पथारी धारकांच्या मुखातला घास हिरावून काय साध्य केलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथारी धारकांच्या मुखातला घास हिरावून काय साध्य केलं?

पथारी धारकांच्या मुखातला घास हिरावून काय साध्य केलं?

पिंपरी ः मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या पथारीधारक गोरगरीब कष्टकरी यांवर अन्यायकारक कारवाई केली. त्यांच्या मुखातील घास हिरावून घेतला. ज्या जागेवर हे व्यावसायिक तीन फूट जागेमध्ये व्यवसाय बसत होते त्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी गाड्या लागल्या होत्या. मग पथारीधारकांनी व्यवसाय केला असता तर काय बिघडले असते? असा संतप्त सवाल टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे.

मंदिरे सुमारे दीड वर्षांनी सुरू झाली. त्यामुळे पथारी व्यावसायिक खुश होते. पहिलीच अंगारक संकष्टी असल्याने कटलरी, खेळणी साहित्य, फुल भंडार व इतर विविध साहित्य मंदिर परिसरामध्ये मंगळवारी आले. परंतु पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांचे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे फेरीवाल रडकुंडीला आले होते.

यावर संतप्त झालेले कांबळे म्हणाले, ‘‘हात मोकळे घेऊन घरी गेलेल्या अनेक गोरगरीब घटकांची दुसऱ्या दिवशी घरामध्ये चूल पेटली नाही. त्यांच्या मुलांनी दोन घास देखील आज खाल्ले नाहीत. घरामध्ये स्मशान शांतता पसरली. त्यांच्या मुखातील घास कोणी हिरावला? दोन घास सुखाने मिळवण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या घटकांवर कोणी अन्याय केला? महापालिका आयुक्तांकडे कोणी तक्रार केली?

हेही वाचा: ST STRIKE: विलिनीकरणाला नकार, पगारवाढीचा प्रस्ताव

चतुर्थी निमित्ताने महिन्यातून एकदा ही सर्व मंडळी मंदिरासमोर आपले साहित्य विकून कुटुंबाच्या पोटाची खळगी भागवतात. ज्या तीन फुटाच्या जागांमध्ये सर्वजण व्यवसाय करतात, तेथे दडपशाही दादागिरी करून तुम्ही चारचाकी व दुचाकी वाहने लावण्यास परवानगी दिली. परंतु व्यवसाय करण्यास परवानगी नाही दिली. हा अन्याय अत्याचार कशाचं द्योतक आहे? बारा बलुतेदार बहुजनसमाज कष्टकरी वर्गातील ही माणसं कोणाला नको आहेत? या प्रश्नाचे उत्तर समोर आलेच पाहिजे. या मंदिराजवळ वर्षानुवर्षे यात्रेनिमित्त, चतुर्थीनिमित्त येणारे छोटे पथारी धारक विक्रेते, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. कारवाईवर चर्चा झाली पाहिजे. खरे कोण खोटे ते जनतेसमोर आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

loading image
go to top