लोणावळा : ग्रामसेवकाची बदली रद्द करण्यासाठी वरसोली ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

  • वरसोली ग्रामपंचायतीला टाळे 
  • ग्रामसेवकाची बदली रद्द करून पुनर्नियुक्ती करण्याची मागणी 

लोणावळा : वरसोलीच्या ग्रामसेवकांची बदली रद्द करून त्यांची नियुक्ती कायम करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. 9) ग्रामपंचायतीस टाळे ठोकले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वरसोलीच्या सरपंच सारिका संजय खांडेभराड, जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य महादू उघडे यांच्या नेतृत्वात पंचायतीसमोर आंदोलन केले. उपसरपंच दत्ता खांडेभराड, ग्रामपंचायत सदस्य बबन खरात, अरविंद बालगुडे, विलास चौधरी, मीना शिद, सीता ठोंबरे, अरुणा खांडेभराड, रजनी कुटे, संजय खांडेभराड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सारिका खांडेभराड म्हणाल्या, की पंचायतीच्या तीन वर्षांच्या काळात चार ग्रामसेवकांची बदली झाली. सातत्याने बदली होत असल्याने ग्रामसेवकांना स्थिरावण्यास वेळ लागतो. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत असल्याची तक्रार सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आली. ग्रामस्थांनी कार्यालयास टाळे ठोकत पंचायतीसमोर बैठक मारली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यमान ग्रामसेवक अप्पासाहेब भानवसे चांगले काम करीत असताना त्यांची झालेली बदली रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे केली. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे टाळे काढत आंदोलन स्थगित करण्यात आले. 

कोट्यवधींची कामे मार्गी 

वरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संतुलित योजनेतून पांगोळी येथे रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पैकी ऐंशी लक्ष रुपयांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम रखडले असल्याची माहिती सरपंच सारिका खांडेभराड यांनी दिली. लोकवर्गणीतून आतापर्यंत पन्नास लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. साडेबारा लाख रुपये खर्चून वरसोली स्मशानभूमी, दहा लाख रुपये खर्चून पांगोळी स्मशानभूमीचे काम मार्गी लागले असल्याचे खांडेभराड यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varsoli grampanchayat lock due to avoid transfer of gramsevak