Twitter- मस्कच्या चक्रमपणामुळे ट्विटर खड्ड्यात जाईल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk}

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

केतन जोशी

मस्कसारख्या चक्रम माणसाने ट्विटर विकत घेतलं आणि पक्षी मुक्त झाल्याचं सांगितलं. पण हा पक्षी खरंच मुक्त होणार की मस्कच्या विक्षिप्तपणामुळे आर्थिक गर्तेच्या पिंजऱ्यात अडकणार?

झिप २ आणि पेपॅल ह्या कंपन्यांमधील स्वतःचा हिस्सा विकून, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी २०० मिलियन डॉलर्स कमावलेला माणूस एलॉन मस्क. साधारणपणे सन २००० च्या आसपास इतके पैसे ह्या माणसाने कमावून झाले होते.

तुम्हाला जर आठवत असेल तर ह्याच दरम्यान सबीर भाटिया नामक अमेरिकास्थित भारतीय व्यक्ती, 'हॉटमेल' ह्या मेल सर्व्हिसची जनक होती आणि पुढे १९९८ मध्ये आपलं तंत्रज्ञान आणि कंपनी बिल गेट्स ह्यांच्या मायक्रोसॉफ्टला विकून, सबीर भाटियांनी तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्स कमावले होते. त्यावेळेस ह्या रकमेचा बोलबाला झाला होता. पण पुढे सबीर भाटियांची गाडी फारशी सरकली नाही. आज ते अमेरिकेत तंत्रज्ञान आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करत आहेत, पण १९९० च्या दशकांत इतकी अवाढव्य रक्कम एकदा कमावल्यावर पुढे त्यांच्याकडून नवीन काही घडल्याचं ऐकिवात नाही.

हेही वाचा:

इथेच एलॉन मस्क हा माणूस वेगळा ठरतो. वयाच्या तिसाव्या वर्षी २०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असणाऱ्या माणसाने एकापेक्षा एक मोठी स्वप्न पाहिली, ती पाहताना स्वार्जित संपत्ती पणाला लावली आणि दोनदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर देखील उभा राहिला. आपण मानवी जीवनात काहीतरी क्रांती करायला आलो आहोत आणि खरंतर मानवी समूहाला आपल्या रूपात वरदान मिळालं आहे असं वाटणारा हा माणूस आहे.

ज्याला मंगळावर स्वारी करण्याची स्वप्न पडतात, विजेवर चालणाऱ्या गाड्या जगभर याव्यात आणि त्यातून अमेरिकेचं आणि जगाची खनिज तेलावरचं अवलंबत्व संपावं ही इच्छा बाळगणारा माणूस, त्याच्या सहकाऱ्यांशी निर्दयीपणे वागतो, त्यांची शब्दशः पिळवणूक करतो, त्याची मतं चक्रम आहेत, कोव्हिडची लस घेण्याला याने विरोध केला, पण स्वत: मात्र लस घेतली. इतकं करून थांबेल तर तो मस्क कसला. त्याने 'सरकार लस घेण्याच अशी सक्ती करू शकत नाही.' असं म्हणत आकांडतांडव केलं.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

मस्कचं एक फार प्रसिद्ध मत आहे की माणसाने नवनवीन कल्पना राबवाव्यात, धाडसी प्रयोग करावेत, शोध लावावेत, हे करताना पैसे गेले तरी खंत बाळगू नये, कारण थॉमस अल्वा एडिसन ह्यांचे सुद्धा असंख्य प्रयोग फसलेच की. मस्क स्वत: सुद्धा असाच वागतो. थोडक्यात हा माणूस धाडसी आहे आणि एखादा अतार्किक वाटणारा निर्णय घेताना तो मागचा पुढचा विचार करत नाही.

याच माणसाने ट्विटर विकत घेण्याची प्रक्रिया सुरु केली. थोड्याच दिवसांत, 'छे हा बुडीत व्यवहार आहे' म्हणून माघार घेतली. मग घुमजाव करत आत्ता २७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याने तब्बल ४४ बिलियन डॉलर्सला त्याने ट्विटर विकत घेतलं. यात त्याने स्वत:चे २६ बिलियन डॉलर्स तर टाकलेच पण टेस्ला मोटर्समधला स्वत: च्या हिश्याचा एक भाग विकून आणखी ८ बिलियन डॉलर्स टाकले तर उरलेले पैसे हे त्याने कर्जरुपात घेतले आहेत, ज्यावर त्याला व्याजापोटी दरवर्षाला १.३ बिलियन डॉलर्स द्यावे लागेल.

ट्विटर घेतल्या घेतल्या त्याने आज पक्षी मुक्त झाला असं ट्विट केलं, पण हा पक्षी कोणापासून मुक्त झाला? याबद्दल कोणताही खुलासा नाही. अर्थात मस्कचा स्वभाव पाहता, हे वागणं अगदी अपेक्षितच आहे. ट्विटर हा व्यवसाय ज्या पद्धतीने सुरु आहे त्यामुळे दर ट्विटर दर महिन्याला ४ दशलक्ष डॉलर्स गमावत आहे, असा दावा मस्क करतो. बरं, ट्विटरच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब, टिकटॉक ह्याच्याशी केली तर फारच नगण्य आहे. मग इतक्या अट्टल व्यावसायिकाने इतकी अबब रक्कम गुंतवत, तोट्यात चाललेली ट्विटरसारखी कंपनी का विकत घेतली?

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

याचं कारण आहे कारण ट्विटरवर सो कॉल्ड टिवटिव करणारी लोकं. जगाचं मत बनवणाऱ्या किंवा त्याला आकार देणाऱ्या बहुतांश लोकांचं वास्तव्य ट्विटरवर असतं. जगातील तमाम राजकारणी, पत्रकार, अभ्यासक, विश्लेषक, उद्योजक ह्यांच्यासाठी ट्विटर हा मत बनवण्यासाठी आणि दृष्टिकोन पसरवण्यासाठी अत्यंत आवश्यक माध्यम आहे.

