अष्टावधानी व्यक्तिमत्त्व

Nana-Kate-with-Ajit-Pawar
Nana-Kate-with-Ajit-Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पिंपरी-चिंचवड शहरावर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणजे अजितदादा पवार. समोर कोणीही असो स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्वभाव आणि तोच मलाही भावला. त्यांच्याकडे कोणीही काम घेऊन जाऊ द्या. मग, त्या वैयक्तिक काम असो किंवा सार्वजनिक. काम होणार असेल तर तोंडावर सांगणार होणार. आणि काम होण्यासारखे नसेल तरी तोंडावरच सांगणार काम होणार नाही, असा दादांचा स्वभाव आहे. पोटात एक आणि ओठात एक, असे ते कधीही वागले नाहीत. उद्योगनगरी असा लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड आज जे दिसते आहे ते दादांमुळेच. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजचा पिंपरी-चिंचवडचा विकास दिसतो आहे. कारण, त्यांच्या कामाची पद्धत वेगळीच आहे. रोखठोक अशी त्यांची भूमिका आणि निर्णयक्षमता आहे. त्यामुळे झटपट निर्णय आणि पटापट कामे, असे जणू समीकरणच झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील सर्वांत कार्यक्षम नेता कोण असेल तर ते अजितदादा. सकाळी सहा वाजता कामाची सुरुवात करीत रात्री एक-दीड वाजेपर्यंत वर्षातील सर्व दिवस सलग काम करण्याची क्षमता असलेला एकही नेता राज्यात सापडणार नाही. प्रचंड प्रवास, दिवसभरात हजारो लोकांना भेटणे, अधिकाऱ्यांच्या सलग बैठका घेणे, एकाच वेळी महाराष्ट्राच्या अर्थ व नियोजन खात्याचा कारभार, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी, बारामती विधानसभा मतदारसंघ, पुणे जिल्हा परिषद, बारामती नगरपालिका, पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राज्य कबड्डी व खो-खो असोसिएशन, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, कित्येक सहकारी संस्था, संघटना यांचे कामकाज...या सर्व आघाड्यांवर एक माणूस काम करतो, कष्ट करतोय.

विशेष म्हणजे प्रत्येक आघाडीवर उत्कृष्ट काम आहे. यातील प्रत्येक विभाग, संस्था, संघटना त्या-त्या क्षेत्रात नंबर एकवरच आहेत. हा आवाका बघून अजितदादांचा हेवा वाटतो. एवढी प्रचंड ऊर्जा घेऊन मीही कामाला सुरुवात करतो. दादांच्या कामाचा झपाटा बघून सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो. ज्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दादांनी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्यासाठी राबतोय. दादांकडे मी एक शक्तिपीठ म्हणून बघतो.

कामाच्या किंवा बैठकांच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात येतो, तेव्हा प्रत्येक वेळेस नवीन ऊर्जा आणि ऊर्मी मिळते. दादा म्हणजे एक ऊर्जेचा स्रोत आहेत. कसल्याही प्रकारचा भेद-भाव (आपला किंवा विरोधक, या मतदारसंघातला किंवा त्या मतदारसंघातला) न करता प्रत्येकाला सुखी ठेवण्यासाठी अखंड तेवत राहतो. 

दादांची कामाची पद्धत, निर्णय म्हणजे "एक घाव दोन तुकडे', हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. "बघतो, सांगतो, करतो ही त्यांची पद्धतच नाही. होणार असेल तर हो आणि ते पण लगेच. नसेल होणार तर जागेवरच नाही. उगाचच कोणाला ताटकळत ठेवायचे काम तिथे नाही. नुकतेच झालेले सारथी संस्थेचेच उदाहरण घ्या. एकाच दिवसात निर्णय घेऊन दोन तासात निधी मंजूर. संबंध मराठा समाजातील तरुणांचा प्रश्‍न एका बैठकीत निकालात काढला. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. 

पिंपरी-चिंचवड महापालिका तर जगाने मान्य केलेले उदाहरण आहे. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी, क्‍लीन सिटी असे केंद्र सरकारचे सर्व पुरस्कार आमच्या सत्तेच्या काळात महापालिकेला मिळाले. पण, आज अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे अधिकारी आणि नागरिक या पुरस्कारांची, कामांची, निर्णय क्षमतेची आवर्जून आठवण काढतात. जुना पुणे-मुंबई रस्त्याच्या दुतर्फा सर्व आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची दुकाने आणि इमारती होत्या.

