काय सांगता! परप्रांतीय कामगारांना चक्क विमान तिकिटांची भेट

अविनाश म्हाकवेकर
Sunday, 27 September 2020

  • दर आठवड्याला असे तीन-चार हजार कामगार परतत आहेत.

पिंपरी : एकदातरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते. अनेकांचे शेवटपर्यंत हे स्वप्नच राहते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या परप्रांतीयांचे नशीब चांगलेच फळफळले आहे. कारण त्यांना कामासाठी विमानातून आणले जात आहे. दर आठवड्याला असे तीन-चार हजार कामगार परतत आहेत. दसरा-दिवाळीचा मुहूर्त असल्याने या कामगारांना सन्मान आणि अधिक मजुरी मिळू लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनमुळे पोटाचा प्रश्‍न उभा राहिला. परराज्यातील कामगारांचे जथ्ये पायीच परतायला लागले. पोराबाळांना काखोटीला मारून लोक उन्हातान्हात चालतानाची हृदयद्रावक दृश्‍ये दिसत होती. नंतर खास रेल्वे गाड्या सुरू केल्या. त्यासाठीही तोबा गर्दी. मोठ्या संख्येने निघालेल्या या लोकांमुळे बांधकाम क्षेत्र पूर्ण हबकले. राहण्याची, जेवणाची सोय असूनही लोक थांबायला तयार नव्हते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जुलैअखेरपासून बंधने शिथिल झाली. ऑगस्टपासून थोडे पूर्ववत व्हायला सुरू झाली. सप्टेंबरमध्ये सर्वकाही खुले झाले. आता बांधकाम व्यावसायिक कामगारांच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत. शहरात किती कामगार काम करत होते किंवा किती लोक गावी गेले, याचा आकडा कोणाकडेच नाही. मात्र, केवळ बांधकाम या क्षेत्राचा अंदाज घेतल्यास चार लाख लोक आहेत. झारखंड, बिहार, ओरिसा, छत्तीसगड, आसाम, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमधील हे लोक भीतीपोटी तिकडे गेले. मात्र, तिकडेही त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांनाही महाराष्ट्रात परत यायचे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामगारांना आरामबसमधून आणले

येथील प्रायमल होम प्रकल्पाचे ठेकेदार रणजित बनकर म्हणाले, ‘‘लॉकडाउनमधील दोन महिने आम्ही या लोकांना सांभाळले. मात्र, रेल्वे सुरू झाल्यानंतर ते न सांगताच रात्रीत पळून गेले. त्यांनी आमच्याकडून आधी उचल रक्कमा घेतल्या होत्या. त्यामुळे आमचे नुकसान झाले. आता त्यांना परत बोलवायला लागलो; तर प्रवासाला, खर्चाला पैसे पाठवा म्हणायला लागले. तेही आम्ही दिले. दरम्यान, रेल्वे पुन्हा बंद झाल्या. आम्ही इकडून दिलेले पैसे त्यांनी खर्च केले. मात्र, ते स्कील्ड वर्कर असल्याने त्यांना कोलकतामधील डमडम विमानतळावरून पुण्यात घेऊन आलो. काही लोकांना आराम बसमधून आणले.’’

ठेकेदारामागे लकडा

बांधकाम क्षेत्र आता स्थिरावले आहे. गेल्या सहा महिन्यांतील नुकसान तातडीने भरून काढायचे आहे. मात्र, त्यांना स्थानिक किंवा महाराष्ट्रीयन कामगारांवर अवलंबून राहता येत नाही. कारण अधिक श्रमाची मानसिकता त्यांची नाही. त्यामुळे साऱ्यांना परप्रांतीय कामगार हवे आहेत. या कामगारांची मोट बांधणारा एक ठेकेदार असतो. तो त्यांना कामांची देतो. त्यामुळे आता या ठेकेदारांना अधिक भाव आला आहे. कारण कोणत्याही उद्योजक, व्यावसायिकांचा या कामगारांशी थेट संपर्क नसतो. साहजिकच या कामगारांना परत आणण्यासाठी सर्वजण ठेकेदारांच्या पाठीशी लागले आहेत. ज्यांच्याकडे अधिक काम आहे आणि केवळ परप्रांतीयांमुळे थांबले आहे, अशा अनेकांनी बहुतांश कामगारांना विमानातून आणण्यास सुरूवात केली आहे.

म्हणून घेतला निर्णय

बांधकाम क्षेत्रातील सिल्व्हर ग्रुपचे संचालक संतोष बारणे यांनी काही दिवसांपूर्वी विमानातून ४५ कामगार आणले. याबाबत ते म्हणाले, ‘‘या कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे कौशल्याची आणि अधिक श्रमाची, जोखमीची कामे करतात. पंधराव्या, सतराव्या मजल्यापर्यंत चढून काम करण्यात मोठे धाडस लागते. आठ तासांची शिफ्ट झाली की मी निघालो, आठवड्याची सुटी, काम टाळण्याचे अनेक बहाणे असले काही त्यांच्याजवळ नसते. त्यामुळे त्यांच्यावर अधिक खर्च झाला तरी परवडते. कारण काम वेळेत व अचूक पूर्ण होणार याची खात्री असते. आमचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे आले आहेत. मार्केटही चांगले आहे. त्यामुळे विमानाची तिकिटे पाठवून त्यांना घेऊन आलो.

Image may contain: text that says 'यांनी आणले कामगार २०० २५ २५ ६० यशदा ए. व्ही. साई हूइंडस्ट्रीयल रिअल्टी कापोरेशन इसेन ग्रुप स्पेसेस २० रोहन कन्स्ट्रक्शन १०० फरांदे स्पेसेस'

आकाशातच विमान बघायचो

झारखंडमधील अनिकेत शर्मा हा अवघ्या २६ वर्षांचा आहे. सुतारकामात अगदी निष्णात आहे. तो म्हणाला, ‘‘मी गेली चार वर्षे पुण्यात काम करतो आहे. मार्चमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे गावी पळून गेलो. पहिले काही दिवस बरे वाटले. मात्र, तिकडे जाऊन तरी करायचे काय? गावी काही पिकत नाही आणि उद्योग व्यवसाय नाही. त्यामुळे पुन्हा इकडे आलो. विमान आकाशात बघायचो, पण मी त्यात बसून आलो.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: workers from other state are being airlifted to pimpri chinchwad