
Public Sidewalks : सार्वजनिक पदपथच दिले चक्क भाडेतत्त्वावर; अतिक्रमण करून लाखोंची कमाई
वाकड/हिंजवडी - आयटी हबमुळे थेरगाव-वाकड या उपनगरांसह हिंजवडी प्रचंड विस्तारली. वाढत्या शहरीकरणामुळे येथील रस्ते वाहनांच्या वर्दळीने ओसंडून वाहत असताना येथील पदपथ देखील अतिक्रमणाने व्यापले आहेत. त्यामुळे नाइलाजाने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. काही ठिकाणी पदपथ चक्क भाड्याने देवून तेथे लाखोंची कमाई केली जात आहे.
महापालिकेने नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून पदपथ उभारले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते गायब झाले असून, ही फुकटचे पदपथ भाड्याने देऊन काहीजण फुकटात मालामाल होत आहेत. वाकड-थेरगाव भागात हा गोरखधंदा तेजीत आहे. अनेक रस्त्यांवरील पदपथावर व्यावसायिकांनी आपले साहित्य टाकून ते अडविले आहे. काहींनी तर पदपथ म्हणजेच जणू त्यांच्या ग्राहकांची अधिकृत पार्किंग असल्याची खात्री दिल्याने वाकड-थेरगावमधील रस्ते आणि पदपथ वाहनांच्या पार्किंगने व्यापले आहेत.
थेरगाव मधील डांगे चौक, १६ नंबर, गुजर नगर, पवार नगर, साईनाथ नगर, थेरगाव गावठाणचा काही भाग, आनंदवन, मंगल नगर, गणेश नगर, शिवकॉलनी यासह विविध भागात पदपथ गायब झाले असून, त्यावर भाजीपाला, फळे, खाद्य विक्रेते, पान टपरी, पंक्चर, खेळणीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. वाकडमधील उत्कर्ष चौक, विनोदेनगर चौक, पिंक सिटी रस्ता, विविध रस्ते व चौक व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे जणू पदपथ मुक्त झाले आहेत.
हिंजवडीत बिकट परिस्थिती
हिंजवडी - हिंजवडीतील प्रमुख रस्तेच अतिक्रमणाने व्यापले आहेत. तिथे पदपथांचा विषयच येत नाही. त्यामुळे वाहनांना होणाऱ्या त्रासासह पादचाऱ्यांची मोठी अग्निपरीक्षा येथे सुरू असते. तरीही गुरुवारी (ता. ११) हिंजवडी वाहतूक पोलिसांनी पदपथ गिळंकृत करणाऱ्या तब्बल शंभर विक्रेत्यांना हटविले आहे. यापूर्वीही अनेकदा एमआयडीसी, स्थानिक पोलिस, ग्रामपंचायत संयुक्त कारवाई करून ही अतिक्रमणे हटवितात. मात्र, लाखोंचे भाडे कमाविण्याची सवय लागल्याने पुन्हा काही दिवसांतच ‘जैसे थे’ परिस्थिती होते.
सातत्याने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे. अशा कारवाईत संबंधित विक्रेत्याचा गाडा, टपरी आणि विक्रीचे साहित्य जप्त केले जाते. काही दिवसांनी विहित दंड आकारून सोडले जाते. परिसर मोठा असल्याने कधी कधी फिरून कारवाई करण्यास थोडा वेळ लागतो.
- अरुण सोनकुसरे, कार्यालयीन अधीक्षक, अतिक्रमण विभाग, ‘ड’ प्रभाग