esakal | 'या' उद्योगात चीनला पछाडण्याची भारताला मोठी संधी, पण...

बोलून बातमी शोधा

Abhay Diwanji writes special article on scope of Indian textile business }

केंद्र व राज्य शासनाने टेक्‍स्टाईल उद्योगाबाबतच्या धोरणात काही प्रमाणात लवचिकता आणली तर जगात भारताचा वरचा क्रमांक लागेल. सध्या टेक्‍स्टाईल उत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात चीनबद्दलची भावना बदलल्याने भारत चीनला निश्‍चितच मागे टाकेल.

'या' उद्योगात चीनला पछाडण्याची भारताला मोठी संधी, पण...
sakal_logo
By
अभय दिवाणजी

केंद्र व राज्य शासनाने टेक्‍स्टाईल उद्योगाबाबतच्या धोरणात काही प्रमाणात लवचिकता आणली तर जगात भारताचा वरचा क्रमांक लागेल. सध्या टेक्‍स्टाईल उत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात चीनबद्दलची भावना बदलल्याने भारत चीनला निश्‍चितच मागे टाकेल. शेतीनंतरचा मोठा उद्योग म्हणून टेक्‍स्टाईलकडे पाहिले जाते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा उद्योग म्हणून टेक्‍स्टाईलकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे वाटते.

टेक्‍स्टाईल उद्योगात सध्या जगभरात चीन व बांगलादेश आघाडीवर आहेत. या दोन देशांचा बोलबाला मोठाच आहे. या स्पर्धेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारत देश चीन व बांगलादेशापेक्षा मागे असण्याची काही कारणेही आहेत. या कारणांवर जर काम झाले तर... निश्‍चितच भारताचा क्रमांक पुढे येईल. यासाठी उद्योजक व कामगारांची तयारी आहेच. गरज आहे ती शासकीय पातळीवरील मानसिकतेची. जर सरकारने काही धोरणे बदलून या उद्योगाला हातभार लावला तर निश्‍चितच भारत आघाडी घेईल. सध्याची कोरोनाची महामारी या उद्योगासाठी आपत्ती नव्हे तर इष्टापत्ती ठरेल. कोरोनामुळे जगभरात चीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचा फायदा घेत कोरोनानंतरच्या स्थितीत भारतीय उत्पादनांना चांगले मार्केट मिळू शकेल. यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होण्याची गरज आहे. रोजगाराची मोठी निर्मिती करणारा हा उद्योग असल्याने कोरोनानंतर याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

चीन व बांगलादेशात कामगारांचे वेतन खूपच कमी असून त्यांची कार्यक्षमता मोठी आहे. प्रदूषण नियंत्रणाबाबतचे कायदे लवचिकच आहेत. चीन सरकारने तर टेक्‍स्टाईल उद्योगासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. काही करांमध्ये सूटही देण्यात येते. या सर्व बाबींमुळे चीन व बांगलादेशने टेक्‍स्टाईल उद्योगात आघाडी घेतली आहे. भारतात मात्र पायाभूत सुविधांचा अभाव मोठा आहे. या उद्योजक, कामगारांना सवलतीबाबत सारीच आलबेल स्थिती आहे. त्यामुळे उत्पादित मालाची किंमत वाढलेली दिसते. जागतिक पातळीवर या क्षेत्रातील स्पर्धाही कमालीची तीव्र आहे. टेक्‍स्टाईलमध्ये चीनचे मार्केटिंग ऍग्रेसिव्ह आहे. टेक्‍स्टाईल उत्पादनाच्या स्पर्धेत श्रीलंका व व्हिएतनाम ही दोन राष्ट्रे स्पर्धेत पुढे येऊ लागली आहेत.

