
विविध महिला बचत गटांतील महिलांसाठी हळदी-कुंकू व मार्गदर्शन मेळावा शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना. खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या.
Hinjewadi News : आयटीतील महिलांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे - खा. सुप्रिया सुळे
हिंजवडी - हिंजवडी-माण व परिसरात वसलेल्या जगप्रसिद्ध आयटी हबच्या संधीचा बाजारपेठ म्हणून योग्य फायदा घेऊन आयटी कंपन्या, परिसरातील विविध उच्चभ्रू सोसायट्या व मॉल्सना बचत गटांच्या माध्यमातून विविध पूरक सेवा पुरवून पंचक्रोशितील महिलांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील हळदी-कुंकू समारंभात महिलांना केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे यांनी पंचक्रोशितील विविध महिला बचत गटांतील महिलांसाठी हळदी-कुंकू व मार्गदर्शन मेळावा शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना. त्या बोलत होत्या. सुळे पुढे म्हणाल्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला आयटी कंपन्या, रिलायन्स-डी मार्टसारखे अनेक मॉल्स, विविध सोसायट्या म्हणजे हक्काची बाजारपेठ होय. या संधीचा योग्य फायदा घेत ग्राहकांच्या गरजा ओळखून महिलांनी योग्य व्यवस्थापन व स्मार्ट मार्केटींगद्वारे स्वतःला सिद्ध करावे.
यावेळी पीडिसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, मुळशीच्या माजी सभापती कोमल साखरे, राधिका कोंढरे, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा चंदा केदारी,आयटीचे सरपंच सचिन जांभुळकर, उपसरपंच ऐश्वर्या वाघमारे, माजी सरपंच रोहिणी साखरे, दीपाली जाधव, पूनम बुचडे, मीना मांडेकर, निकिता रानवडे, रुपाली बोडके व परिसरातील विविध महिला बचत गटांच्या अध्यक्षा व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भोर-वेल्हा-मुळशीचे युवा नेते सुरेश हुलावळे यांनी संयोजन केले. संदीप जाधव व समीर बुचडे यांनी सुत्रसंचालन केले. स्वाती हुलावळे यांनी आभार मानले.
तुम्हा ग्रामस्थांचा सर्वस्वी निर्णय
स्वाती हुलावळे यांनी हिंजवडीतील रस्ते, पाणी व घनकचरा समस्येबाबत गाऱ्हाणे घालत हिंजवडी पंचक्रोशितील गावे महापालिकेत जावी अथवा स्वतंत्र नगरपरिषद व्हावी याबाबत नागरिकांत प्रचंड संभ्रम असून याबाबत आपले काय मत आहे असा सवाल त्यांनी केला असता सुळे म्हणाल्या. आयटीतील गावांचा नियोजनबद्ध व सर्वांगिण विकास साधण्यासाठी महापालिकेचे बजेट मोठे असल्याने महापालिकेस प्राधान्य द्यावे हे माझे व्यक्तिगत मत आहे. मात्र, आपल्याला काय योग्य वाटते हे ठरविण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांची एकत्र बैठक घेऊन तुमचा प्रस्ताव शाषनाला पाठवा असे त्यांनी सांगितले.