esakal | श्रीरामांची सांस्कृतिक परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामांची सांस्कृतिक परंपरा}

श्रीरामांची सांस्कृतिक परंपरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामाआधी आणि नंतर पुष्कळ राजे आले आणि गेले असतील, मग नेमके रामाचेच नाव घेऊन 'सुखी राज्या'ची संकल्पना का पुढे आली असावी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रामाची कुलपरंपरा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. वाल्मीकींनी रामाच्या कुलाचा परिचय करुन देताना पूर्वसूरींची माहिती दिली आहे, तर भागवत पुराणातही सूर्यकुलाची परंपरा विस्ताराने सांगितली आहे. विष्णुपुराण, कालिदासाचे 'रघुवंश' महाकाव्य यांमध्येही रामाच्या कुलपंरपरेचे वर्णन आढळते.

गेली कित्येक वर्षे साऱ्या भारतीयांचे स्वप्न असलेल्या राममंदिराची उभारणी अयोध्येत उत्साहाने सुरू आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक सामान्य भारतीय माणूस आपले योगदान हस्ते-परहस्ते राममंदिरासाठी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा सर्वत्र ‘रामराज्य’ संकल्पना, रामाचे महत्त्व, रामाच्या पराक्रमाचे मूल्यमापन अशा विषयांवर विचारमंथनही सुरू आहे. ‘रामराज्या’ची संकल्पना आतापर्यंत नुसती ‘सर्वत्र आनंदी, सुखी वातावरण’ अशा मर्यादित अर्थाने उल्लेखली जात होती. पण प्रत्यक्ष ‘रामराज्य’ कसे होते, राजा म्हणून खरेच रामाने काय केले, रामाआधी आणि नंतर पुष्कळ राजे आले- गेले असतील, मग नेमके रामाचेच नाव घेऊन ‘सुखी राज्या’ची संकल्पना का पुढे आली, अशी कोणती सांस्कृतिक परंपरा होती रामाला की त्यामुळे तो श्रेष्ठ,‌ आदर्श ठरला, असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत आणि त्यांची उत्तरे शोधायचा प्रयत्नही केला जातो आहे. या प्रयत्नांना थोडा हातभार लावण्यासाठीच हा लेखप्रपंच!

हेही वाचा: श्रीरामाची श्रेष्ठगुणसंपदा

मानवी वर्तनावर कुलपरंपरेचा प्रभाव

कोणताही माणूस आदर्श सद्गुणी ठरतो, तेव्हा त्याचे घराणे, त्याची वंशपरंपरा पाहिली, शोधली जाते, कारण अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या माणूस जन्मतो तो आपल्या घराण्याचे विशिष्ट गुणदोष घेऊन, तो वागतो तोही या स्वाभाविकपणे स्वतःत उतरलेल्या अानुवंशिक गुणांनुसार! त्यामुळेच आदर्श व्यक्तीची कुलपरंपरा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच रामाच्या वंशपरंपरेविषयी उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. फक्त आपल्याकडे पाश्चात्त्यांप्रमाणे ऐतिहासिक नोंदी ठेवण्याची पद्धत नसल्यामुळे आधुनिक पद्धतीची वंशावळ सापडत नाही. मात्र स्वतः वाल्मीकींनी राम-सीता विवाहप्रसंगी ही माहिती दिलेली दिसते. जनकाला रामाच्या कुलाचा परिचय करून देताना पूर्वसूरींची माहिती दिली गेली आहे. भागवत पुराणातही सूर्यकुलाची परंपरा विस्ताराने सांगितलेली आढळते. विष्णुपुराण, कालिदासाचे ‘रघुवंश’ महाकाव्य यांमध्येही रामाच्या कुलपरंपरेचे वर्णन आढळते.

