स्वस्त घरांसाठी पिंपरीत कष्टकऱ्यांचे भरपावसात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात आकुर्डी कार्यालयासमोर आंदोलन केले. 

पिंपरी  : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून गेल्या चार वर्षापासून पेठ क्रमांक 30 आणि 32 याठिकाणी गृहप्रकल्पाचे काम रखडले आहेत. प्रत्यक्षात काम दिखाऊपणा आणि चालढकल केली जात आहे. याविरोधात कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात आकुर्डी कार्यालयासमोर आंदोलन केले. 

या आंदोलनात अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, दादा खताळ, सुरेश देडे, मनीषा राऊत, महिला विभागाच्या माधुरी जलमुलवार, वंदना थोरात, अर्चना कांबळे, सुमन अहिरे, राजेश बोराडे, इरफान चौधरी, अमृत माने, उमेश डोर्ले, वृषाली पाटणे, अनिल बारवकर, छाया येडगे, उषा भिसे आदींनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी, फलक हातामध्ये घेऊन घोषणा दिल्या. 

नखाते म्हणाले,""प्राधिकरणाकडून सुमारे वीस वर्षांमध्ये एकही प्रकल्प झाला नाही. परिणामी सर्वसामान्यांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पामध्ये एप्रिल महिन्यामध्ये केवळ अर्थसंकल्पामध्ये मोठ्या आर्थिक तरतुदीच्या घोषणा केली जाते. मात्र घरांची योजना प्रत्यक्षात येत नाही. पेठ क्रमांक 12 येथे होत असलेल्या 4 हजार 883 सदनिका निर्माण करण्यात येत आहेत. मात्र येथील काम सुद्धा धीम्या गतीने सुरू असून नागरिकांनी बांधलेली घर अधिकृत करण्याची केवळ घोषणा करण्यात आली. अजूनही घरे अधिकृत करण्यात आले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न करावेत. प्राधिकरणाकडून गरिबांना परवडणारे सुमारे 15 हजार घरांची निर्मिती करावी व सध्या सुरू असलेल्या गृह प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावेत आणि प्राधिकरण क्षेत्रातील पथ विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची निर्मिती करावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी व कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी घरांच्या बाबतीत असलेल्या त्रुटी दूर करून बांधकाम जलद करण्यासाठी आदेश देऊ आणि हॉकर्स झोनबाबत ही सकारात्मक विचार करू, असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी गवळी यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers' compensation agitation for affordable housing