Hoarding Collapse In Pune : रोहनच्या आयुष्याची ‘रौनक’ गेली

आईसाठी टाहो; होर्डिंगच्या अपघाताने केले उद्‌ध्वस्त
Hoarding Collapse In Pune
Hoarding Collapse In Punesakal

पिंपरी : अनधिकृत होर्डिंग कोसळून मृत्यू झालेल्या पाचही जणांच्या नातेवाइकांनी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाकडे धाव घेत हंबरडा फोडला. ‘दादी के पीछे जनम देणे वाली मॉं एक सहारा थी, ओभी चली गयी’ हा रोहन या तरुणाचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.

रावेत येथे होर्डिंग कोसळून चार महिलांसह एका तरुणाचा मृत्यू झाला. त्या सर्वांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आणले होते. पाठोपाठ मृतांच्या नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. ओळख पटवून व नातेवाइकांना बोलावून पोलिसांनी पंचनामे केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, प्रांत संजय आसवले आदी ‘वायसीएम’मध्ये पोहोचले.

त्यांना नातेवाइकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घेराव घातला. अनधिकृत होर्डिंगप्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पंचवीस लाखांची मदत करण्याची मागणी केली. या बाबत लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रुग्णालय परिसरात रात्री बारानंतरही तणावाचे वातावरण होते.

मृत्यू झालेल्या चारही महिला खासगी संस्थेत सफाई कामगार होत्या. त्यात रोहनची आईही होती. देहूरोड येथे आईसह तो राहात होता. आता आईच गेल्याने जगायचे कशाला असे म्हणत त्याने टाहो फोडला.

मृतदेहांमध्ये रुग्णालयात आलेल्या तरुण विवाहितेच्या सासूचा समावेश होता. तिला पाहताच मृत महिलेच्या नातेवाइकांनी विवाहितेला तेथून जायला सांगितले. ‘तुझ्यामुळेच माझ्या बहिणीला कामाला जावे लागत होते’, असा त्यांचा आक्षेप होता. विवाहितेसोबत आलेल्या महिलांनी तिला गर्दीतून बाजूला केले.

एका मृत महिलेची जाऊ होती. तिच्या अंगावरील मंगळसूत्र एका नातेवाइकाकडे पोलिसांनी दिले होते. ते पाहून रडता रडता जाऊ म्हणाली, ‘अरे कशाला काढले हे. तिला खूप आवडत होते. तिच्यासोबतच ते जाऊ द्या.’ आमदार अश्विनी जगताप यांच्यासह काही माजी नगरसेविकांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली.

उपचाराचा खर्च पालिका करणार

रावेत येथील खासगी रुग्णालयात तीन जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिका करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com