वाल्मीकी रामायणामधील वंशावळी

वाल्मीकी रामायण हे प्रामुख्याने रामकथेचा प्रसार करणारे रामायण म्हणून त्यातील उल्लेख आधी बघावे लागतील. रामाने धनुर्भंग केल्यावर राम-सीता विवाहाला मान्यता मिळावी, म्हणून जनक दशरथाला सपरिवार बोलवून घेतो. तेव्हा तो आल्यावर रितीनुसार त्याचे कुलपुरोहित वसिष्ठ जनकाला रामाची वंशपरंपरा सविस्तर सांगताना दिसतात. अदिती व कश्यप यांच्यापासून विवस्वानाची म्हणजेच सूर्याची उत्पत्ती झाली. त्या सूर्यापासून मनूची, मनूपासून ईक्ष्वाकूची. हा ईक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा, असे वसिष्ठ सांगतात. त्यानंतर कुक्षी, त्याचा पुत्र विकुक्षी, त्याचा पुत्र बाण, त्याचा पुत्र अनरण्य, अनरण्याचा पृथू आणि पृथुपासून त्रिशंकू, त्रिशंकूपासून धुंधुमार, त्याचा पुत्र युवनाश्व, युवनाश्वाचा मांधाता, मांधात्याचा सुसंधी, सुसंधीचे दोन पुत्र ध्रुवसंधी व प्रसेनजित. ध्रुवसंधीचा भरत, भरताचा पुत्र असित, असिताचा पुत्र सगर, सगरपुत्र असंमज आणि त्याचा पुत्र अंशुमान, अंशुमानाचा दिलीप आणि दिलीपाचा भगीरथ, भगीरथाचा ककुत्स्थ, ककुत्स्थाचा रघू, रघूचा कल्माषपाद, मग शंखण, शंखणाचा पुत्र सुदर्शन, मग त्याचा अग्निवर्ण, त्याचा शीघ्रग व शीघ्रगाचा मरू, मरूचा प्रशुश्रुक, त्याचा पुत्र अंबरिश, त्याचा पुत्र नहुष, नहुषाचा ययाती, ययातीचा नाभाग, नाभागाचा अज आणि अजाचा पुत्र दशरथ, त्या दशरथाचे राम, लक्ष्मण आदी चार पुत्र. हा सर्व वंश ईक्ष्वाकूपासून उत्पन्न झालेला आणि आरंभापासून शुद्ध, पवित्र आहे. हे सर्व राजे परम धर्मात्मा आणि वीर आहेत, असे प्रतिपादन वसिष्ठ ऋषी करताना दिसतात.

हेही वाचा: गांधीजींच्या मनातील रामराज्य

समृद्ध कुलपरंपरा

या परिचयातून सूर्यकुलात ३९व्या पिढीत राम-लक्ष्मण जन्मल्याचे कळते. या पूर्वजांपैकी मनू प्रजापति म्हणून व ईक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा म्हणून महत्त्वाचा आहे. याशिवाय त्रिशंकू, मांधाता, सगरापासून भगीरथापर्यंतचे राजे, त्यानंतर दिलीप, रघू, अज हे राजे वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वतंत्र कर्तृत्वाच्या कथा रामायणात आणि अन्य पुराणग्रंथातही आढळतात. त्रिशंकू सदेह स्वर्गात जाण्याचा ध्यास घेतलेला व त्यासाठी तसा प्रयत्न करणारा राजा होता.

