esakal | अयोध्या पर्व : श्रीरामाची श्रेष्ठगुणसंपदा
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामाची श्रेष्ठगुणसंपदा}

रामाचे गुण आणि आचरण सर्वोत्कृष्ट असून सर्वदा सर्वांना आचरणीय आहेत. व्यक्ती जेव्हा सर्वोत्कृष्ट गुणांनी युक्त असते, तेव्हा ती व्यक्ती, समाज, धर्म, राष्ट्र ह्या पातळ्या ओलांडून विश्वरुप होते आणि अवघे विश्वची माझे घर, अशी त्यांची धारणा होते आणि तीच व्यक्ती गुणांमुले पूज्य होते. आज भारतात तसेच भारताबाहेर सर्व ठिकाणी, सर्व भाषा, प्रांत ओलांडून समाजीतल प्रत्येक स्तरांत रामाला आदर्श मानून त्याची उपासना होते.

श्रीरामाची श्रेष्ठगुणसंपदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कथा राघवाची सदाशिव पाहे।

तळी ऐकता शेष थकीत राहे।

कथा श्रेष्ठ हे ऐकता दोष जाती।

जनी सुकृती ऐकती धन्य होती॥

प्रत्यक्ष सदाशिव रामकथेने मुग्ध झाला, ती कथा ऐकून शेष आश्चर्यचकित झाला, अशी ही श्रेष्ठ रामकथा जे सुकृती जन ऐकतात, त्यांचे सर्व दोष जाऊन ते धन्य होतात, अशी ग्वाही समर्थ रामदासस्वामी आपणास वरील अभंगात देतात.

श्रीराम सर्वश्रेष्ठ गुणांनी संपन्न व सर्वांना प्रिय आहेत, असे प्रत्यक्ष नारदमुनींनी वाल्मीकी ऋषींना सांगितले तेव्हा, लोककल्याणाकरीता हे आदर्श रामचरित्र शब्दबद्ध करावे, अशी जिज्ञासा वाल्मीकींना झाली. तत्कालीन भारतीय उच्च संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन ज्यात आहे, असे हे ऐतिहासिक रामायण महाकाव्य वाल्मीकी ऋषींच्या कृपेने आम्हाला प्राप्त झाले आहे.

वाल्मीकी रचित रामायणात रामाचे गुणवर्णन सर्वत्रच सर्वांच्या मुखी आहे. त्यातील नारदमुनी, प्रजाजन आणि हनुमानाच्या मुखातून वेळोवेळी प्रगट झालेले रामाचे गुण- आत्मसंयमी, धैर्यवान, वीर्यवान, बुद्धिमान, जितेंद्रीय, सत्यप्रतिज्ञ, नितीज्ञ, धर्मज्ञ, वक्ता, वैभवसंपन्न, ज्ञानसंपन्न, शत्रुनाशक, शुभलक्षणी, प्रजाहिततत्पर, विनयशील, धर्मरक्षक, वेदविद्या पारंगत, धनुर्विद्या पारंगत, शस्त्रास्त्रनिपुण, सर्व शास्त्रांचे अर्थतत्व जाणणारा, सर्वांशी समभावाने वागणारा, सौम्य वृत्तीचा, उदार आणि सदैव प्रियदर्शनी (वा.रा.बाल. सर्ग १). इंद्राप्रमाणे पराक्रमी म्हणून इक्ष्वाकूमध्ये श्रेष्ठ, सत्यवादी, धर्ममूर्ती, निर्मत्सरी, दृढनिश्चयी, मधुरभाषी, सुशील, क्षमावान, कृतज्ञ, बहुश्रुत, सर्व अस्त्रांत निपुण, प्रजापालक (वा. रा. अयोध्या. सर्ग २).

हेही वाचा: Titanic एक उद्‌ध्वस्त प्रेमाची अस्वस्थ कहाणी!

