esakal | स्वतःवर गोळ्या घालणाऱ्या सैनिकांना फ्लाइंग किस देणारी जगातली सर्वांत सुंदर गुप्तहेर !
sakal

बोलून बातमी शोधा

Mata Hari}

स्वतःवर गोळ्या घालणाऱ्या सैनिकांना फ्लाइंग किस देणारी जगातली सर्वांत सुंदर गुप्तहेर !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

आजवर अनेक धाडसी गुप्तहेरांच्या कथा तुम्ही वाचल्या असतील. मात्र चित्रपटाची कथा वाटावी अशी ही एक सत्यकथा... एका सुखवस्तू कुटुंबात जन्म झालेली... सर्व सुखसोयींचा उपभोग घेणारे कुटुंब... अचानक वडील दिवाळखोर झाले... लहान वयात सुखी आयुष्याला कलाटणी मिळाली... आईवडिलाचा घटस्फोट झाल्याने कुटुंब विस्कळित... बापाने दुसरे लग्न करून आपल्या अपत्यांना वाऱ्यावर सोडले... मग "तिने' बालक मंदिरात शिक्षिकेची नोकरी पत्करली... परंतु तिथल्या मुख्याध्यापकाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला... त्यामुळे तिला आपली नोकरी गमवावी लागली... तिथून ती आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्यास गेली... एका अल्पवयीन मुलीचा शिक्षिकेपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध मादक नृत्यांगना म्हणून ओळख देऊन गेला... पुढे तिने गुप्तहेर म्हणून काम केले... तिचे आयुष्यच अतिशय गुंतागुंतीचे झाले... मात्र शेवटी तिला गोळ्या घालण्यात आल्या... कोण आहे ही नृत्यांगना, जिने स्वत:वर गोळ्या घालणाऱ्या सैनिकांना फ्लाइंग किस देत जगाचा निरोप घेतला...

तिचं नाव माता हारी. पाउलो कोहलो नावाच्या जगप्रसिद्ध लेखकाने या बाईबद्दल "द स्पाय' नावाचे पुस्तक लिहिले. माता हारी म्हणून जरी तिची ओळख असली तरी तिचे खरे नाव होते गेरतृद मार्गारेट जेले. तिचा जन्म सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा 7 ऑगस्ट 1876 चा. नेदरलॅंडमध्ये ती जन्मली, पण ती लहानाची मोठी पॅरिसमध्ये झाली. ती एक उत्तम नर्तिका होती आणि गुप्तहेरही होती. आपल्या या प्रतिभेचा वापर तिने खूप चांगल्या पद्धतीने करून घेतला. पहिल्या महायुद्धात ती जर्मनीसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती आणि त्यातच सापडल्याने तिचा अंत झाला.

तिचं लहानपण तितकंसं सुखावह नव्हतं. तिच्या आईवडिलाचा घटस्फोट झाला होता आणि तिच्या आईचादेखील मृत्यू झाला होता. तिच्या बापाने दुसरे लग्न केले होते. ती बालवाडी शिक्षिकेचे प्रशिक्षण घेत होती पण तिथे मुख्याध्यापकाने तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केल्याने तिला ती शाळाही सोडावी लागली. पुढे ती आपल्या नातेवाइकांकडे हेग येथे पोचली. मार्गारेट 18 वर्षांची झाली होती आणि या वयाच्या ज्या काही मागण्या असतात त्या तिलाही छळू लागल्या होत्या. एके दिवसशी तिने वर्तमानपत्रात लग्नाची जाहिरात बघितली. एका डच आर्मी कॅप्टन रुडॉल्फ मॅक्‍लिऑडने ही जाहिरात दिली होती. त्या वेळी तो "डच ईस्ट इंडीज' म्हणजे आताच्या इंडोनेशिया येथे राहात होता. मार्गारेटने त्याच्याशी 1895 मध्ये ऍम्स्टरडॅम येथे लग्न केले. या लग्नाने ती डच कुटुंबाच्या वरच्या श्रेणीत गेली व पुन्हा एकदा तिला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली.

नवऱ्यासोबत मार्गारेट मलंग या जावा बेटाच्या पूर्वेला असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आली. एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये त्यांना झाली. या लग्नामुळे तिचा उच्चभ्रू डच वर्गात प्रवेश झाला आणि ती पूर्व जावा बेटांवरच्या शहरात राहायला गेली. तिचा नवरा रुडॉल्फ मॅक्‍लिऑड हा चांगलाच श्रीमंत होता. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली होती; पण त्यापलीकडे या लग्नात काही सुखावह नव्हतं. नवरा प्रचंड संशयी आणि दारूडा होता. तिच्यापेक्षा तो वीस वर्षांनी मोठा होता आणि सतत तिला मारहाणही करत होता. शेवटी या सर्व जाचाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला. पण या सगळ्या प्रकरणात तिचा मुलगा आजारी पडल्याने त्याचे निधन झाले. मुलीची कस्टडी मिळाली पण नवऱ्याने आर्थिक मदत न केल्याने तिला उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे भाग पडले. हे सगळं तिच्यासोबत घडलं नसतं तर ती कदाचित गुप्तहेर बनलीही नसती.