‘स-गर’ म्हणजे विषासह जन्मलेला. सावत्र मातांनी आपल्या आईला घातलेले विष पचवून जन्माला आलेला कर्तृत्त्ववान राजा होता. त्याच्या यज्ञाचा घोडा इंद्राने पळवून नेल्यावर त्या घोड्याला शोधून आणण्यासाठी पृथ्वी पाताळापर्यंत खणून काढण्याची क्षमता असणारे त्याचे ६० हजार पराक्रमी पुत्र होते. त्या पुत्रांना शापमुक्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारा सगराचा पणतू भगीरथ हा रामाच्या वंशातला, सूर्य कुळातलाच होता. त्याने तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर अवतरण्यास भाग पाडले म्हणून त्याची कर्तृत्वगाथा गायली जाते. खूप मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना ‘भगीरथ प्रयत्न’ अशी संज्ञा रूढ झालेली दिसते. दिलीप राजा १०० अश्वमेध करणारा म्हणून प्रसिद्ध आहे तर त्याच्या शंभराव्या अश्वमेधाचा घोडा पळवून नेणाऱ्या इंद्राला नामोहरम करणारा वीर म्हणून रघू प्रसिद्ध आहे. अर्थात, या राजांच्या कथा रामायणात वेगवेगळ्या प्रसंगी विखुरलेल्या स्वरूपात‌ आढळतात, पण रामाची समृद्ध कुलपरंपरा जाणून घेण्यासाठी त्या महत्त्वाच्या ठरतात.

हेही वाचा: अयोध्या : रामराज्याचे द्वार

पुढच्या पिढ्यांच्या उल्लेखाचा अभाव

मात्र रामाची रामानंतरची वंशपरंपरा वाल्मीकी रामायणात फार पुढेपर्यंत आढळत नाही. आधीच्या जवळजवळ ३८ पिढ्यांची माहिती जरी दिली गेली असली, तरी रामानंतर पुढे रघुकुलाचे कार्य कसे सुरू राहिले, याबद्दल वाल्मीकींनी फार लिहिले नाही. फक्त आपल्या दोन पुत्रांना उत्तर कोशल व दक्षिण कोशल देशाचे राज्य सोपवले. भरताने त्याच्या तक्ष आणि पुष्कल या दोन मुलांकडे गंधर्व देशात तक्षशिला आणि पुष्कलावत अशी नगरे वसवून, तिथला कारभार सोपवला. शत्रुघ्नाने आपल्या सुबाहू व शत्रुघाती अशा दोघा पुत्रांकडे मथुरा व विदिशा नगरीचा कार्यभार सोपवला तर लक्ष्मणाच्या अंगद‌ व चित्रकेतू या दोन मुलांना कारूपथ नामक प्रदेशात दोन स्वतंत्र नगरींची स्थापना करून तिकडे पाठवले गेले. थोडक्यात, रामाने त्याचा एकहाती असलेला कार्यभार, असा आठ ठिकाणी विभागून जबाबदाऱ्यांचे विभाजन केले. वाल्मीकी इथेच थांबले आहेत.

भागवत पुराणातील उल्लेख

रामायणाशिवाय अन्यत्र भागवत किंवा विष्णुपुराणात मात्र रामाच्या आधीच्या आणि नंतरच्याही वंशपरंपरेचा सविस्तर उल्लेख आढळतो. भागवतात ‘ईक्ष्वाकूची कुलपरंपरा’ म्हणून ती येते. तेथे रामापूर्वीच्या ६३ पूर्वजांची नावे आढळतात. काहींच्या थोडक्यात कथाही आढळतात. रामायणातल्या काही नावांना इथे काही पर्यायी नावे आढळतात. उदा. मांधात्याचे ‘त्रसद्दस्यू’ असे नाव भागवतकार देतात. कल्मषपादाचे ‘सौदास’ हे मूळ नाव असल्याचे भागवतात कळते. ‘त्रिशंकू’चे ‘सत्यव्रत’ हे नाव भागवतात दिसते. राजा दिलीप जो १०० अश्वमेध यज्ञांसाठी प्रसिद्ध आहे तो भागवतात ‘खट्‌वाङ्‌ग’ या नावाने उल्लेखलेला दिसतो. भागवतात हरिश्चंद्राचा नामोल्लेख‌ रामाच्या पूर्वजांमध्ये येतो, ज्याची कथा ‘रघुकुलरीती सदा चली आई। प्राण जाए पर वचन न जाए।।’‌ या उक्तीच्या समर्थनार्थ खूपदा सांगितली जाते. विश्वामित्रांना राज्य देण्याचे स्वप्नात दिलेले वचन सत्यात खरे करणारा राजा म्हणून याची ख्याती आहे. वाल्मीकी रामायणात रामाचा पूर्वज म्हणून याचा उल्लेख नाही, पण भागवतकारांनी रामाच्या पूर्वपरंपरेत त्याचा उल्लेख‌ केला‌ आहे.

