esakal | अचानक गुरे व्हायची गायब ... वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Cattle mutilation }

अचानक गुरे व्हायची गायब ... वाचा सविस्तर

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

गोवंशाची तस्करी, गोवंशाची हत्या, इतर पाळीव प्राण्यांची हत्या आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करी झाल्याच्या घटना या काळातही आपल्यासाठी नवीन नाहीत. अशा अनेक घटना आपण ऐकत असतो. पैसा कमविण्यासाठी गुरांची तस्करी केली जाते, हे देखील चौकशीनंतर समोर आले. मात्र, अशा गोवंशाच्या आणि इतर पाळीव प्राण्यांच्या मृत्यूबाबत/ हत्येबाबतचा रहस्यमयी इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

७० च्या दशकात गुरांचे कान, डोळे, गुद्‌द्‌वार, लैंगिक अवयव आणि जीभ हे अवयव नेहमीसारखे एका धारदार शस्त्राच्या सहाय्याने काढून टाकले होते. त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते पाहून पशुपालकांना आश्‍चर्य वाटले. मात्र, हे करणाऱ्यांनी तिथे कुठलेही पुरावे सोडले नव्हते. तसेच तिथे कोणाच्या पायाचे ठसेही सापडले नाहीत.

एकट्या कोलोरॅडो राज्यात 1975च्या एप्रिल ते ऑक्‍टोबर दरम्यान, गोवंशाची विकृती केल्याच्या सुमारे 200 घटना नोंदल्या गेल्या. गुराढोरांचा प्रश्न हा फक्त चाऱ्यापुरता मर्यादित न राहता त्यांची होणारी विकृती एक राष्ट्रीय समस्या बनली होती. त्यावेळी कोलोरॅडोच्या असोसिएटेड प्रेसने या मुद्द्याला लावून धरले होते. त्यानंतर कोलोरॅडोचे सिनेटर फ्लॉयड हॅस्केल यांनी फेडर ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला चौकशी करण्यास सांगितले होते.

1970 च्या दशकात अमेरिका मध्यवर्ती भागात गुराढोरांची विकृती होण्याचे प्रकरण वाढतच होते. 1979 मध्ये गुरे नष्ट झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने फेडर ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने न्यू मेक्‍सिकोच्या भूमीवर घडलेल्या अनेक प्रकरणांचा तपास करण्यास सुरवात केली. हार्वर्ड येथून भूगर्भशास्त्रात पीएच.डी. मिळवलेल्या त्या राज्यातील यू. एस. सिनेटचा सदस्य हॅरिसन स्मिट यांनी या विषयावरून काही प्रमाणात दबाव आणला. शेवटी एफबीआयच्या चौकशीमध्ये सापडलेल्या आश्‍चर्यकारक गोष्टींवर पाणी फेरले गेले. त्यानंतर 15 जानेवारी 1980 ला नोंदवल्या गेलेल्या गोवंश आणि गुरे-ढोरांच्या प्रकरणांमध्ये कुठलीही विकृती आढळून आली नसल्याचे मत एफबीआयने नोंदवले आणि सर्व प्रकरणांची फाईल बंद केली.

दरम्यान, एफबीआयचा निर्णय ऐकून स्थानिकांनी तीव्र निषेध नोंदवला. "मी माझे आयुष्य गुरांबरोबर काढले आहे, त्यामुळे या तीक्ष्ण हत्यारांद्वारे गुराढोरांची हत्या केली असल्याचे मी ठामपणे सांगू शकतो', असे मत एल्बर्ट देशाचे शेरीफ जॉर्ज ए. यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिले होते.

1970 च्या दशकात गुरांचे रहस्यमयी मृत्यू होणे आणि त्यांचे अवयव गायब होणे हे फक्त अमेरिकेतच होत नव्हते. शेळ्या, गाई, घोडे हे देखील रहस्यमयीरीत्या गायब झाल्याच्या तक्रारी 70 च्या दशकातही होत्या आणि आता 2021 मध्येही कायम आहेत. मात्र, 70 च्या दशकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गुरांचा असा अचानक मृत्यू होण्याच्या घटनेवरून दोन गट पडले होते; एक म्हणजे ज्यांना हे काय घडतं हे माहिती नव्हतं आणि दुसरे म्हणजे सामान्य गुरे-ढोरे मरतात किंवा एखादी रहस्यमयी घटना घडली असावी, या मताचे दोन गट होते. यापैकी जो गट या प्रकरणाबाबत अज्ञानी होता त्यांची मते वेळोवेळी बदललेली पाहायला मिळाली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या काही समुदायांनी धार्मिक विधीसाठी प्राणी पळविल्याचे मत नोंदविले. 1980 मध्ये रॉयल कॅनाडियन माऊंटेड पोलिसांनी अज्ञात गटातील लोकांना यासाठी जबाबदार धरले. दरम्यान, लोवामधील गुन्हे अन्वेषण विभागाने ही गुरांची विकृती काही सैतानांनी केली असल्याचे सांगितले.

सर्वांत जास्त नुकसान झालेल्या पक्षाचे असे मत होते की, फेडरल सरकारने जैविक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी या गुरांची हत्या केली आहे. यावेळी सरकारविरोधात इतके वैर पसरले होते, की नेब्रास्का नॅशनल गार्डने सरकारच्या सुरक्षेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर 2000 फूट उंचावरून उडविण्याचे आदेश दिले होते. कारण, घाबरलेल्या पशुपालकांनी हेलिकॉप्टरवर बंदुकीमधून गोळ्यांचा मारा करणे सुरू केले होते.