जावा बेटांवर मात्र मार्गारेटने इंडोनेशियन परंपरांचा चांगलाच अभ्यास केला होता. तिथे ती जावा बेटांवरचं नृत्यही शिकली होती. याचा फायदा तिनं पुढच्या आयुष्यात स्वत:ला भारतीय, जावा आणि कुठल्या-कुठल्या वंशाची म्हणवून घेण्यासाठी करून घेतला. तिनं तिचं माता हारी हे नाव मलाया भाषेतूनच घेतलं होतं. लग्न मोडल्यानंतर तिनं चरितार्थासाठी डान्स प्रोग्राम करायला सुरवात केली. अतिशय सुंदर, शब्दाची पक्की, मादक बोलणारी, शरीरप्रदर्शन करण्यास न लाजणारी असल्याने ती लवकरच प्रसिद्ध झाली. जावा बेटावरची हिंदू वंशाची राजकुमारी असल्याची ती सगळीकडे ओळख सांगत असे. नृत्य करत करत अंगावरचे कपडे काढण्याची तिची पद्धत तुफान हिट झाली होती. अर्थात ती पूर्णपणे नग्न होऊन कधीच तिच्या प्रेक्षकांसमोर आली नाही. ब्रेस्टप्लेट्‌स आणि गळ्यात-डोक्‍यावर काही दागिने अशा वेशभूषेत तिच्या नृत्याची सांगता होत असे. यामुळेच तिच्या कार्यक्रमांचं तिकीट सामान्यांना परवडणारं नसे. कालांतराने तिचं वय होत गेलं. तिच्यासमोर अनेक नृत्य करणाऱ्या इतर स्त्रिया आल्या अन्‌ गेल्याही. माता हारीचं वयोमानानुसार वजन वाढू लागलं, मात्र तरीही तिची लोकप्रियता कायम राहिली. ती तोवर यशस्वी गणिका झाली होती आणि सौंदर्यापेक्षा ती तिच्या कामुकता, प्रणय आणि मादकतेसाठी ओळखली जायची. तिचा शेवटचा नृत्याचा कार्यक्रम 1915 ला झाला असं सांगितलं जातं.

नृत्यांगना असण्याच्या काळात तिच्या ओळखी विविध शाखांमधल्या वरिष्ठ सैन्य अधिकारी, मोठे राजकारणी आणि इतर मोठ्या लोकांसोबत झाल्या होत्या. या सामर्थ्यशाली लोकांमुळे ती एका देशातून दुसरीकडे सहज जात असे. पहिलं महायुद्ध सुरू होईपर्यंत ती एक मनस्वी कलाकार म्हणून ओळखली जात असे, नंतर मात्र बेलगाम पण दिल्या शब्दांची पक्की आणि एक धोकादायक मदनिका म्हणून तिच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. या सगळ्यांचा शेवट तिने हेरगिरी करण्यात झाला.

महायुद्धादरम्यान तिची जन्मभूमी असलेला नेदरलॅंड्‌स देश तटस्थ होता. साहजिकच माता हारी सहज परदेशवाऱ्या करत असे. यादरम्यान ती कॅप्टन मास्लोव्ह या फ्रान्ससोबत काम करणाऱ्या रशियन वैमानिकाच्या प्रेमात पडली होती. 1916 मध्ये हा मास्लोव्ह जर्मन लोकांसोबतच्या चकमकीत जखमी झाला आणि त्याची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. त्याला भेटण्यासाठी माता हारीने युद्धभूमीवरच्या हॉस्पिटलात जाण्याची परवानगी मागितली. तटस्थ देशाची नगरिक असल्याने तिला ही परवानगी मिळाली नाही; परंतु फ्रान्ससाठी हेरगिरी करण्यास ती तयार असेल तर परवानगी मिळेल असं तिला सांगण्यात आलं. युद्धापूर्वी जर्मन राजकुमारासमोर तिने नृत्याचे कार्यक्रम केले असल्याने तिचा जर्मन गोटात सहज शिरकाव होईल आणि आपल्या मादक सौंदर्याने ती हवी ती गुप्त माहितीही मिळवू शकेल असा फ्रेंच अधिकाऱ्यांचा कयास होता. प्रत्यक्षात या जर्मन राजकुमाराचा युद्धात खूप कमी सहभाग होता आणि त्याला सर्वांसमोर पराक्रमी - मुत्सद्दी म्हणून सादर केले जात असले तरी मुळात तो बाया अन्‌ बाटल्यांमध्ये गुंतलेला विलासी माणूस होता. त्याला रणनीतीची अजिबातच माहिती नव्हती.

