Body can make movement for 17 months after death
Body can make movement for 17 months after death

मरणानंतरही 17 महिने हालचाल

पुणे जन्म आपल्या हातात असला तरी मृत्यू मात्र कधी येईल सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या- वाईट घटना घडत असतात. कधी काय घडेल याची कल्पना नसते. जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. कधी ना कधी तो येणार, हे निश्‍चित आहे. एखाद्याचा मृत्यू झाला म्हणजे काय? हृदयाची सुरू असलेली धडधड बंद झाली, डॉक्‍टरांनी संबंधित व्यक्तीला मृत घोषित केलं म्हणजे मृत्यू झाला म्हणायचं का? मृत्यूनंतरही काही काळ अवयव त्यांचे काम करत असतात. हळूहळू अवयव काम करणं बंद करतात. याचा कालावधी हा काही मिनिटांपासून ते तासांपर्यंत असतो. मात्र आता अशी गोष्ट समोर आलीय, की मृत्यूनंतरसुद्धा काही महिने मानवी शरीर हालचाल करू शकते. तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण हे खरं आहे. 

ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या संशोधनात मानवी मृत शरीर हे एका वर्षापेक्षा जास्त दिवस हालचाल करत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. संशोधिका एलिसन विल्सन आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या 17 महिन्यांच्या संशोधनातून ही बाब लक्षात आली आहे. संशोधक विल्सन आणि त्यांच्या टीमने आस्ट्रेलियन फॅसिलिटी फॉर टॅपोनॉमिक या संशोधन केंद्रात हे संशोधन केले. संशोधन करण्यासाठी तिने आणि तिच्या टीमने 17 महिने कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्रे गोळा केली. सर्व हालचाली टिपण्यासाठी दररोज 30 मिनिटांनी छायाचित्र घेण्यात आले. हे संशोधन करताना सुरवातीला मृतदेहाच्या हातांची हालचाल झाल्याचे जाणवले. 

सॅम्पल आणि मेथड 

या अभ्यासासाठी नमुना अर्थातच सॅम्पल म्हणून एक मानवी शरीर वापरण्यात आले. न्यू साउथ वेल्सच्या हॉक्‍सबरी प्रदेशातील नैसर्गिक बुशलॅंडमध्ये स्थित असलेल्या ऑस्ट्रेलियन टॅपोनोमिक एक्‍स्पेरिमेंटल संस्थेला हे शरीर दान केली होती. ज्या व्यक्तीचे शरीर दान केले होते तो एक प्रौढ पुरुष होता. या पुरुषाचा मृत्यू हा नैसर्गिक झाला होता. त्याच्या पायावर किरकोळ प्रकारच्या जखमा झाल्या होत्या; परंतु मृत्यूच्या अंतराच्या अंदाजावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही मोठ्या जखमा शरीरावर झालेल्या नव्हत्या. 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर 24 तासांच्या आत मृतदेहाला AFTER (Australian Facility for Taphonomic Experimental Research) लॅबच्या बाहेरच्या परिसरात ठेवण्यात आले होते. नैसर्गिक वातावरण मिळावे यासाठी एका गुहेमध्ये मृतदेहाला ठेवण्यात आले. ही गुहा 4.35 मीटर उंच, 2.40 मीटर रुंद आणि 4.35 मीटर लांब होती; जेणेकरून संशोधकांना गुहेमध्ये मुक्त वावर मिळावा, तसेच शरीराच्या चारही बाजूंनी अभ्यास करता यावा. संशोधनासाठी आणलेला मृतदेह बाहेरील गोष्टींकडून (जसे की मृतांचे मास खाऊन जगणारे कीटक) बाधित होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. या मृतदेहाला फेब्रुवारी 2018 पासून गुहेमध्ये ठेवण्यात आलंय. तसेच प्रत्येक दोन तासाला या मृत शरीराचे फोटो घेतले जाताहेत. 