हेही वाचा: आचरणातून आदर्श विचार

आंतरजालावरील उल्लेख

रामाची वंशावळ नेटवर शोधली तर ईक्ष्वाकूपासून रामाची पिढी ८१वी असा उल्लेख मिळतो. पुढेही ६४ पिढ्यांतील राजांचे नामोल्लेख आढळतात. रामानंतरचा बृहद्बल नामक एक राजा महाभारतीय युद्धात अभिमन्यूकडून मारला गेला आणि सुमित्र हा राजा चाणक्याचा शत्रू धनानंद याच्याकडून मारला गेला,‌ असे उल्लेख इथे येतात.

रघुवंशातील संदर्भ

याशिवाय महाकवी कालिदास ‘रघुवंश’ या रामाच्या वंशाच्या पराक्रमगाथेवर आधारित काव्यात रामाच्या दिलीप, रघू, अज आणि दशरथ अशा चार पूर्वसूरींची पराक्रमांनी आणि यज्ञ, दान, तपादि विहित कर्मांनी युक्त असणारी चरित्रे खूप सविस्तर व रंजक रीतीने सांगतो. अन्य पूर्वसूरींची नावे तो देत नाही. मात्र रामानंतरच्या लवकुशासह २४ पिढ्यांतील राजांची नावे व वर्णने तो ‘वंशानुक्रम’ या स्वतंत्र सर्गात देतो. काही राजांची नावे सांगताना तो एकेका वाक्यात त्या राजांची वैशिष्ट्येही सांगतो. उदा. वाराणसीतील विश्वनाथाच्या आशीर्वादाने जन्मलेला विश्वसह, पुण्डरिक नामक देवगजासारखा बलवान, आपल्या पराक्रमाने पर्वताची उंची कमी करणारा पारियात्र इ.

हेही वाचा: कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?

परंपरेतून सूत्रबद्धता

रामाच्या वंशावळीची ही वेगवेगळ्या ग्रंथांत आढळणारी माहिती नेहमीच्या इतिहासासारखी तारीख- वारानुसार नेमकी मिळत नसली, तरी यात उल्लेखलेल्या आणि पुढे अन्यत्र आलेल्या अनेक राजांच्या चरित्रातून एकूण रामाची, त्याच्या कुलाची- अर्थात सूर्यकुलाची- रघुकुलाची सांस्कृतिक परंपरा, त्यांच्या वागण्याच्या रीती, पद्धती, त्यांची नीती‌ यावर निश्चितपणे प्रकाश पडतो. या सगळ्या पूर्वजांच्या वागण्यात, राज्य कारभार करण्यात एक विशिष्ट प्रकारची सूत्रबद्धता होती, हे जाणवते. काय होती ती सूत्रबद्धता किंवा कशी होती ती परंपरा?

