esakal | टिपू सुलतानची वंशज ‘नूर’ ब्रिटिश गुप्तहेर; जिचा निळ्या रंगाने केला घात
sakal

बोलून बातमी शोधा

Noor Inayat Khan}

टिपू सुलतानची वंशज ‘नूर’ ब्रिटिश गुप्तहेर; जिचा निळ्या रंगाने केला घात

sakal_logo
By
योगेश कानगुडे

गुप्तहेर किस्से कोणाला आवडत नाहीत? या रहस्यमय कहाण्या ऐकण्यास जितके रोमांचिक वाटते तितकेच त्या कामाला पूर्ण करणाऱ्या गुप्तहेरांमध्ये कमालीचे शौर्य आणि धैर्य असते. भारतीय वंशाची अशी एक महिला जिची गणना जगातील धैर्यवान आणि निर्भय हेरांमध्ये केली जाते. तिने दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याच्या अनेक रहस्ये चोरली होती. त्या महिलेचे नाव होते नूर इनायत खान. नूर इनायत खान ही म्हैसूरचे महाराज टीपू सुलतान यांची वंशज होती. हेच प्रसिद्ध टीपू सुलतान ज्यांनी ब्रिटीश राजवटीसमोर झुकण्यास नकार दिला होता.

जगभरातील हेरगिरीच्या इतिहासात नेदरलँडच्या मदर हरीचे नाव सर्वात प्रसिद्ध आहे, परंतु भारतीय वंशाची नूर इनायत खान तिच्यापेक्षा अधिक शूर हेर होती हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. एकेकाळी अशी परिस्थिती होती की, जगातील सर्वात मोठा हुकूमशहा हिटलर त्यांच्या नावाने भीती घालत असे.

नूरचे पूर्ण नाव नूर-उन-निसा इनायत खान होते. तिचा जन्म 1 जानेवारी 1914 रोजी मॉस्को येथे झाला होता. तिचे वडील भारतीय होते आणि आई अमेरिकन होती. तिचे वडील हजरत इनायत खान टीपू सुलतानचे खापर पणतू होते. सुफीवाद पाश्चिमात्य देशांमध्ये नेण्यासाठी ते ओळखले जातात. ते अनेक देशांत धार्मिक शिक्षक म्हणून वास्तव्य करीत होते, परंतु त्यांनी आयुष्यातला बराच वेळ हा लंडन आणि पॅरिसमध्ये घालवला. वडिलांप्रमाणेच नूरलाही धर्म आणि श्रद्धा या गोष्टींमध्ये रस होता. नूरला संगीताची आवड होती, म्हणून ती वीणा वाजवण्यास शिकली. पहिल्या महायुद्धानंतर आणि नूरच्या जन्मानंतर तिचे कुटुंब मॉस्कोहून लंडनमध्ये गेले. येथूनच तिचा अभ्यास सुरू झाला. यानंतर, 1920 मध्ये, कुटुंब पॅरिसमधील सुरेनेस येथे गेले. 1927 मध्ये वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर पडली.

Noor from the book Spy Princess: The Life Of Noor Inayat Khan by Shrabani Basu published in 2006

Noor from the book Spy Princess: The Life Of Noor Inayat Khan by Shrabani Basu published in 2006

कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी नूरने संगीताला आपल्या उत्पन्नाचे साधन म्हणून निवडले. तिने वीणा आणि पियानो यांना सूफी विचारसरणीचा प्रसार करण्याचे माध्यम केले. तिने फ्रेंच रेडिओमध्ये नियमित योगदान दिले. भगवान बुद्धांच्या प्रभावामुळे त्यांनी ‘ट्वेंटी जातका टेल्स’ हे पुस्तक लिहले जे 1939 मध्ये प्रकाशित झाले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर, 22 जून 1940 रोजी, ती आपल्या कुटूंबासह ब्रिटनमधील फल्माउथ, कॉर्नवाल येथे परतली. या युद्धामुळे तिलाही मोठा धक्का बसला होता आणि तिने भारतीयांना मित्र राष्ट्रांचे समर्थन करण्याचे आवाहनही केले.

नूर रॉयल एअर फोर्समध्ये भरती

19 नोव्हेंबर 1940 रोजी नूर रॉयल एअर फोर्समध्ये द्वितीय श्रेणीमध्ये विमान अधिकारी म्हणून रुजू झाली. एअर फोर्समध्ये तिने वायरलेस ऑपरेटरचे प्रशिक्षण पूर्ण केले. जून 1941 मध्ये रॉयल एअर फोर्स बॉम्बर ट्रेनिंग स्कूलसाठी तिने कमिशनसमोर सशस्त्र सेना अधिकारी पदासाठी अर्ज केला. येथे त्यांची वायरलेस ऑपरेटरवरून सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे तिने विशेष ऑपरेशन्स कार्यकारिणीच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेतले. ही गुप्त संघटना ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल यांनी तयार केली होती ज्यांचे कार्य नाझी विस्तारवाद दरम्यान युरोपमधील गनिमी कारवायांना चालना देण्याचे होते.

फेब्रुवारीमध्ये नूरला विशेष ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून एअर फ्रान्समध्ये भरती करण्यात आले होते. अद्यापपर्यंत तिची गुप्तहेर म्हणून निवड झाली नव्हती किंवा तिने याबद्दल विचारही केला नव्हता. पण लवकरच ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकण्यात आली. नूर ही सूफी होती म्हणून तिचा खोटेपणावर आणि हिंसाचारावर विश्वास नव्हता. गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला तुमची ओळख लपवावी लागते हे तिला मान्य नव्हते. परंतु तिच्यामध्ये असणारी देशभक्ती ही तिच्या तत्वावर वरचढ ठरली आणि तिने ही जबाबदारी स्वीकारली. तिला 17 जून 1943 रोजी हेरगिरीसाठी फ्रान्सला रेडिओ ऑपरेटर म्हणून पाठविण्यात आले.

