
Weather Update : विजेच्या कडकडाटासह तळेगावात अवकाळी पावसाची हजेरी
तळेगाव स्टेशन : दुपारी चार वाजल्यापासून ढग दाटून आल्यानंतर सोमवारी (ता.०६) सायंकाळी सहाच्या दरम्यान तळेगावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे पेटलेल्या होळ्या पाण्याचा शिडकावा होऊन विझल्या.
पावसामुळे तळेगाव,स्टेशन,माळवाडी,सोमाटणे परिसरातील रस्ते जलमय झाले होते.अचानक आलेल्या पावसामुळे होळी,धुळवडीचे साहित्य विक्रीसाठी स्टॉल लावलेल्या व्यावसायिकांची धांदल उडाली.
वडगावसह मावळ तालुक्याच्या विविध भागात सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. ऐन होळी पेटविण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने बाळगोपाळांच्या आनंदावर विरजण पडले.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. आकाशात पावसाची चिन्हे मात्र दिसत नव्हती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले व मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. होळीचा सण असल्याने सकाळ पासूनच बाळ गोपाळांची होळीच्या तयारीची लगबग सुरू होती. ठिकठिकाणी होळ्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र त्या पेटविण्याच्या वेळेतच मुसळधार पाऊस झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.