पिंजरा 4.35 मीटर उंच, 2.4 मीटर रुंद आणि 4.35 मीटर लांबीचा होता. मृत शरीराला त्याच्या डोक्‍यावर पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला 0.45 मीटर आणि उजव्या खांद्याला पिंजऱ्याच्या बाजूने 0.66 मीटर ठेवले होते. या सर्व गोष्टींच्या डिजिटल इमेजेस पाच ब्रिन्नो टीएलसी 200 प्रो टाइम-लेप्स कॅमेरे वापरून घेण्यात आल्या, ज्यांचे रिझोल्यूशन 1.3 मेगा-पिक्‍सल होते. सर्व पाच कॅमेरे जमिनीच्या पृष्ठभागापासून चेहऱ्याच्या वरच्या बाजूस 0.53 मीटर, डाव्या हाताला जमिनीच्या पृष्ठभागापासून 0.44 मीटर, उजव्या हाताला जमिनीच्या पृष्ठभागापासून 0.53 मीटर, तसेच टॉप व्ह्यू 2.2 मीटर अंतरावर कॅमेरे फिक्‍स करून घेतले गेले होते. महिन्यातून एकदा एक किंवा दोन मिनिटांसाठी रेकॉर्डिंग हे कॅमेरा बॅटरी बदलण्यासाठी आणि एसटीडी मेमरी कार्डवरून इमेजेस डाउनलोड करून सुरक्षित करण्यासाठी थांबवले जात होते. 

संशोधनाचा निष्कर्ष 

यावर संशोधिका एलिसन विल्सन म्हणाल्या, सुरवातीला मृतदेहाच्या हाताच्या हालचाली दिसून आल्या. हात शरीराच्या खालच्या बाजूने हालचाल करत असल्याचे जाणवले. यावरून असे लक्षात आले, की मानवी देहाचे विघटन होत असतानाही मृत शरीर हालचाल करत असते. या संशोधनातून असेही लक्षात येते की, गुन्हेगारीच्या पॅथॉलॉजी विविधता यावर याचा परिणाम होतो. त्यामुळे पोलिसांना मृत शरीराची ओळख पटवणे आणि हरवलेल्या व्यक्तींसोबत ओळख पटवणे शक्‍य होईल, असा विश्वास संशोधकांनी वर्तवला आहे. 

ठराविक दिवसांनी हाताची हालचाल थांबली, मात्र मृतदेहाची हालचाल होत राहिली. यातून हे स्पष्ट झाले, की मृत्यूनंतर मानवी शरीराची हालचाल होत असते. ही हालचाल तब्बल एक वर्षापेक्षा अधिक दिवस होत असल्याने सर्वांना आश्‍चर्य वाटले. मृतदेहाच्या हालचालींच्या अभ्यासानंतर त्यांची ओळख पटवणे, मृत्यू वेळ जाणून घेणे अधिक सोईचे होईल, असेही एलिसन विल्सन म्हणाल्या. हे संशोधन करताना मानवी शरीराचे मृत्यूनंतर होणारे विघटन आणि हालचाली अभ्यासताना आम्हाला अनेक तथ्ये समजून घेणे शक्‍य झाले. जीवन आणि मृत्यू यांच्याविषयी विविध संस्कृतीत विविध तथ्ये आहेत, हेही समजून घेणे शक्‍य झाले. जीवन आणि मृत्यू यावर अनेक सिद्धांतही मांडलेले आहेत. हे सिद्धांत आणि संस्कृतीतील तथ्ये यांचाही अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. संशोधिका विल्सन हिने या संशोधना संदर्भाची माहिती नुकतीच फ्रान्स प्रेस एजन्सीला दिली. 

या संशोधनामुळे मृत्यूनंतर मानवी शरीराचे होणारे विघटन आणि हालचाली समजून घेणे शक्‍य होईल, तसेच मृत्यूनंतर मानवी शरीराविषयी माहिती करून घेता येईल, हा एक कुतूहलाचा विषय आहे, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com