esakal | एक अमेरिकी महिला आणि नाझी स्पाय नेटवर्क

बोलून बातमी शोधा

Elizabeth Friedman }
एक अमेरिकी महिला आणि नाझी स्पाय नेटवर्क
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

जगात विनाशकारी पहिले व दुसरे महायुद्ध घडून आले. त्यानंतर जगावर चांगले व वाईट परिणाम झाले. काहींनी पराक्रम गाजवणारी कामगिरी केली, त्यांचा इतिहास जगासमोर मांडण्यात आला. आजही या महायुद्धांचा उल्लेख झाल्यावर पराक्रमींचा इतिहास समोर येतो. मात्र या दोन्ही महायुद्धांमध्ये एका अमेरिकन महिला कोडब्रेकरने ऐतिहासिक कामगिरी बजावली; मात्र तिचा इतिहास जगासमोर आलाच नाही. कोण आहे ती अमेरिकन महिला कोडब्रेकर अन्‌ कशी होती तिची ऐतिहासिक कामगिरी? का आली जगासमोर तिची कामगिरी? जाणून घ्या सविस्तर...

मार्च 1942 मध्ये, एलिझाबेथ स्मिथ फ्रीडमॅन नावाच्या अमेरिकन कोडब्रेकरने एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती शोधून काढली होती. लॅटिन अमेरिकेतील नाझी हेरांनी ब्राझीलच्या किनाऱ्यावर क्वीन मेरी नावाचे एक मोठे अलाइड सप्लाई जहाज शोधून काढले होते आणि जर्मन यू-बोटी ते बुडविण्याच्या विचारात होते. हे जहाज उद्‌ध्वस्त करण्यासाठी ऍडॉल्फ हिटलरला 2,50,000 डॉलर्स ऑफर केले होते. फ्रीडमॅनच्या या माहितीमुळे क्वीन मेरी आणि यू-बोट्‌स बुडण्यापासून वाचवता आल्या. यामुळे जहाजातील 8000 पेक्षा जास्त सैनिकांचे प्राण वाचले.

फ्रीडमॅन अमेरिकेच्या पहिल्या क्रिप्टनलिस्टांपैकी एक होत्या आणि दुसऱ्या महायुद्धात लॅटिन अमेरिकेतील नाझी गुप्तचरांचे माहितीचे जाळे तोडण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कामाचे स्वरूप हे संवेदनशील असल्यामुळे त्यांना त्यांच्या युद्धकाळातील सेवेबद्दल जाहीरपणे बोलण्याची परवानगी नव्हती. मरेपर्यंत फ्रीडमॅन यांनी त्यांच्या कामाचे रहस्य शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवले. त्यांचा मृत्यू 1980 मध्ये झाला. दरम्यान जे. एडगर हूवरने टीमवर्कच्या नावाखाली आणि एफबीआयच्या संबंधित असल्यामुळे त्यांच्या कामाचे श्रेय लाटले. एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर इतिहासकार आणि संशोधकांनी त्यांच्या युद्धकाळातील योगदानाची माहिती जगासमोर आणली.

शेक्‍सपियरच्या गुप्त संदेशांचे परीक्षण करण्यापासून करिअरला सुरवात

एलिझाबेथ स्मिथ यांचा जन्म 1892 मध्ये इंडियानाच्या हंटिंग्टन येथे झाला होता. त्यांनी आपल्या करिअरची सुरवात 1916 मध्ये क्रिप्टेनालिसिस म्हणून केली. कर्नल जॉर्ज फॅब्यान नावाच्या श्रीमंत व्यक्तीने इलिनॉय येथे काही वर्षांपूर्वी केलेल्या रिव्हरबॅंक प्रयोगशाळांमध्ये नोकरीसाठी त्यांची नियुक्ती केली. कर्नल जॉर्ज फॅब्यान हे कॉन्स्पिरसी सिद्धांतवादी होते, ज्याचा असा विश्वास होता की सर फ्रान्सिस बेकन यांनी विल्यम शेक्‍सपियर यांच्या नाटकांचे आणि कवितांचे खरे लेखक आहेत. एलिझाबेथ यांचे मुख्य काम शेक्‍सपियरच्या गुप्त संदेशांचे परीक्षण करणे हे होते. फॅब्यान यांना वाटत होते, की बेकनने नाटक आणि कवितांमध्ये शेक्‍सपियरचे गुप्त संदेश समाविष्ट केले आहेत.

