esakal | कोविड : शेअर बाजाराचा तारणहार?
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 and Share Market}

कोविड : शेअर बाजाराचा तारणहार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुहास राजदेरकर

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सात जून २०२१ रोजी त्यांनी तब्बल सात कोटी नोंदणीकृत ग्राहकांच्या खात्यांचा (रजिस्टर्ड इन्व्हेस्टर अकाउंट) मोठा टप्पा पार केला. त्यात सर्वाधिक वाटा (१५०.५४ लाख) अर्थातच आपल्या महाराष्ट्राचा आहे. १८७५ मध्ये काही मोजक्या लोकांनी स्थापन केलेल्या या शेअर बाजाराचे, म्हणजेच त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘कोविड’ महासाथीसारख्या भयंकर संकटकाळात बाहेर अनेक गोष्टी बंद असतांना, केवळ १३९ दिवसांमध्ये त्यांनी ६ कोटींवरून ७ कोटींवर मजल मारली आहे.

नोंदणीकृत ग्राहकांच्या खात्यांमध्ये अशी वाढ होण्याची काय कारणे आहेत, ते पाहूया.

बँका आणि इतर अल्पबचत योजनांचे घसरलेले व्याजदर. अर्थात, ‘मी मागे राहून जाईन,’ अशी भावना. प्रामख्याने परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे अल्पावधीतच वर गेलेला बाजार ‘आयपीओ’द्वारे आलेल्या; तसेच दुय्यम बाजारात असलेल्या असंख्य शेअरनी एका वर्षात मोठा परतावा दिला आहे.

BSE

BSE

तरुण वर्गाला शेअर बाजाराचे आकर्षण होतेच आणि असतेच. परंतु, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे शेअर बाजाराकडे बघायला आणि खाते उघडायला मिळालेला वेळ, हेसुद्धा गुंतवणूकदार वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. ३० ते ४० वयोगटामधील नागरिकांचे प्रमाण ३८ टक्के आहे. २० ते ३० आणि ४० ते ५० वयोगटाचे प्रमाण अनुक्रमे २४ टक्के व १३ टक्के आहे. थोडक्यात, ७५ टक्के लोक हे पन्नाशीच्या आतील आहेत.

स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांमधील स्पर्धा व त्यामुळे ब्रोकरेजचे शून्याच्या जवळ घसरलेले दर. व्हॉट्सॲप, ट्वीटर, फेसबुक, यु-ट्यूब, इन्स्टाग्राम, इमेल आदी सोशल मीडियावर आज असंख्य ग्रुप आहेत, ज्यावर शेअर बाजारावर चर्चा, शेअच्या ‘टिप्स’ यांचा अखंड मारा सुरू असतो.

Share Market

Share Market

नवगुंतवणूकदारांनी काय करावे?

शेअर बाजारामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे, ही बाजाराच्या आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे. त्याने परकी गुंतवणूकदारांची मक्तेदारीसुद्धा मोडीत निघेल. परंतु, नव्याने येणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता वाटते. अशा वेळी काय काळजी घेतली पाहिजे, ते पाहू या...

बाजारामध्ये तेजी असताना चांगले-वाईट असे सारेच जण बरोबरीने धावत असतात. त्यामुळे असलेली चांगली नोकरी सोडून, फक्त शेअर बाजारातील ‘ट्रेडिंग’मधून झटपट पैसे कमावण्याचे ‘धाडस’ करणे योग्य ठरणार नाही.

कर्ज काढून अथवा ‘डेरिव्हटिव्हज’मध्ये व्यवहार करणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे काळजी घेतलेली बरी.

बेकायदेशीरपणे आणि विनामूल्य मिळणाऱ्या ‘टिप्स’पासून सावध राहावे.

एकूण गुंतवणुकीच्या १० टक्क्यांच्या वर रक्कम थेट शेअर बाजारामध्ये गुंतविणे धोक्याचे ठरू शकते.

म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांमध्ये अनुभवी सल्लागारांच्या मदतीने गुंतवणूक करणे योग्य ठरते.

शेअर बाजारातील सध्याच्या तेजीमध्येसुद्धा तुमच्याकडील एकूण शेअर्सपैकी काही कंपन्यांचे शेअर अजूनही तोट्यात असण्याची शक्यता आहे. परंतु, १, ३, ५, ७, १० वर्षांच्या कोणत्याही काळात कोणत्याही म्यच्युअल फंडाच्या कोणत्याही इक्विटी योजनेत केलेली गुंतवणूक आज तुम्हाला कमीतकमी १० टक्के इतका परतावा (रिटर्न्स) देताना दिसते. हेही गुंतवणूकदारांनी लक्षात घेतले पाहिजे.

(लेखक भांडवली बाजाराचे जाणकार आहेत.)