ट्विटरचे वापरकर्ते हे फक्त २४० दशलक्ष इतकेच आहेत पण त्यांच्यात जगाचं मत बनवण्याची आणि बदलवण्याची ताकद आहे.

ट्विटरवर अगदी पहिल्यापासून मध्यममार्गी आणि डावे ह्याचंच प्राबल्य राहिलं आहे आणि जगात अतिउजव्या विचाराच्या लोकांनी कितीही मोठ्या ट्रोल सेना ट्विटरवर उतरवल्या तरी प्रतिवाद हा शिवीगाळ करून नव्हे तर मुद्देसूद उत्तराने द्यायचा असतो, हे लक्षात आल्यामुळे शेवटी डावे आणि मध्यममार्गी हेच ट्विटरवर राज्य करत राहिले.

त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्पसारख्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाला, द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून हाकललं होतं. यावर ट्रम्प आणि एलॉन मस्क ह्या दोघांनी खूप थयथयाट केला होता. या घटनेला १.५ ते २ वर्ष झाली आणि इतक्यातच एलॉन मस्क ह्यांनी ट्विटर विकत घेतलं.

मस्कने ट्विटर विकत घेतलं तेव्हा ट्विटरमध्ये ७५०० कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हकालपट्टी सुरु झाली. अनेक मोठ्या पदांवरचे कर्मचारी काही तासांत काढले गेले, पराग अग्रवाल ह्या सीईओलाच काढून टाकलं. ट्विटरच्या प्रॉडक्ट डिव्हिजनमधले अत्यंत मोलाचे कर्मचारी निर्दयीपणे काढले गेले. त्यामुळे ट्विटरची प्रॉडक्टस कशी चालणार याबद्दल शंका आहे.

'दणकून काम करा किंवा घरी जा' असं म्हणणाऱ्या मस्कला या सगळ्यातून एक थेट संदेशच द्यायचा होता जणू. तो संदेश म्हणजे, जे माझं ऐकतील तेच इथे राहतील आणि जे राहतील ते माझे गुलाम असतील. अर्थात हे अमान्य असलेली लोकंही आहेतच. त्या अनेकांनी ट्विटरच्या नोकरीला राम राम ठोकायला सुरूवात केली आहे. आज अशी परिस्थिती आहे की ट्विटर चालवणार कोण? हा प्रश्नच आहे.

त्यात ट्विटरचा ९०% महसूल जाहिरातीतून येतो. मस्क महाशय ह्यांचा एकूणच जाहिरात करणे ह्यालाच विरोध. टेस्ला मोटर्सच्या जाहिराती करून विकायच्या नाहीत, उलट जाहिरातींचं बजेट प्रॉडक्ट चांगलं करण्यावर खर्च करा असं म्हणणारे मस्क.

त्यात आता अतिउजव्या किंवा टोकाच्या विचाराच्या कॉन्टेन्टला पण स्थान द्यायचं असं मस्क ह्यांनी ठरवलं आहे, त्यामुळे आपल्या उत्पादनाची जाहिरात ही कुठल्यातरी विषारी ट्विटच्या खाली येईल ह्या धास्तीने अनेक उद्योगसमूहांनी ट्विटरवरून जाहिराती काढून घ्यायला सुरुवात केली आहे. थोडक्यात सगळंच गंडलंय अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

थोडक्यात मस्क ह्यांच्यामुळे ट्विटर खड्ड्यात जाईल अशी परिस्थिती आहे. असं होईलच का? तर उत्तर नाही किंवा हो दोन्ही देता येईल. कारण आजसुद्धा ट्विटरकडे २४० दशलक्ष वापरकर्ते आहेत आणि मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे समर्थक ट्विटरवर वाढायला लागलेत. त्यामुळे वापरकर्ते हा मुद्दा कदाचित चिंतेचा विषय राहाणार नाही.

प्रश्न आहे, मध्यममार्गी विचारांचे, विश्लेषक, अभ्यासक हे राहतील का ? कदाचित नाही पण अर्थात त्यांच्याकडे ट्विटरच्या ताकदीचं दुसरं माध्यम पण नाही.

पण तरीही ट्विटर आर्थिककदृष्ट्या खड्ड्यात जाण्याची शक्यता तितकीच मोठी आहे. असं झालं तरी लोकं मस्क ह्यांच्या चक्रमपणाला जबाबदार धरतील. पण इतका अवाढव्य व्यवसाय उभारणारी व्यक्ती चक्रम असत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे नक्कीच एक ठोस विचार असतो.

ट्विटरवर अतिउजव्यांना नियंत्रण हवं होतं, ते कदाचित आता सहज येईल. राहिलाच प्रश्न इतक्या अवाढव्य गुंतवणुकीचा तर अमेरिकेत आणि जगभरातील उजव्या विचाराच्या महाबलाढ्य उद्योगपतींसाठी ४४ बिलियन डॉलर्स ही रक्कम किरकोळ आहे आणि २०२४ च्या अमेरिकन राष्ट्रध्यक्षाच्या स्पर्धेत ट्रम्प उतरलेत, ते बलाढ्य व्यावसायिक आहेत, ट्विटर ताब्यात आणल्याने जर त्यांच्या शर्यतीतले अडथळे दूर होणार असतील तर ट्विटर चालत राहील ह्याची तजवीज ट्रम्प सुद्धा करू शकतातच की.

त्यामुळे ट्विटर कसं चालणार आणि कोण वाचवणार हे बघणं औत्स्युक्याचं आहे.