रिव्हरबॅंकवरच एलिझाबेथ यांना आपल्या जीवनाचा साथीदार भेटला. त्या साथीदाराचे नाव होते विल्यम फ्रेडरिक फ्रीडमॅन. पुढे 1917 मध्ये दोघांनीही लग्न केले. एलिझाबेथ आणि विल्यम दोघांनाही फॅब्यान यांच्यासाठी काम करताना कळले, की "बाकोनीयन सिद्धांत' हा काही खरा नाही (या जोडप्याने नंतर नवा सिद्धांत सुरू केला, त्यांच्या 1957 मध्ये प्रकाशित झालेल्या "द शेक्‍सपियरन सिफर्स एक्‍झामिनर्ड'मध्ये मांडला.). हे काम करत असताना त्यांना त्यांची कोडब्रेकिंग कौशल्ये वेगळ्या मार्गाने वापरण्याची संधी मिळाली, जेव्हा अमेरिकेने पहिल्या महायुद्धात प्रवेश केला आणि युद्धपातळीवरील मदतीसाठी रिव्हरबॅंकची निवड करण्यात आली.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी फ्रीडमॅन यांनी एका अनधिकृत कोडब्रेकिंग टीमला मार्गदर्शन केले आणि 1921 मध्ये ते वॉशिंग्टन डीसी येथे युद्ध विभागासाठी काम करण्यासाठी गेले. काही वर्षांनंतर एलिझाबेथ यांनी तटरक्षक दलाच्या क्रॅकिंग कोडवर काम करण्यास सुरवात केली, ज्यामुळे बंदीच्या वेळी बूटलेटर्सची ओळख पटविण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास मदत झाली. या कामासाठी त्यांनी एक कोडब्रेकिंग युनिट तयार केले. या युनिटच्या निर्मितीनंतर फ्रीडमॅन अमेरिकन सरकारमध्ये कोडब्रेकिंग टीम चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची सुरवात झाली. कोस्ट गार्ड ट्रेझरीमधून नेव्ही विभागात समाविष्ट करण्यात आले. नेव्हीने महिलांना युनिट चालविण्यास परवानगी दिली नाही. अचानक फ्रीडमॅन स्वत:ला नवीन पुरुष बॉसच्या हाताखाली करावे लागले. विविध प्रकल्पांवर काम करताना फ्रीडमॅन यांना वाटले, की हे काम त्यांच्या कौशल्यासाठी योग्य नाही. तरीही त्यांनी त्यांच्या कोडब्रेकिंगच्या माध्यमातून युद्धाच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

फ्रीडमॅन यांनी नाझी स्पाय रिंगलॅडर ओळखले

फ्रीडमॅन यांनी लॅटिन अमेरिकेतील नाझी गुप्तचर रिंगवर काम करणे निवडले नाही, असे लेखक आणि इतिहास संशोधन करणारे ऍमी बटलर ग्रीनफिल्ड म्हणतात. फ्रीडमॅन खरोखर या मोहिमेमुळे उत्साही नव्हत्या. कारण, एकदा बोलताना त्या म्हणाल्या होत्या, की युद्धादरम्यान माझी नेमणूक ही योग्य ठिकाणी होती, असे मला वाटत नाही. ग्रीनफिल्ड असे म्हणण्याचे कारण, फ्रीडमॅन यांना अत्यंत गुंतागुंतीचे कोड तोडण्याची सवय होती. युद्धाच्या वेळी जपानी आणि जर्मन सरकार गुंतागुंतीचे कोड वापरत असत. त्या तुलनेत लॅटिन अमेरिकेत नाझी हेरांकडून वापर होणारे कोड खूपच सोपे होते. फ्रीडमॅनला असे वाटायचे, की त्या कठीण आणि गुंतागुंतीचे कोड तोडण्यासाठी अधिक उपयुक्त ठरल्या असत्या. "मी मोठ्या आव्हानांसाठी पात्र आहे' अशी फ्रीडमॅन यांची भावना असायची. असं असलं तरी, फ्रीडमॅन यांनी अलाइड युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

