#PuneRains : भोसरीतील अडीचशे घरांमध्ये शिरले पाणी; रहिवाशांनी रात्र काढली जागून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

मुसळधार पावसामुळे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर वडमुखवाडी, चर्होली आदी भागातील रस्त्यांवर पाणी साचले. बालाजीनगर झोपडपट्टीतील सुमारे अडीचशे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

भोसरी : "माझ्या साडेतेरा वर्षांच्या कार्यकाळात दीड-दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पहिल्यांदाच पाहिले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात कॉल आले. मात्र, सर्वच ठिकाणी जाणे शक्य नसल्याने मुख्य अग्निशमन दलाचीही मदत घ्यावी लागली. भोसरी गावठाणातील लोंढे आळीतील दहा घरांमध्ये पाच फुटापर्यंत पाणी शिरले होते. तेथून नागरिकांना बाहेर काढताना कसरत करावी लागली," असे भोसरी अग्निशमन दलाचे फायरमन बाळासाहेब वैद्य सांगत होते.

#PuneRains : पिंपरी-चिंचवडमधील रस्ते पाण्याखाली, घरांमध्येही शिरले पाणी

#PuneRains : मुसळधार पावसानं शेत नेलं वाहून, चऱ्होलीत भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान 

बुधवारी (ता. 14) रात्री आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर वडमुखवाडी, चर्होली आदी भागातील रस्त्यांवर पाणी साचले. बालाजीनगर झोपडपट्टीतील सुमारे अडीचशे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे अन्नधान्य, विद्युत उपकरणे, लाकडी फर्निचर आदींसह इतर वस्तूंचे नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सरवदे सांगत होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये दुचाकी अडकून पडल्या. विजेच्या कडकडाटासह मुसळधार झालेल्या पावसाने परिसरातील नागरिक, ग्राहक, दुकानदार यांची पळापळ झाली.

Image may contain: tree, sky and outdoor

या भागात शिरले पाणी

 • बालाजीनगर झोपडपट्टी : २५० झोपड्या
 • भोसरी गावठाण लोंढेआळी : १० घर
 • दिघी भारत मातानगर सहकार कॉलनी क्रमांक : १-४ घरे
 • चक्रपाणी वसाहत, पांडवनगर, पूर्णा कॉलनी : ५ घरे 
 • रस्त्यावरही पाणीच पाणी...

भोसरी

 • गंगोत्री पार्क सिएमई भिंतीजवळील वळण
 • चक्रपाणी वसाहत रस्ता
 • गावठाणातील बापूजी बुवा चौक
 • पीसीएमसी चौक
 • गव्हाणे वस्तीतील महात्मा फुले शाळेसमोर
 • लांडेवाडीतील महिंद्रा सीआयई कंपनीसमोर
 • आदिनाथ नगरातील रामनगर सोसायटीजवळ
 • गंगोत्री पार्कमधील बंसल सिटी जवळील स्ट्रॉंम वाटर लाईनचे चेंबर ओवरफ्लो होऊन पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते

दिघी

 • पुणे-आळंदी रस्त्यावरील जुना जकात नाक्याजवळ
 • सह्याद्री कॉलनी क्रमांक 3
 • छत्रपती संभाजी महाराज चौकातून विठ्ठल मंदिराकडे जाणारा रस्ता
 • मॅक्झिन चौक

 इंद्रायणीनगर

 • संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलसमोर
 • यशवंतराव चव्हाण चौक
 • इंद्रायणी कॉर्नर वजन काटासमोर 
 • संतनगर चौक बस स्थानकाजवळ

वडमुखवाडी

 • दिघी पोलिस ठाण्यात समोरील ग्रेड सेपरेटर

बालाजीनगर महावितरणच्या सीमा भिंती खालून घरात पाणी शिरले. रात्र जागून काढावी लागली.

- सुलताना तांबोळी, बालाजीनगर झोपडपट्टी

घरातील स्टाईल फरशी खालून आणि इतरही भागातून पाणी घरात शिरले. घरातील अन्नधान्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले.

- लक्ष्मी वाकचौरे, बालाजी नगर झोपडपट्टी 

पहाटे दीड वाजेपर्यंत पाणी काढले, मात्र...

बालाजीनगर झोपडपट्टीतील सिद्धार्थ दिनेश तायडे (वय 28) यांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले. तायडे हे पहाटे दीड वाजेपर्यंत घरातील साचलेले पाणी काढत होते. त्यांनी घरात थमगनीचा कोबा करण्याचे काम काढले होते. त्याची डच व सिमेंट घरातच होते. पाणी काढून थकल्यावर ते ओल्या डचवर झोपले आणि त्यातच त्यांना मृत्यूने गाठले. ही घटना पहाटे उघडकीस आली. घरात साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. 

मध्यरात्रीपासून वीज गायब

भोसरीतील इंद्राणीनगरातील नाना-नानी पार्क, पेठ क्रमांक दोनमधील निसर्ग कॉलनी आदी भागातील वीजपुरवठा मध्यरात्रीपासून खंडित होता. लांडेवाडी झोपडपट्टीतील रात्री खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी सुरळीत झाला.

गुरुवारी (ता. 15) पहाटे पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

सीईटी परीक्षेस जाताना विद्यार्थ्यांची कसरत

गुरुवारी (ता. 15) एमएचटी-सीईटीची परीक्षा होती. परीक्षा केंद्राने सकाळी सात वाजता केंद्रावर रिपोर्टींग करायचे सांगितले होते. मात्र, झालेल्या पावसामुळे आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात नेण्यास पालकांना कसरत करावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water seeps into 250 houses in bhosari