लायसन्ससाठी 'आयडीटीआर'कडून शुल्काचा नाहक भुर्दंड!

सुवर्णा गवारे-नवले 
Thursday, 11 February 2021

  • ट्रॅकचे शंभर व चाचणीसाठी दोनशे रुपयांची आकारणी

पिंपरी : वाहन-चालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेकडून वाहनचालक परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा नाहक भुर्दंड असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चाचणीच्या ट्रॅकचे शंभर व चाचणीसाठीचे दोनशे असे मिळून तीनशे रुपये घेतले जातात. प्रादेशिक परिवहन कार्यालय हे शुल्क घेत नसून आयडीटीआर (इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च) हे शुल्क आकारत आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय परिवहन विभागाने २०११ मध्ये वाहन चाचण्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक कासारवाडीत उभारला आहे. यंत्रणा पूर्ण स्वयंचलित असून, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आलेले आहेत. एका चाचणीसाठी प्रत्येकी अर्धा तास वेळ लागतो. अशा तीन ट्रॅकवर तीन प्रकारच्या चाचण्या होतात. दिवसभर हातात कागदपत्रे घेऊन नागरिक हेलपाटे मारत असल्याचे दिसते. वास्तविक प्रवेशद्वाराजवळच जागा नेमून दिली आहे. मात्र, मैदान मोकळे, शिस्तीचा अभाव व कोणाचेच नियंत्रण नाही.

‘आयडीटीआर’चा गैरकारभार: वाहन चालक परवाना चाचणीच्या काळात असुविधांशी सामना

जड व हलक्‍या दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी शुल्क आकारले जात आहे. कायद्यानुसार आरटीओला शुल्क आकारण्याचे अधिकार नाहीत. तशी तरतूद कायद्यात नाही. परंतु, परवान्यासाठी अर्ज करतानाच उमेदवाराकडून शुल्क घेतले जाते. केंद्र सरकारच्या आयडीटीआर कार्यालयाकडून पैसे आकारले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. चाचणीच्या शुल्काचा उल्लेख संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर नाही. काही दिवसांपूर्वी या शुल्कात वाढ करण्यात येणार होती. त्यावेळी विरोध झाल्याने निर्णय स्थगित करण्यात आला. एकीकडे वाहन प्रशिक्षण व परवाना यासाठी आरटीओ एजंटाकडून प्रचंड शुल्क आकारले जाते. ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडून वेगळे शुल्क. एका परवान्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. हे अन्यायकारक शुल्क बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्किंगसाठीही शुल्क
आयडीटीआरच्या मैदानावर प्रशिक्षण व परवान्यासाठी आलेल्या नागरिकांकडून वाहने लावण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनासाठी १० ते २० रुपये आकारले जात आहेत. शासकीय कार्यालयाच्या आवारात पार्किंगचा भुर्दंड बसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळी आठला वाहन चाचणीसाठी आलो आहे. परवान्यासाठी सहा हजार रुपये ड्रायव्हिंग स्कूलकडे भरले आहेत. त्यात प्रशिक्षण व लायसन्स असे दोन्ही मिळून शुल्क आहे. मी एकट्याने सर्व प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे एजंटाकडून केली. कारण, सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात दाद दिली जात नाही. आपला वेळ वाया जातो.
- हर्षवर्धन दोशी, मार्केट यार्ड, पुणे

मी सकाळी सातला आली असून, सर्व प्रक्रिया संपायला दुपारचे दोन झाले आहेत. दुचाकी व चारचाकी दोन्ही परवान्यांचे काम होते. सोबत दुचाकी आणली होती. चारचाकी आमच्याकडे आहे; पण येथे परवानगी नाही. चाचणीसाठी गाडी येथूनच घ्यावी लागते. चार किंवा पाचच वाहने संस्थेची आहेत. त्यामुळे पूर्ण दिवस गेला. यासाठी नऊशे रुपये खर्च आला आहे.
- सीमरन गील, आळंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unnecessary fee from idtr for license at rto office pimpri chinchwad