इतरांनी पृथ्वीवरील अज्ञात प्राण्यांना दोष दिला. फिल्म मेकर, सायन्स रिपोर्टर आणि स्टॅनफोर्ड-सुशिक्षित लेखक लिंडा मौल्टन यांनी "अ स्ट्रेंज हार्वेस्ट' या डॉक्‍युमेंटरीच्या माध्यमातून 1 हजाराहून अधिक प्राण्यांच्या विकृतीच्या प्रकरणावर नजर टाकली. त्यासाठी त्यांना 1980 मध्ये एम्मी ऍवॉर्ड देखील मिळाला. त्यानंतर 1989 मध्ये "प्राण्यांच्या विकृतीसंबंधित पुरावा' असे एक पुस्तक आले. त्यामध्ये अनेकदा संशोधन केल्यानंतर प्राणी विकृतीच्या घटनांमध्ये बाहेरच्या लोकांचा समावेश असल्याचा निष्कर्ष तिने काढला. सप्टेंबर 1967 मध्ये कोलोरॅडो येथील अलामोसामध्ये मृत घोड्याची कातडी आढळून आली होती. घटनेच्या 24 तासातच प्राण्याचा मेंदू, फुफ्फुस, हृदय आणि थॉयराईड ग्रंथी काढून नेल्या होत्या, याचेही उदाहरण त्यामध्ये देण्यात आले होते.

पशुवैद्यक जगामध्ये संशय

काही वैद्यकीय तज्ज्ञांनी प्राण्यांच्या विकृतीबाबत बरेच स्पष्टीकरण दिले. पशुवैद्यकीय पॅथॉलॉजिस्ट या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधताना सांगतात, की सफाई कामगार प्रथम मृत प्राण्याचे मऊ मांस खातात. त्यामुळे तेच मृत प्राण्यांच्या नष्ट झालेल्या अवयवांबद्दल सांगू शकतील. जेव्हा एखादा प्राणी मरतो तेव्हा त्याचे हृदय बंद पडते आणि संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा थांबतो. त्यानुसार रक्त गोठते. त्यामुळे शरीराच्या काही भागांवर रक्त दिसत नाही, असेही मत त्यावेळी नोंदविण्यात आले. त्यानंतर वॉशिंग्टन येथील शेरीफच्या विभागाने 1979 मध्ये एक प्रयोग केला. त्यांनी एक मेलेली गाय 48 तासांसाठी शेतात ठेवली. त्यानंतर तो मृतदेह देखील विकृती झालेल्या प्राण्यांसारखाच दिसून आला. जिवाणूंमुळे त्या गाईची त्वचा फाटल्यासारखी दिसत होती, ज्याची तुलना काही पशुपालकांनी कुष्ठरोगासोबत केली. त्यानंतर प्राण्यांचे अवयव स्वच्छ करण्यात आले.

कृषी इतिहासकार मायकेल गोलेमन यांनी सांगितले, की गुरा-ढोरांच्या विकृतीच्या 70 च्या दशकातील अहवालांमुळे स्वतंत्र, लहान-पाळीव प्राण्यांच्या पशुपालकांना त्यांची आर्थिक चिंता आणि कृषी जीवनात सरकारी हस्तक्षेपाबद्दलची नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली. गोलेमन यांच्यानुसार, प्राण्यांच्या अज्ञात मृत्यूमध्ये नेहमी पाळीव प्राण्यांचे मृत्यू झाले. आधीच्या काळात नोंदवलेल्या प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणात निश्‍चितच वाढ झाली होती. मात्र, ज्यावेळी पशुपालकांचे उद्योग वाढले त्या काळात अशा घटना जास्त समोर आल्या. 1970 च्या दशकात अमेरिकेने बऱ्याच राष्ट्रांना धान्य पाठवले आणि देशांतर्गत गुरांच्या चाऱ्याची किंमत वाढविली. त्यावेळी अध्यक्ष रिचर्ड निक्‍सॉन यांनी महागाईचा सामना करण्यासाठी गोमांसाची किंमत अधूनमधून कमी करण्याचा प्रयत्न केला.

गुरंढोरं पाळणारे त्या काळात अडचणीत सापडले. त्यानंतर 1975 मध्ये कृषी समितीच्या सिनेट बैठकीमध्ये अमेरिकन नॅशनल कॅटलमॅन असोसिएशनच्या अध्यक्षांनी, उद्योगधंदे अडचणीत असून 5 बिलियन डॉलरचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर युक्तिवाद करताना गोलेमन यांनी, 70 च्या दशकात प्राण्यांच्या विकृतीपूर्ण झालेल्या हत्या या कोलेरॅडो आणि मेक्‍सिको या भागात झाल्या होत्या, ज्या ठिकाणी सरकारच्या वाटाघाटीमध्ये कमी पशुपालकांचा समावेश आहे, असे म्हटले होते. टेक्‍सासमध्ये देखील अधिक प्रमाणात गुरेढोरे असून अशा घटनांनी नोंद अत्यल्प असल्याचं निरीक्षणही त्या वेळी नोंदविण्यात आलं. कारण, प्राण्यांच्या विकृती प्रकरणांमध्ये भौगोलिक आणि वेळ अशा दोन्ही गोष्टींना ग्राह्य धरण्यात आले होते.