एलिझाबेथ स्मिथ फ्रीडमॅन कलेक्‍शन असलेल्या जॉर्ज सी. मार्शल फाउंडेशनच्या ग्रंथालय आणि संग्रहण संचालक, मेलिसा डेव्हिस म्हणतात, एलिझाबेथला तिच्या कामाचे महत्त्व चांगलेच ठाऊक होते. जेव्हा सैनिकांची वाहतूक हजारो सैनिकांनी भरलेली युनायटेड स्टेट्‌स सोडत होती, तेव्हा नाझी गुप्तहेर हे पाहात होते आणि ही माहिती विशेषत: त्या पाणबुड्यांपर्यंत पोचविली जात असे; जेणेकरून नाझी हे सैनिकांच्या जहाजांना अडवून बुडवू शकतात. त्यामुळे फ्रीडमॅन यांना माहीत होते, की ती हजारो लोकांचे प्राण वाचवत आहे. फ्रीडमॅन यांची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजेच नाझी गुप्तहेराला शोधून काढणे. त्याचे नाव होते जोहानस सिगफ्राइड बेकर. त्याने सार्गो हे कोडनेम धारण केले होते, जो जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यात युती करण्याचा प्रयत्न करीत होता.

ग्रीनफिल्ड म्हणतात, की, एलिझाबेथ यांचे सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर मी सांगू शकतो, एक अशी व्यक्ती जहाजावर प्रथम आली होती. अनोळखी आणि संशयास्पद व्यक्ती जहाजावर आल्यानंतर ते जहाज थांबविले गेले आणि त्या गुप्तचराला ताब्यात घेऊन लंडनला आणण्यात आले. त्याने सर्व काही कबूल केले आणि त्या हेरगिरीच्या रिंग्जबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती दिली. हे सर्व शक्‍य झाले अर्थातच फ्रीडमॅन यांच्यामुळेच.

डॉल शॉप आणि जपान सरकारला मेसेज

दुसऱ्या महायुद्धात वेल्वाली डिकिन्सन या गुप्तहेर महिलेच्या कोडचे परीक्षण केले होते. एक गोरी अमेरिकन महिला होती, जिचे न्यूयॉर्क शहरात बाहुल्यांचे दुकान होते. त्या दुकानातूनच ती जपान सरकारला तिने कोडित संदेश पाठवला. एफबीआयचे संचालक जे. एडगर हूवरने डिकिन्सनच्या अटकेचा आणि ट्रायलचा वापर त्यांच्या ब्यूरोकडे लक्ष वेधण्यासाठी केला. परंतु जे. एडगर हूवरने हे सांगितले नाही, की फ्रीडमॅन यांनी डिकिन्सनच्या कोडित पत्रांचा आढावा घेतला आणि त्या पत्रात नेमका मजकूर काय आहे हे सांगितले.

जरी एलिझाबेथ आणि त्यांचे पती विल्यम या दोघांनी युद्धाच्या काळात विविध प्रकारचे कोडब्रेकिंग केले, तरी विल्यमला त्याच्या कामाचे अधिक सार्वजनिक श्रेय मिळाले. कारण, अमेरिकेला पर्ल हार्बरवर जपानी हल्ल्याची पूर्वसूचना होती की नाही, या तपासादरम्यान त्याला साक्ष द्यायची होती. याबाबतीत मात्र एलिझाबेथ फ्रीडमॅन या कमनशिबी ठरल्या.