
ऐन मार्चमध्येच शहरात पाण्याची ओरड; माती मिश्रित पाण्याचा पुरवठा
पिंपरी : खराळवाडी परिसरात गेले अनेक दिवस अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तसेच, महापालिकेच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्याद्वारे बुधवारी (ता. १६) सकाळी मातीमिश्रित गाळ अन् गढूळ पाणी नळाद्वारे आले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. साथीचे व कावीळसारखे आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अचानक सकाळी गढूळ पाणी आल्याने पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी मिसळले गेले. सर्व टाक्या स्वच्छ कराव्या लागणार. पाण्याच्या टाकीचे काम झाल्यानंतर त्यांनी चाचणी करून पाणी सोडणे अपेक्षित होते. सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे जार विकत आणावे लागले याचा खर्च महापालिका देणार आहे का, असे नागरिकांनी सांगितले.
जुनी सांगवीत नळजोड तुटले
जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील पवारनगर गल्ली क्र. २ या भागातील मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे रहिवाशांचे नळजोड तुटल्याने या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागला. मंगळवारी (ता. १५) येथील खोदकाम करत असताना नळजोड तुटले. त्यानंतर काम संपवून खोदकाम केलेल्या ठिकाणी राडारोडा व मातीने खोदकाम बुजविण्यात आले.मात्र नळजोड तुटल्याचे मलनिस्सारण विभागाच्या लक्षात आले नाही.
नळाला पाणी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी नंतर येथील खोदकामात नळ जोड तुटल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर येथे पर्यायी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून तत्काळ येथील दुरुस्ती करण्यात आली आहे. दापोडी येथे अनेक भागात लिकेजमुळे नागरिकांना गढूळ पाण्याच्या तक्रारी आल्याने पाणी पुरवठा विभागाकडून या परिसरात अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
चाकण एमआयडीसीमध्ये तीन दिवस निर्जळी
तळेगाव स्टेशन : तळेगाव एमआयडीसीच्या पंपहाउसमध्ये आठवडाभरात दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातही तीन दिवस निर्जळी अनुभवावी लागली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याविना बहुतांश लघुउद्योजकांचे हाल झाले.
मावळातील नवलाख उंबरे येथील तळेगाव एमआयडीसीच्या ८० दशलक्ष प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आंद्रा धरणातून पाणी उपसा करून तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. या पंप हाऊसमधील इलेक्ट्रिकल पॅनेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या रविवारी आणि सोमवारी तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. सोमवारी तो पूर्ववत झाल्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा तसाच बिघाड झाल्याने चाकण एमआयडीसीत बुधवारी (ता. १६) पुन्हा निर्जळी जाणवली.
‘पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन’
पिंपरी : विशालनगर-पिंपळे निलख भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेस समितीचे सचिव सचिन साठे यांनी इशारा दिला.
बुधवारी सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलखमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माजी पोलिस पाटील भुलेश्वर नांदगुडे, विजय जगताप, भरत इंगवले, संजय बालवडकर, अनंत कुंभार, काळुराम नांदगुडे, संजय पटेल आणि अनिल संचेती आदी उपस्थित होते.आयुक्त पाटील यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये बहुतांशी सर्वच भागात कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. विशेषतः पिंपळे निलख आणि विशालनगर भागात हि समस्या तीव्र आहे. वेळी अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने विनाकारण सोसायटी आणि चाळीमधील नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.
नवीन पाइपलाइनचे काम सुरू होते. चाचणी अर्ध्या तासासाठी घेतली. पाण्यातील वेळापत्रकाची नियोजित वेळ नव्हती. अर्धा तास पाणी सुरू ठेवले होते. त्यादरम्यान ही अडचण झाली आहे. काही अंशी गढूळ पाणी आले आहे.
- किरण आंदुरे, उपअभियंता, क प्रभाग
या भागातील काही कनेक्शन तुटल्याने नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.
- एल. ए. वायाळ,अभियंता पाणीपुरवठा, जुनी सांगवी
‘‘पाण्याची नवीन टाकी केली असल्याने त्यातून दूषित पाणी पुरवठा झाला आहे. पाण्याच्या टाकीत माती राहिल्याने ती पाण्यात मिसळली गेली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्युरिफायर मशिनमध्ये माती व खडे गेल्याने मशिनमध्ये बिघाड झाला आहे. महापालिका ‘क’ प्रभाग पाणीपुरवठा उपअभियंता किरण आंदुरे व कनिष्ठ अभियंता विपिन थोरमाटे यांना याबाबत तक्रार दिली आहे.
- मोहन बाबर, खराळवाडी
दापोडी येथील अकरा नं. बसस्टॉप परिसर, एस.टी. रोड, नरवीर तानाजी मालुसरे चौक येथे तत्काळ दुरुस्तीची कामे करून घेण्यात आली आहेत.
- रोहित काटे, नगरसेवक
घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी हे पाणी पिऊ नये. सर्व नागरिकांनी घरात पिण्याचे शुद्धिपात्र बसवावे. योग्य ती खबरदारी घेऊनच पिण्याच्या पाण्याचा वापर करावा. मात्र, या घटनेमुळे परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. यापुढे नियमित व शुद्ध पाणी यावे ही विनंती आहे.
- अभिजित डिसूझा, स्थानिक नागरिक, खराळवाडी
Web Title: Water Crisis City In March Soil Mixed Water Supply Pcmc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..