इतक्या समृद्ध गुणांचा परिचय रामाच्या श्रेष्ठ आचरणातून प्रगट झाला, तेव्हाच ते गुण लोकांना ज्ञात झाले आणि आचरण कसे असावे, तर रामासारखे हे तत्त्व समाजात दृढमूल झाले. रामाचेच गुण आणि आचरण समोर ठेवून भारतीय संस्कृतीची जडणघडण झाली आहे.

रामाचा पराक्रम, शौर्य, वीर्य, धैर्य, शस्त्रास्त्र ज्ञान, धर्माचरण, धर्मरक्षण, शत्रुनाशक अशा गुणांचा परिचय पुढील प्रसंगांत होतो.

यज्ञरक्षण प्रसंग

वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणाला जाताना रामाने भयंकर अशा ताटका राक्षसीचा वध एकाच बाणाने केला. अस्त्रांचा प्रयोग करून सुबाहू राक्षसाचा वध केला आणि मारीच राक्षसाला शंभर योजने लांब समुद्रात फेकले. त्यानंतर शिवधनुष्याचा भंग करून राजा जनकाला आपले वीर्य, सामर्थ्य आणि तेजस्वितेचा परिचय देऊन सीता प्राप्त केली. विनयपूर्ण आचरणाने परशुरामाचे गर्वहरण केले.

राक्षसवध

दंडकारण्यात ऋषींच्या रक्षणासाठी रामाने खर-दूषणासह चौदा हजार राक्षसांचा वध अवघ्या दीड मुहूर्तात केला. त्या प्रसंगाचे वर्णन करताना शूर्पणखा रावणाला म्हणाली, ‘तो महाबळी राम युद्धात केव्हा धनुष्य ओढतो, केव्हा बाण हातात घेतो, केव्हा सोडतो, हे मी पाहू शकत नव्हते. फक्त राक्षससेना मरताना दिसत होती. त्यावेळी तो एकटाच आणि रथरहित होता. त्याने सर्व दंडकवन राक्षसरहित केले. स्त्रीवध करू नये म्हणून मला विद्रूप करून सोडले.’ (वा. रा. अरण्य, सर्ग ३४)

सीताहरण

मारीच रावणाला म्हणतो, ‘रामो विग्रहवान् धर्म: साधु: सत्यपराक्रम:। राजा सर्वस्य लोकस्य देवानामिव वासव:॥’ (वा. रा. अरण्य, सर्ग ३७) तो पुढे म्हणाला, ‘रामबाणाच्या भीतीने मी सन्यस्त झालो, मला सर्वत्र रामच दिसतो. सीता पातिव्रत्याच्या तेजाने सुरक्षित आहे, तेव्हा रामाबरोबर युद्ध करणे उचित नाही.’ (वा. रा. अरण्य, सर्ग ३९).

हेही वाचा: आचरणातून आदर्श विचार

बलाढ्य कुंभकर्ण वध, रावण वध

हे दोन प्रसंग रामाच्या प्रचंड पराक्रमाचे द्योतक आहेत. राम- रावण युद्ध रात्रंदिवस सुरू होते, तेव्हा दोन्हीकडचे सैन्य हातात आयुधे घेतलेली असतानाही युद्ध पाहात चित्रासारखे स्तब्ध उभे होते. शेवटी वज्राप्रमाणे भयंकर बाणाने रामाने रावणाचे ह्रदय भेदून त्याचा वध केला. त्याच्या या अचाट सामर्थ्याची देवांनीही स्तुती केली. रामाचे पितृआज्ञा पालन, गांभीर्य, धैर्य, स्थितप्रज्ञत्व, निर्मोहत्व, धर्ममर्यादा पालन, त्याग, बंधुप्रेम, प्रजावात्सल्य, सदाचरण, कृतज्ञता, दातृत्व असे गुण पुढील प्रसंगांतून दिसतात.