Noor I card- Photo: Royal Air Force

Noor I card- Photo: Royal Air Force

फ्रान्समध्ये ती फ्रांसिस सुततील यांच्या नेतृत्वात परिचारिका म्हणून रुजू झाली. येथे तिला 'मेडेलिन' नावाचा कोड देण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धात नूर ही विन्स्टन चर्चिल यांची विश्वासू हेर होती. नूरने तीन महिन्यांहून अधिक काळ फ्रान्समध्ये हेरगिरी केली आणि बरीच गोपनीय माहिती मित्र देशांना दिली.

तिला देण्यात आलेली जबाबदारी अत्यंत धोकादायक प्रकारची होती. अशा कारवाईत पकडलेल्यांना कायमचे ओलिस ठेवण्याचा व नाझींच्या नरकयातना मिळण्याचा आधिक धोका होता. परंतु ही जोखीम नूरने क्षणाचाही विचार न करता हसत-हसत स्वीकारली. जर्मन गुप्त पोलिस 'गेस्टापो' या इलेक्ट्रॉनिक सिग्नलला ओळखून त्याचा स्रोत शोधून काढू शकले असते. तिला अशी धोकादायक भूमिका दिल्यामुळे अनेकांचा असा विश्वास होता की ती फ्रान्समध्ये सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. झालंही तसंच नूरबरोबर काम करणारे इतर एजंट लवकरच ओळखले गेले. त्यातील बर्‍याच जणांना अटक केली गेली पण सुदैवाने नूर फरार होण्यात यशस्वी झाली.

Noor Inayat khan Family

Noor Inayat khan Family

नूर आता नाझींच्या डोळ्यात खुपू लागली होती. तिचा सर्वत्र कसून शोध घेतला जात होता. वेगवेगळे सापळे लावले जात होते. परंतु नूर काही केल्या हाती लागत नव्हती. हळूहळू परिस्थिती गंभीर होत चालली होती. तिला कळून चुकले होते की आपण कुठल्याही क्षणी पकडले जाऊ शकतो. म्हणून नूरने आपला संपूर्ण गेटअप बदलण्याचा निर्णय घेतला. याबद्दल तिच्या एका सहकाऱ्याने लिहून ठेवल्याप्रमाणे नूरने एका सलूनमध्ये जाऊन मेक ओव्हर करून घेतला होता. मात्र तिने केलेल्या न कळत चुकीमुळे तिला शोधण्यात नाझींना सोपे गेले. नूरला निळा रंग खूप आवडत असे. नूरने मेक ओव्हर केल्यानंतरही नवीन कपडे निवडताना निळ्या रंगला प्राधान्य दिले. यामुळे तिच्यावर पाळत ठेवणे सहज शक्य झाले.

नूरच्या एका साथीदाराच्या बहिणीने तिची माहिती जर्मन पोलिसांना दिली. ऑक्टोबर 1943 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली तिला पॅरिसमध्ये अटक करण्यात आली. पण नूरने सहजासहजी आत्मसमर्पण केले नाही. तिने कढवा प्रतिकार केला. तिला पकडण्यासाठी सहा पोलिसांना झुंज द्यावी लागली. दोनवेळा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकला नाही. पकडल्यानंतर गेस्टापोचे माजी अधिकारी हंस किफरने तिच्याकडून माहिती मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. ब्रिटिश कारवाईची माहिती मिळवण्यासाठी जर्मन एजंट्सनी नूरवर अत्याचार केले. परंतु त्यांना नूरचे खरे नावदेखील सापडले नाही. ती भारतीय वंशाची असल्याचे त्यांना शेवटपर्यंत माहीत झाले नाही.

Unveiling of the Memorial for Noor Inayat Khan (Photo from Noor Memorial website)

Unveiling of the Memorial for Noor Inayat Khan (Photo from Noor Memorial website)

शेवटचा शब्द ‘लिबर्टी”

11 सप्टेंबर 1944 रोजी नूरला तिच्या तीन साथीदारांसह जर्मनीतील डकाऊ यातना शिबिरात नेण्यात आले. 13 सप्टेंबर 1944 रोजी सकाळी सर्वांना डोक्यात गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले. प्रथम नूरच्या अन्य तीन साथीदारांना गोळ्या घालण्यात आल्या, नंतर नूरला शेवटच्यावेळी गुप्त माहितीचा तपशील विचारला गेला. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्या डोक्यात गोळी झाडली. जेव्हा तिला गोळ्या घालण्यात आल्या तेव्हा तिच्या ओठांवर ‘लिबर्टी’ हा शब्द होता. मृत्यूच्या वेळी तिचे वय केवळ 30 वर्ष होते. नाझींना नूरचे खरे नाव आणि तिचा हेतू माहित नव्हता. नूर यांनी ज्या शौर्याने कार्य केले ते अजूनही सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. अलीकडेच नूरला ब्लू प्लेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

जॉर्ज क्रॉस पुरस्कार

तिच्या मृत्यूनंतर नूरच्या शौर्याचा फ्रान्समध्ये 'वॉर क्रॉस' ने गौरव केला. ब्रिटनमध्ये तिला क्रॉस सेंट जॉर्ज सन्मान देण्यात आले. आतापर्यंत फक्त तीन महिलांना सन्मानाने गौरविण्यात आले आहे. लंडनच्या गॉर्डन स्क्वेअरमध्ये तिचे स्मारक उभारण्यात आले आहे, जे इंग्लंडमधील मुस्लिम आणि आशियाई महिलेचा सन्मान करणारे हे पहिलेच स्मारक आहे.