भोसरीतील विद्युत रोहित्राच्या स्फोटात आजीपाठोपाठ जखमी झालेल्या नातीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

आगीत शंभर टक्के भाजलेल्या आजींचा; तर सत्तर टक्के भाजलेल्या त्यांच्या नातीचा पुण्यातील ससून रुग्णालयात शनिवारी (ता. ५) मृत्यू झाला.

भोसरी : येथील इंद्रायणनगरातील राजवाड्यामधील बिल्डिंग क्रमांक-3 जवळील विद्युत रोहित्राचा शनिवारी (ता. ५) दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला. त्यावेळी लागलेल्या आगीत शंभर टक्के भाजलेल्या आजींचा; तर सत्तर टक्के भाजलेल्या त्यांच्या नातीचा पुण्यातील ससून रुग्णालयात शनिवारी (ता. ५) मृत्यू झाला. तसेच, नव्वद टक्के भाजून गंभीर असलेल्या त्यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महावितरणद्वारे रविवारी (ता. ६)  मृतांच्या कुटुबीयांना प्रत्येकी चार लाखाची मदत जाहीर केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव पाण्याअभावी होतोय 'पाणी-पाणी'

स्फोटामध्ये शारदा दिलीप कोतवाल (वय ५१) व त्यांची पाच महिन्यांची नात शिवन्या सचिन काकडे असे मृत आजी व नातीचे नाव आहे. त्यांची मुलगी हर्षदा सचिन काकडे (वय ३२) यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोतवाल कुटुंबीयांच्या घरापासून अवघ्या दहा फूट अंतरावर विद्युत रोहित्र आहे. शनिवारी शारदा कोतवाल या त्यांची नात शिवन्याला बाहेर ओट्यावर अंघोळ घालत होत्या, तर त्यांची मुलगी हर्षदा शेजारी बसल्या होत्या. नेमका त्याचवेळी अपघात होऊन विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. विद्युत रोहित्रातील तेल हे आगीच्या ज्वाळांसह बाहेर फेकले गेले. हे तेल शारदा, हर्षदा व चिमुरडी शिवान्याच्या अंगावर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार करीत आहेत.

शैक्षणिक संस्थाचालक म्हणतायेत, 'खर्च भागवायचा तरी कसा?' 

पिंपरी महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेता कोण?, राष्ट्रवादीकडून हे पाच जण इच्छुक 

Image may contain: 1 person
शारदा कोतवाल

रोहित्राच्या स्फोटाची चौकशी  

विद्युत रोहित्राच्या स्फोटप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या निरीक्षण अहवालाप्रमाणे महावितरणचे दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच, संबंधित रोहित्र पुरवठादार एजंसीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय महावितरणकडूनही तीन सदस्यीय समिती या स्फोटाची अंतर्गत चौकशी करीत आहे. तसेच, महावितरणकडून संबंधित अधिकाऱ्यांना स्फोटप्रकरणी तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्फोट झालेले विद्युत रोहित्र काही तासांपूर्वीच बसविण्यात आले होते. हे रोहित्र पुरवठा करणाऱ्या एजंसीला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महावितरणने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two death in power blast at bhosari