वनगमन प्रसंग

राम कैकयीला म्हणतो, ‘मी वडिलांच्या आज्ञेने अग्नीत उडी घालीन, विषही भक्षण करीन, तेव्हा राजाला जे इष्ट आहे ते मला सांग, मी प्रतिज्ञा करतो, ते मी पूर्ण करीन. राम पुन्हा बोलत नाही.’ (वा. रा. अयोध्या., सर्ग १८)

दु:खी माता कौसल्या व क्रोधाविष्ट लक्ष्मणाला राम म्हणाला, ‘पितृवचन पाळणे, हा आपला धर्म आहे. धर्मच श्रेष्ठ, धर्मातच सत्य प्रतिष्ठित आहे. धर्ममार्गावर चालणे यातच सर्वांचे हित आहे.’ मोहापेक्षा त्यागच श्रेष्ठ असतो. त्यागातच सुखशांती हाच आदर्श रामाने प्रस्थापित केला. कलहाला प्रोत्साहन दिले नाही.

हेही वाचा: कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?

भरतभेट प्रसंग

भरतभेटीच्या प्रसंगी राम भरताला म्हणाला, ‘जीवाला स्वेच्छेने काहीएक करण्याचे सामर्थ्य नाही. माझ्या वनवासाला कैकयी किंवा राजा कारण नसून अदृष्टच कारण आहे, तेव्हा शोक करणे सोडून आपण पित्याची आज्ञा शेवटास नेऊ.’ (वा. रा. अयोध्या., सर्ग १००). जाबाली ऋषींना राम म्हणाला, ‘जो पुरुष धर्म अथवा वेदमर्यादेचा त्याग करतो, तो पापकर्मात प्रवृत्त होतो. त्याचे आचार, विचार भ्रष्ट होतात आणि तो लोकांमध्ये सन्मान्य होत नाही. उत्तम कुळातील कोण, अधम कुळातील कोण, वीर कोण, पवित्र कोण, अपवित्र कोण हे ज्याच्या- त्याच्या चारित्र्यावरून व आचारावरूनच कळते.’ (वा. रा. अयोध्या., सर्ग १०९) वालीवधानंतर सुग्रीवाला राज्य प्राप्त झाले, तेव्हा राम सुग्रीवाला म्हणाला, ‘मी पित्याच्या आज्ञेचे पालन करीत आहे म्हणून चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत गाव किंवा नगरात प्रवेश करणार नाही.’ (वा. रा. किष्किंधा., सर्ग २६) बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा राम म्हणाला, ‘मला शरण येऊन मी तुझा आहे असे म्हणून आपल्या रक्षणाची प्रार्थना करतो, त्याला मी सर्व प्राण्यांपासून अभय देतो, हे माझ व्रतच आहे.’ त्याप्रमाणे बिभीषणाला अभयदान देऊन त्याला लंकेच्या राज्याचा अभिषेक केला. (वा. रा. युद्ध., सर्ग १८) याप्रमाणे रामाचे गुण आणि आचरण सर्वोत्कृष्ट असून सर्वदा सर्वांना आचरणीय आहेत. व्यक्ती जेव्हा सर्वोत्कृष्ट गुणांनी युक्त असते तेव्हा ती व्यक्ती, समाज, धर्म, राष्ट्र ह्या पातळ्या ओलांडून विश्वरूप होते आणि अवघे विश्वची माझे घर, अशी त्यांची धारणा होते आणि तीच व्यक्ती गुणांमुळे पूज्य होते. रामाचा अपार गुणमहिमा प्रथम वाल्मीकी मुनींनी प्रगट केला. त्यानंतर व्यासांनी पुराणातून प्रगट केला. पुढे आचार्य, संत, सज्जन, कवी सर्वांनीच आपापल्या परींनी रामाचे गुणगान केले. रामाच्या गुणवर्णनाला वाणी अपुरी आहे. आज भारतात व भारताबाहेर सर्व ठिकाणी व सर्व भाषा, प्रांत ओलांडून समाजातील प्रत्येक स्तरांत रामाला आदर्श मानून त्याची उपासना होते. रामासारखी श्रेष्ठ गुणसंपदा आत्मसात करून त्याच्याप्रमाणेच आचरण करण्याने व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीचा विकास साध्य करणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

- योगेशबुवा रामदासी

(लेखक प्रवचनकार आहेत.)