रघुवंशरीती

रघुकुलातले राजे थोडक्यात रामाचे पूर्वज आणि वंशजही सत्यवादी होते, वचनाला पक्के होते. याचकाला विन्मुख पाठवणारे नव्हते, म्हणून तर सर्वजित् नावाचा यज्ञ करून सर्वस्व देऊन टाकल्यावरही कौत्स नामक ब्राह्मण जेव्हा गुरुदक्षिणेसाठी म्हणून सुवर्णमुद्रा मागण्यासाठी आला, तेव्हा त्याची गरज भागवण्यासाठी साक्षात् कुबेरावर स्वारी करण्याची तयारी रघुराजाने केलेली दिसते. दिलेले वचन पाळण्यासाठी हरिश्चंद्र व दशरथ दोघांनी प्रतिष्ठा व प्राणही पणाला लावलेले दिसतात. बरेचसे राजे इतके पराक्रमी‌ की देवासुर संग्रामात ते देवांनाही मदत करण्यासाठी जात असल्याचा उल्लेख आढळतो. शाप, तापमुक्तीसाठी यज्ञ, दान, तपादी कर्मे करणारे हे सारे राजे आहेत. थोडक्यात, यांच्याकडे समर्पणाची वृत्ती आहे, त्यागाची तयारी आहे. यांच्याकडे तपश्चर्येचे तेज आहे व शाप देण्यचे सामर्थ्यही! पण म्हणून औद्धत्य मात्र त्यांना स्पर्श करत नाही. सहनशीलता हा त्यांचा गुण आहे.

उपसंहार

रामाचा, त्याचा वंशाचा सांस्कृतिक वारसा हा असा आहे. कालिदासाने या साऱ्या रघुवंशीयांचं वर्णन खूप नेमकेपणाने केले आहे. ते समजून घेतले तर कळेल ‘राम’ या नावाला, ‘रामराज्य’ या संकल्पनेला आपली संस्कृती इतके का मानते, इतके का गौरविते? कालिदासाचे शब्द आहेत,

सोऽहम् आजन्मशुद्धानामाफलोदयकर्मणाम्।

आसमुद्र क्षितीशानामानाकरथवर्त्मनाम्।।

यथाविधिहुताग्नीनां यथाकामार्चितार्थिनाम्।

यथाऽपराधदण्डानां यथाकालप्रबोधिनाम्।।

त्यागाय सम्भृतार्थानां सत्याय मितभाषिणाम्।

यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनाम्।।

शैशवेऽभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्।

वार्द्धके मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।

ज्यांची चरित्रे ‘अथ’पासून ‘इति’पर्यंत- सुरुवातीपासून शेवटपर्यंत निर्दोष आहेत, जे कोणतेही काम पूर्ण करूनच थांबतात, ज्यांचे‌ साम्राज्य दशदिशांत पसरले आहे, ज्यांचे रथ पृथ्वीपासून पार स्वर्गापर्यंत पोचले आहेत, जे शास्त्रानुसार यज्ञ करतात, याचकांना त्यांच्या गरजेनुसार दान देतात, अपराधी लोकांना शासन करतात आणि योग्यवेळी जागतात, जे देऊन टाकण्यासाठीच धन मिळवतात आणि सत्याचे महत्त्व राखता यावे म्हणून कमी बोलतात, यशप्राप्तीची इच्छा करतात आणि पुत्रोत्पत्तीसाठी (खरे तर वंशवृद्धीसाठी) गृहस्थाश्रमी‌ होतात, बालपणी विद्याभ्यास करतात, तारुण्यात विषयोपभोग घेतात, वृद्धपणी ऋषिमुनींसारखे संन्यस्त जीवन जगतात आणि शेवटी योगमार्गाने देहत्याग करतात. अशा रघुवंशी राजांचे चरित्र वर्णन करण्याचा मोह आपल्याला होत असल्याचे कालिदासाने रघुवंशाच्या प्रारंभीच नमूद केले आहे आणि भासानेही आपल्या ‘प्रतिमा’ नाटकात ‘मृत्यूदेखील यांच्या इच्छेची प्रतीक्षा करतो’ असे सांगत त्यांचा गौरव केला आहे. मला वाटते, रामाच्या सांस्कृतिक परंपरेच्या, त्याच्या वंशावळीच्या महत्तेचा यापेक्षा वेगळा पुरावा काय हवा?

-डॉक्टर अंजली पर्वते

(लेखिका संस्कृत विषयाच्या प्राध्यापक व रामायणाच्या अभ्यासक आहेत.)