esakal | अविवाहित मुलींना मिळेना फॅमिली पेन्शन!
sakal

बोलून बातमी शोधा

अविवाहित मुलींना मिळेना फॅमिली पेन्शन!

विधवा व घटस्फोटीत महिलांनाही करावी लागतेय पायपीट

अविवाहित मुलींना मिळेना फॅमिली पेन्शन!

sakal_logo
By
सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी : ‘‘माझी आई सुमन कुलकर्णीचे निधन झाल्यानंतर वडील दिगंबर कुलकर्णी यांना शिक्षण मंडळातून वारस म्हणून कुटुंब निवृत्ती वेतन (फॅमिली पेन्शन) सुरू झाली. परंतु, वडीलांच्या पश्चात कायद्यानुसार मला कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अविवाहित फॅमिली पेन्शन मिळायला हवी होती. गेल्या तीन वर्षांपासून मी मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा केला. शिक्षण मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, कर्मचारी महासंघ, मिनिस्ट्री ऑफ पी.जी. ॲण्ड पेन्शनर्स वेल्फेअर विभागापर्यंत धाव घेतली. माझ्याप्रमाणेच अनेक महिला हक्काच्या पेन्शनपासून वंचित आहेत,’’ असे चिंचवडगावातील श्रीधरनगरच्या प्रतिभा कुलकर्णी सांगत होत्या. (unmarried girls do not get family pension)

केंद्र सरकारच्या सहा सप्टेंबर २००७ च्या निवृत्ती वेतन विभागाच्या शासन निर्णयानुसार अविवाहित महिलेला उत्पन्नाचे ठोस साधन नसल्यास, तसेच कुटुंबातील मोठ्या हयात असलेल्या अपत्याला हा कायदा लागू होतो. राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार २४ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या मुलीचा विवाह होईपर्यंत हा कायदा लागू आहे. परंतु, केंद्रातील काही तरतुदींचा समावेश राज्य सरकारने या कायद्यात समाविष्ट केलेला नाही. त्यामुळे शासकीय नोकरीत असलेल्या अविवाहित, विधवा व घटस्फोटीत मुलींना फॅमिली पेन्शनसाठी पायपीट करावी लागत आहे. काही अंशी या शासन निर्णयामध्ये बदल करण्याची मागणी समाजातील या पेन्शन लाभापासून वंचित असलेल्या महिलांनी केली आहे. महापालिका नागरी विकास योजना, महिला बाल कल्याण विभाग या योजनेपासूनच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

महापालिका कर्मचारी संघ म्हणतो...

उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यास कुटुंब निवृत्ती वेतन अविवाहित महिलेला मिळते. विवाह झाल्यास प्रमाणपत्राच्या आधारे पुढील निवृत्त वेतन बंद होते. परंतु, कर्मचारी महासंघाने अनेकदा महापालिकेपुढे हा प्रस्ताव ठेवूनही ही बाब विचारात घेतली गेली नाही. कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास अविवाहित महिला हकदार राहावी ही मागणी वर्षानुवर्षे कागदोपत्रीच राहिली आहे.

महापालिका शिक्षण मंडळ म्हणते....

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ सेवानिवृत्ती वेतनानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निवृत्ती वेतन दिले जाते. परंतु, ११६.५. तरतुदीनुसार अविवाहित मुलीस तिच्या २४ व्या वर्षानंतर कुटुंब निवृत्ती वेतन देण्याची तरतूद नाही. परंतु, अविवाहित कन्येला कुटुंब निवृत्ती वेतन देता येते, असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. या निर्णयानुसार कुटुंब निवृत्ती वेतन देता येईल किंवा हा निर्णय धोरणात्मक, आर्थिक बाब असल्याने कायदेशीर बाबींची तपासणी करून अभिप्राय घेणे आवश्यक आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून कळविण्यात येईल.

हेही वाचा: Corona : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५५५ जणांना डिस्चार्ज

‘‘समाजातील कित्येक महिला या पेन्शन लाभापासून वंचित आहेत. समाजात अविवाहित किंवा घटस्फोटित महिलांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. परंतु, कायदे तितके सुसह्य केलेले नाहीत. मूळ वेतनाच्या ३० टक्के रक्कम या योजनेत मिळते. वडिलांचे सेवानिवृत्ती वेतन ६३१० रुपये होते. एक जानेवारी २००६ च्या सुधारित नियमानुसार त्यांना दरमहा कुंटुब निवृत्ती वेतन व महागाई भत्ता मिळून ३७८६ रुपये इतके वेतन शिक्षण मंडळाकडून मान्य करण्यात आले होते.’’

- प्रतिभा कुलकर्णी, वंचित पेन्शन लाभधारक, चिंचवड

loading image