महाराष्ट्रात इचलकरंजी (कोल्हापूर), मालेगाव (नाशिक), भिवंडी व सोलापूर या चार ठिकाणी टेक्‍स्टाईल उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण देशभरात कोईमतूर (तमिळनाडू) येथील उत्पादनांची आघाडी होती. परंतु तमिळनाडू सरकारने प्रदूषणाचे कायदे कडक केल्याने या उद्योगावर मोठी संक्रांत आली. त्यामुळे येथील टेक्‍स्टाईल उद्योजकांनी थेट बांगलादेश गाठले. परिणामी येथील उत्पादन कमी झाले.

टेरी टॉवेलची वार्षिक 1200 कोटींची उलाढाल

सुमारे दीडशे वर्षांपासून सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू असून, हातमागावर पूर्वी धोती, साड्या आदींची निर्मिती व्हायची. कालांतराने ऑटो लूमवर सोलापुरी चादरींचे उत्पादन सुरू झाले. आता यंत्रमाग उद्योगात मुख्यत्वे टेरी टॉवेलची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून, वार्षिक उलाढाल 1200 कोटींची आहे. अक्‍कलकोट रोड एमआयडीसी व शहरातील इतर ठिकाणी विखुरलेल्या जवळपास साडेसातशे कारखानदारांकडून ही उत्पादने सुरू आहेत.

वार्षिक निर्यात 600 कोटींची

टेरी टॉवेलची निम्मी उत्पादने 15 ते 20 कारखानदार थेट निर्यात करतात तर 100 च्या आसपास कारखानदारांकडून मर्चंट एक्‍स्पोर्टर्स निर्यात करतात. जवळपास 600 कोटींची उत्पादने निर्यात होतात. यात आखाती देश, युरोपियन युनियन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साउथ आफ्रिका, पनामा अशा विविध देशांना सोलापूरची उत्पादने निर्यात होतात.

जगाला टेक्‍स्टाईल उत्पादने पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत पाचवा

संपूर्ण जगाला टेक्‍स्टाईल उत्पादने पुरवण्यात चीनचा वाटा 61.69 टक्के आहे. चीन जगभरात 157.8 मिलियन डॉलरची टेक्‍स्टाईल उत्पादने निर्यात करतो. त्यानंतर दुसरा क्रमांक युरोपियन युनियनचा (147.5 बिलियन डॉलर), तिसरा क्रमांक बांगलादेश (32.5), चौथा क्रमांक व्हिएतनाम (31.5) तर पाचवा क्रमांक भारताचा लागतो (16.6). यानंतर टर्की, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, कंबोडिया व यूएसए यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक टेक्‍स्टाईल पार्क उभे करण्याच्या दृष्टीने बैठक घेतली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. त्याचा पाठपुरावा सुरूच आहे. परंतु, दरम्यान कोरोनामुळे यंत्रणा थंडावली. सर्वच जिल्ह्यांत पार्क उभारण्यापेक्षा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर अशा दहा निवडक जिल्ह्यांमध्ये हे पार्क प्रायोगिक तत्त्वावर उभे करावेत. छोट्या-छोट्या उद्योजकांना एकत्र आणून त्याच्या मांडणीतून मोठे उत्पादन उभे करावे. त्यातून मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याने सकारात्मक दृष्टीने याचा विचार व्हावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतातील टेक्‍स्टाईल उद्योजकांची मानसिकता चांगली आहे. जागतिक मार्केटमध्ये ते स्पर्धा करीत आहेत. त्यांच्याबाबत आणखी सकारात्मक विचार केला तर भारत जागतिक पातळीवर आघाडी घेईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोजगारात मोठी वाढ करण्याची संधी या निमित्ताने मिळेल.
                - किरण सोनवणे प्रादेशिक उपायुक्त, टेक्‍स्टाईल

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात चीनबद्दल वातावरण बददले आहे. त्याचा भारतीय टेक्‍स्टाईल उद्योजकांना निश्‍चितच फायदा होईल. परंतु त्यासाठी पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणात उत्पादन, कुशल कामगारांची गरज भासेल. सरकारने यासाठी मदत करावी.

-राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्‍स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन, सोलापूर