खाकीतील 'दुर्गा'ची धाडसी कामगिरी; बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला केले जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saraswati Kale

बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पोलिस महिलेने पिस्तुलासह जेरबंद केले. आरोपींकडून तीन जिवंत काडतुसेही जप्त केली.

खाकीतील 'दुर्गा'ची धाडसी कामगिरी; बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला केले जेरबंद

पिंपरी - बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पोलिस महिलेने पिस्तुलासह जेरबंद केले. आरोपींकडून तीन जिवंत काडतुसेही जप्त केली. खाकीतील 'दुर्गा'ने दाखविल्या या धाडसी कामगिरीबाबत पोलिस आयुक्तांनी त्यांना बक्षीस देत कौतुक केले.

सरस्वती काळे असे या धाडसी महिला पोलिसाचे नाव आहे. त्या निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

तर प्रमोद नामदेव चांदणे, जयदीप मधुकर चव्हाण, संतोष अभिमान चोथवे ( रा. मोरे वस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. आकुर्डीतील हिंदुस्थान पेट्रोलियम या पंपावर अमोल राजाभाऊ चौधरी हे कामाला आहेत. त्यांच्याकडे पेट्रोल पंपावरील जमा झालेली बारा लाखांची रक्कम भरण्यासाठी ते सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास आकुर्डीतील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आले होते. ते बँकेच्या पायऱ्या चढत असतानाच चांदणे याने त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी तेथे असलेल्या महिला पोलिस काळे यांनी त्याला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व चार जिवंत कडतुस सापडले. या घटनेची माहिती काळे यांनी वरिष्ठांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चांदणे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे सांगितली.

तसेच बँकेवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचीही त्याने कबुली दिली. त्यानंतर इतरही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पोलिस आयुक्तांकडून कौतुक

काळे यांनी दाखविलेल्या धाडसी कामगिरीबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांना दहा हजारांचे बक्षीस देत कौतुक केले.