फ्रेंच अधिकाऱ्यांनी या राजकुमाराकडून जर्मन युद्धनीतीची माहिती मिळवून देण्यासाठी दहा लाख फ्रॅंक्‍सची माता हारीला ऑफर दिली होती. पण माता हारीनं राजकुमारासोबत भेट घडवून देणाऱ्या अधिकाऱ्याने उलट प्रस्ताव ठेवताच तिने फ्रान्सची गुपिते जर्मनीला विकण्याचं कबूल केलं. थोडक्‍यात, माता हारी डबल एजंट झाली आणि सुरू झाला तिचा डबल हेरगिरीचा प्रवास. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती काढून घेणे हे तिचे काम. तिच्या सौंदर्यावर फिदा झालेले फ्रान्सचे अधिकारी तिला कशासाठी नाही म्हणणे अशक्‍यच होते. हळूहळू कित्येक गोष्टी तिने जर्मन सैन्याला कळवल्या.

पण जे इतरांसोबत घडते तेच तिच्यासोबत झाले. हेरगिरी करणाऱ्या लोकांचा अंत हा ठरलेला असतो. फ्रान्स सैन्याला त्यांची गुपितं फुटल्याचा सुगावा लागला होता. एच-21 असं सांकेतिक नाव असलेल्या एजंटकडून जर्मन सैन्याला सगळी माहिती पुरवण्यात येत आहे, याची खात्रीशीर माहिती फ्रान्सला मिळाली. आता या एच-21 चा शोध घ्यायला त्यांनी सुरवात केली. त्यातच बर्लिनला पाठवण्यात येत असलेल्या टेलिग्राममध्ये माता हारीचे नाव, पत्ता, बॅंक डिटेल्स, एवढेच नाहीतर तिच्या विश्वासू मोलकरणीची माहिती एवढ्या गोष्टी हाती आल्या. सगळे धागेदोरे तपासल्यावर एच-21 दुसरे कुणी नसून माता हारी असल्याचे त्यांना समजले. इकडे जर्मन सरकार माता हारीवर हवी तितकी महत्त्वाची युद्ध माहिती न देता पॅरिसमधल्या अधिकारी आणि राजकारण्यांच्या नुसत्या लफड्यांची माहिती दिल्याबद्दल नाराज होते. म्हणून त्यांनी तिला जर्मनीची फ्रान्समधली गुप्तहेर म्हणून उघडे पाडले.

माता हारीच हेरगिरी करत असल्याचे पुरेसे पुरावे फ्रान्सकडे नव्हते. मात्र युद्धात झालेल्या पराभवाने चिडलेल्या फ्रान्सने तिला डबल एजंट म्हणत दोषी ठरवले. पुरावा म्हणून तिच्या मेकअप किटमधली एक खास शाई सादर केली गेली. तिच्यावर खटला भरला. 50 हजार सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला. जन्माने डच असूनही जावा राजकुमारी असण्याचा खोटा देखावा करणं तिच्याविरुद्धचा पुरावा समजण्यात आला. 1917 साली तिला 12 फ्रेंच सैनिकांकडून गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. त्या वेळी ती अवघ्या 41 वर्षांची होती. मरतानाही तिने बुरखा घालायला नकार दिला आणि तिला गोळ्या घालणाऱ्या सैनिकांकडे पाहून तिनं फ्लाइंग किस केलं होतं. असामान्य सौंदर्याची धनी असलेली माता हारी अशाप्रकारे ऐन तारुण्यात मारली गेली. तिच्याबद्दल सांगितले जाते, की जर तिने पैशांचा अतिलोभ दाखवला नसता तरी एक डान्सर म्हणून ती अजरामर ठरली असती.

कदाचित जगातल्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला एकाच वेळी दोन देशांची एजंट म्हणून काम करत आहे असे घडले होते. आजवर अनेक इतिहासकारांनी माता हारीला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. पाऊलो कोहलो यांच्या मते, तर ती फक्त एक स्वतंत्र जीवन जगणारी स्त्री होती. आजवर तिच्यावर अगदी जुन्या काळापासून कित्येक सिनेमे आले आहेत, पुस्तके लिहिली गेली आहेत. एवढं तिचं आयुष्य रंजक आहे. जेव्हा हेरगिरीबद्दल बोलतो तेव्हा शेरलॉक होम्स किंवा करमचंद किंवा व्योमकेश बक्षी यांचे नाव आपल्या मनात येते. परंतु, हेरगिरीच्या जगात सर्वांत प्रसिद्ध नाव गेरतृद मार्गारेट जेले ऊर्फ माता हरी म्हणून ओळखले जाते. इतिहासात, सुमारे पन्नास हजार लोकांच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरण्यात आलं आणि एवढंच नाही तर जर्मनीसाठी हेरगिरी करण्याचादेखील तिच्यावर आरोप आहे.