पक्षातील लोकांचा विरोध असतानाही तो झुगारत रस्त्याचे रुंदीकरण केले. आज रस्ता पाहिल्यावर लक्षात येते, किती दूरदृष्टी असेल. अन्यथा आज त्यासह अन्य रस्त्यांवर ट्रॅफिकची समस्या गंभीर झाली असती. शहरातील हॉस्पिटल्स, उद्याने, सायन्स पार्क, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, स्पोर्टस बाबतीतील सुविधा या सगळ्या त्यांच्या कामाच्या बाबतीतीलच उदाहरणे आहेत. तत्काळ व ठोस निर्णय, ठाम कृती, कामाचा उच्च दर्जा, स्वच्छता, वेळेत काम, किती-किती गोष्टी सांगता येतील. 

दादांचा स्पष्टवक्तेपणा संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आता महापालिका कामगारांच्या सातव्या वेतन आयोगाचाच प्रश्‍न घ्या. सरकारने सातवा आयोग लागू केला होता, पण महापालिका स्तरावर कामगारांना त्या पद्धतीने वेतन मिळत नव्हते. काही कामकाज, तुरळक त्रुटी बाकी होत्या. पण आयुक्तांकडून कार्यवाही होत नव्हती. हा प्रश्‍न मी दादांकडे घेऊन गेलो. चर्चा केली. दादांनी यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली की, "वेतन आयोग निश्‍चित केल्यावर कामगारांना त्यांचे वेतन मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यात अजिबात दिरंगाई नको.' त्यांनी लगेचच आयुक्तांना फोन करून काय अडचणी आहेत? त्या घेऊन भेटायला सांगितले आणि पुढच्या काही दिवसात कामगारांना वेतन सुरू झाले.

असाच दुसरा प्रसंग. माझ्या विरोधी पक्षनेतापदाबाबत. कोणाला विरोधी पक्षनेता कधी करायचे याबाबत त्यांनी पहिल्याचे दिवशी स्पष्ट केले होते. आणि योग्य वेळ येताच त्या-त्या पदाधिकाऱ्यांना बोलावून दादांनी स्पष्ट केले की, "तुझा कार्यकाळ संपला आहे. आता राजीनामा दे' आणि लगेच दुसऱ्या पदाधिकाऱ्याला बोलावून, "उद्यापासून सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करू जबाबदारी घे आणि चांगलं काम कर. लोकांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. अनुभव मिळाला पाहिजे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तो सक्षम झाला पाहिजे,' असे सांगतात. प्रत्येक पदाधिकाऱ्याला शिकण्याची, काम करण्याची संधी योग्य वेळी देणे याकडे दादांचे जाणीवपूर्वक लक्ष असते. माझे समग्र राजकीय जीवन आणि माझ्या पिंपळे सौदागरचा विकास हाच दादांच्या मार्गदर्शनाने व निर्णयाचे फलित आहे. प्रत्येक बैठकीला आणि भेटीत वेगवेगळ्या कामांच्या बाबतीत त्यांचे मार्गदर्शन असतेच. आज तुम्ही कायापालट झालेले पिंपळे सौदागर आणि सभोवतालचा परिसर पाहताय. जगाच्या नामांकित शहरांच्या तोडीसतोड असा परिसर आहे. या परिसरात येऊन राहण्याचे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. हा सर्व दादांच्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनचाच आविष्कार आहे. 

मी कोणतेही विकासाचे काम घेऊन गेलो की दादांनी लगेच तो विषय समजून घेणे. माझी त्या कामामागची तळमळ जाणणे. मग त्या विकासाच्या कामासाठी तत्काळ निधी देणे, अधिकाऱ्यांना सूचना करणे, माझ्याकडून वेळोवेळी कामाच्या प्रगतीची माहिती घेणे, भेटी देणे, काम पूर्णत्वास आल्यावर आवर्जून येणे हे चक्र गेले कित्येक वर्षे चालूच आहे. मी वैयक्तिक आयुष्यासाठी कधीच दादांकडे काही मागितले नाही, जे मागितले ते पिंपळे सौदागरसाठी, या शहरासाठी. तेच माझे राजकीय जीवन आणि त्यामुळे सौदागर आणि शहरात झालेला विकास हाच माझा फायदा. कारण हे शहरच माझं घर आणि कुटुंब आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com