Pimpri Chinchwad News : उद्योगनगरीत विधानसभा मतदारसंघ वाढणार

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन विधेयक २०२३’ लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी २०२९ पासून होणार आहे.
Pimpri Chinchwad City
Pimpri Chinchwad CitySakal

पिंपरी - लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन विधेयक २०२३’ लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी २०२९ पासून होणार आहे. सद्यःस्थितीत नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात येणाऱ्या लोकसंख्येचा वेग सर्वाधिक आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

समाविष्ट गावांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या रहात असून, मतदारांची संख्याही वाढत आहे. याचा विचार करता २०२९ मध्ये शहरात किमान दोन विधानसभा मतदारसंघांची भर पडू शकेल. त्यातील किमान एक मतदारसंघ महिलांसाठी राखीव होऊ शकतो.

मात्र, शहरालगतची पश्चिमेकडील सात आणि उत्तरेकडील १३ ते १५ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची सध्या चर्चा सुरू आहे. यात देहूरोडचाही समावेश आहे. तसे झाल्यास विधानसभा मतदारसंघात आणखी भर पडून कदाचित स्वतंत्र लोकसभा मतदारसंघही शहरासाठी अस्तित्वात येऊ शकतो, अशी स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा झपाट्याने विकास होत आहे. गेल्या ४० वर्षांत शहराचा कायापालट झाला आहे. हिंजवडी आयटी पार्क आल्यानंतर अर्थात गेल्या वीस वर्षांत अमुलाग्र बदल शहरात झाला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांमुळे लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. शिवाय, १९९७ मध्ये १८ गावे समाविष्ट झाली आहेत. पंधरा वर्षांपूर्वी ताथवडेचा समावशे झाला आहे.

इंद्रायणी नदीलगतची धोनारे, चऱ्होली खुर्द, आळंदी, केडगाव, कुरुळी, चिंबळी, मोई, चाकण, मेदनकरवाडी, खराबवाडी, म्हाळुंगे, येलवाडी आणि पश्चिमेकडील माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई, जांबे, नेरे, सांगवडे आदी गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत दहा वर्षांपासून चर्चेत आहेत. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर निर्णय झाल्यास शहराचा विस्तार होऊन लोकसंख्या परिणामी मतदारसंख्याही वाढेल.

सद्यःस्थिती

२००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्यानुसार २००९ मध्ये लोकसभा व विधानसभेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. पिंपरी व चिंचवडचा समावेश मावळ लोकसभा आणि भोसरीचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात झाला आहे. त्यापूर्वी शहराचा काही भाग हवेली आणि काही भाग मुळशी विधानसभा मतदारसंघात होता. त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात शहराचा समावेश होता.

कायदा काय सांगतो

राज्यघटनेच्या कलम १७० नुसार प्रत्येक राज्यात विधानसभा सभागृह अस्तित्वात आहे. त्याची सदस्य संख्या किमान ६० आणि कमाल ५०० ठरवली आहे. लहान राज्यांच्या विधानसभा याला अपवाद आहेत. साधारणपणे किमान ७५ हजार आणि कमाल साडेतीन लाख मतदारांसाठी एक विधानसभा मतदारसंघ असे निश्चित केले आहे. दर वीस वर्षांनी मतदारसंघ पुनर्रचना करावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यानुसार राज्यात सध्या २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

वस्तुस्थिती

२००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघ आहेत. ताथवडे गावाचा समावेश भोर-वेल्हे विधानसभा मतदारसंघात आहे. ३१ मे २०२२ च्या मतदार यादीनुसार तीनही विधानसभा मतदारसंघ आणि ताथवडे गाव मिळून शहरातील मतदारसंख्या १५ लाख ६९३ आहे. चिंचवड मतदारसंघ राज्यातील सर्वाधिक पाच लाख ८६ हजार ८४९ मतदार असलेला मतदारसंघ आहे. त्याखालोखाल भोसरीत पाच लाख २७ हजार ७९९ मतदार आहेत.

वास्तव

सद्यःस्थितीत निवडणूक आयोगातर्फे मतदार पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम शहरात सुरू आहे. त्यात एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांची मतदार नोंदणी केली जात आहे. सद्यःस्थितीत शहरातील १५ लाखांवर मतदारसंख्या ही नियमानुसार किमान चार लाखांनी अधिक आहे. तुलनेने पिंपरी विधानसभा मतदारसंघाची तीन लाख ७६ हजार ४७० मतदारसंख्या कमी आहे. म्हणजेच एक विधानसभा मतदारसंघाला हवी त्यापेक्षा अधिक मतदार शहरात आहेत.

भविष्यात

सध्याची चार लाखांवर अधिकचे मतदार; पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमानंतर वाढणारे मतदार, समाविष्ट गावांत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे होणारी नवीन मतदार नोंदणी यामुळे मतदारांची संख्या आणखी वाढणार आहे. ती किती वाढली हे एक जानेवारी २०२४ रोजी स्पष्ट होईल. नियमानुसार २०२६ नंतर मतदारसंघ पुनर्रचना जाहीर होईल. तोपर्यंत लगतची गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यास शहरातील मतदारसंख्या आणखी वाढेल. परिणामी विधानसभा मतदारसंघही वाढतील.

टीप

  • ताथवडेगावाचा समावेश भोर-वेल्हे विधानसभा मतदारसंघात आहे

  • फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यात आली. त्यानुसार चिंचवडमध्ये ५,६८,९५४ मतदार होते

  • सध्या पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा स्तरावर मतदार पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय ३१ मे २०२२ रोजीचे मतदार

मतदारसंघ / मतदार

चिंचवड - ५,८६,८४९

पिंपरी - ३,७६,४७०

भोसरी - ५,२७,७९९

ताथवडे - ९,५७५

एकूण - १५,००,६९३

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com