...म्हणून यशवंतरावांचे पंतप्रधानपद हुकले : श्रीपाल सबनीस

भोसरी - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व ज्येष्ठ कवयित्री अनुराधा ठाले-पाटील यांना ‘यशवंत-वेणू गौरव’ पुरस्कार देताना डॉ. पी. डी. पाटील. समवेत श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे आदी.
भोसरी - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व ज्येष्ठ कवयित्री अनुराधा ठाले-पाटील यांना ‘यशवंत-वेणू गौरव’ पुरस्कार देताना डॉ. पी. डी. पाटील. समवेत श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे आदी.

भोसरी - ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर या पदावर सर्वार्थाने अधिकार यशवंतरावांचा होता. त्यांना राजकीय अनुभवही मोठा होता; मात्र त्यांची नेहरूंवर प्रचंड श्रद्धा होती. यातूनच इंदिरा गांधी यांनी डावपेच खेळून बाजूला सारले आणि यशवंतरावांचे पंतप्रधान पद हुकले,’’ असा दावा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला.

भोसरी येथे गुरुवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि लायन्स क्‍लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्यावतीने ‘यशवंत-वेणू गौरव सोहळा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री अनुराधा ठाले-पाटील यांना ‘यशवंत-वेणू पुरस्कार’ प्रदान केला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी जुन्नर येथील महेश शेळके (यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार), आंतरराष्ट्रीय धावपटू संपदा केंदळे (वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार) व नगर येथील सुनील उकीर्डे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार) यांनाही सन्मानित केले. कार्यक्रमास संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, अभय शास्त्री, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, रंगनाथ गोडगे-पाटील, मसापचे भोसरी शाखा अध्यक्ष मुरलीधर साठे आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सबनीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा खोटा आव आणणारे राजकीय पुढारी दिल्लीमध्ये सगळीकडे आज दिसत आहेत. ते सत्ताधारी असोत की विरोधी पक्षातले. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संबंधाच्या अस्मितेचा, त्यांच्या भाकरीचा. शेतकरी हा अन्नदाता आहे. हा अन्नदाताही आज चुकला. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील तिरंगा काढून दुसरा झेंडा फडकाविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कोणी दिला? राजकीय मोदीपेक्षा आणि शेतकऱ्यांपेक्षाही देश श्रेष्ठ आहे.’’

देखणे म्हणाले, ‘आज विरोधी पक्ष नेत्याचे काम म्हणजे सरकारच्या प्रत्येक कामात त्रुटी काढणे हेच झाले आहे. मात्र, यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षनेते असताना रेल्वेमंत्री मधुकर दंडवते होते. दंडवते यांनी रेल्वेअर्थ संकल्प मांडल्यानंतर पत्रकारांनी यशवंतरावांना अर्थसंकल्पावर मत विचारले, तेव्हा ते म्हणाले होते की आजच्या परिस्थितीत यासारखा चांगला अर्थसंकल्प होऊच शकणार नाही. त्यांची भूमिका विरोधाला विरोध म्हणून कधीच नव्हती.’’

ठाले-पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सर्वप्रथम इबीसीची सेवा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केली. या सवलतीचा फायदा लाखो गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मिळाला.’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण इंगळे यांनी आभार मानले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com