते कस्तुरी चौक आणि विनोदे कॉर्नर ते भूमकर चौक मार्ग एकेरी केल्याने ट्रॅफिक कमी होण्यापेक्षा अधिक वाढली आहे.
नेमके जावे कुठून आणि यावे कुठून? याबाबत नागरिक देखील भ्रमात पडत आहेत. व्यापारी वर्गालाही या कोंडीचा खूप मोठा फटका बसला आहे. वाहतुक कोंडीमुळे रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा उरली नाही.
- एक व्यावसायिक