कंपनीच्या प्लॅन्टहेडवर अज्ञातांकडून हल्ला; वडगावातील घटना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

उपचारासाठी सोमाटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वडगाव मावळ (पुणे) :  तळेगाव एमआयडीसी मधील युएमडब्ल्यु डाॅन्गशिन कंपनीचे प्लॅन्टहेड मुथन्ना के. सुबय्या (वय ५७, रा. टाटा हौसिंग सोसायटी, वडगाव मावळ ) यांच्यावर दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हॉकी स्टिकने हल्ला केला.  त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमआयडीसी रस्त्यावरील विशाल लॉन्ससमोर घडली. हल्लेखोर फरार झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबय्या हे गुरुवारी सायंकाळी कंपनीतून घरी चालले होते. विशाल लॉन्ससमोर त्यांच्या मोटारगाडीला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली.

काय झाले हे पाहण्यासाठी ते गाडी थांबवून बाहेर येत असताना दोन मोटारसायकलवरील अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पायावर हॉकी स्टिकने हल्ला केला. पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोर फरार झाले असून, हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unkonwn motorcyclists attack company official at vadgaon maval