
वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
गीतांजली हत्तंगडी
लॉकर ऑपरेशन करायला आलेल्या ग्राहकांना सांभाळणं हे लॉकर कस्टोडियनचे फार अवघड काम असते....काहीवेळा अतिशय गमतीशीर प्रसंग घडतात आणि सर्वांचीच करमणूक होते. ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत असताना असेच काही प्रसंग अनुभवाला आले. त्यांना दिलेला हा उजाळा
लॉकर हा बँकेच्या (Bank) ब्रँच मॅनेजरच्या दृष्टीने अत्यंत बिकट प्रश्न.... ‘लॉकर मिळू शकेल का?’ या ग्राहक असलेल्या आणि नसलेल्याही लोकांच्या प्रश्नाला त्याला दिवसातून तीन ते चार वेळा अत्यंत कौशल्याने उत्तर देऊन हाताळावे लागते..... खरोखरच शिल्लक नसेल तर प्रश्नच नसतो ....आणि एखादी जुनी ब्रँच असेल आणि समजा, एखादा लॉकर रिकामा झाला तर तो कुणाला द्यायचा हा फार मोठा प्रश्न त्याच्यापुढे असतो. लॉकरसाठी वेटींगलिस्ट वगैरे ठेवलेली असते; पण तो बिचारा मॅनेजर त्या रिकाम्या झालेल्या लॉकरचा नवीन डिपॉझिट मिळवण्यासाठी कसा उपयोग करता येईल या स्वप्नरंजनात मग्न होतो......
अगदी प्रामाणिकपणे कबूल करायचे तर ते एक मोठे गुपित असते तो आणि लॉकर कस्टोडियन यांच्यातील...असो..(Bank Lockers and the Branch Manager Some funny moments)
प्रतिष्ठित ग्राहक आणि त्यांच्या गप्पाः
भर दुपारची वेळ... एका अत्यंत प्रतिष्ठित ग्राहकाच्या (Customer) पत्नीचे आगमन...त्यांचे खाते आमच्याकडे आहे हा आम्हाला आमचा गौरव वाटायचा. त्या येत असल्याची वर्दी रखवालदारानी मला केबिनमध्ये येऊन दिली...मी पण अतिशय आदबीने उभे राहून त्यांचे मनापासून स्वागत केले....
‘अहो, लॉकर ऑपरेट करायचाय’
‘नो प्रॉब्लेम मॅडम....एक जण आत आधीच गेलेयत थोडं थांबू शकाल?’
मग झाल्या सुरू त्यांच्या आणि माझ्या टिपिकल बायकी गप्पा... त्यात त्यांनी त्यांचे हे किती हौशी आहेत ...कुठेही गेले तरी त्यांना कसे तिकडून दागिने घेऊन येतात....आता एक लॉकर पुरत नाहीये म्हणून अजून दोन लॉकर कसे इतर बँकांत घ्यायला लागलेयत हे पण सांगितले....पर्समधून काढून एक हिऱ्याची (Diamonds) सुंदर बांगडीही दाखवली... मी आपली माझ्या हातातली एकमेव सोन्याची बांगडी उगीचंच चाचपून बघितली....
लॉकर रुम रिकामी झाल्याचं कस्टोडियननी सांगितले आणि या मॅडम आत गेल्या.... दोन मिनिटातच कस्टोडियन पळत माझ्याकडे आला आणि म्हणाला, मॅडम, लौकर या इकडे, आत गेलेल्या मॅडम म्हणतायत त्यांचे दागिने लॉकरमध्ये नाहीयेत...भयंकर भडकल्या आहेत...पोलीसात जाईन म्हणतायत....’ तो घाम पुसत म्हणाला...
मी त्यांना घेऊन कशीबशी केबिनमध्ये आले....रागानी थरथरत होत्या त्या ...त्यांच्या नवऱ्याला फोन लावायचा त्या प्रयत्न करत होत्या... पण तो मिटिंगमध्ये होता म्हणून फोन उचलत नव्हता...त्याचाही राग आमच्यावरच निघत होता....बँकेतले लोक किती निष्काळजी आहेत वगैरे सुरू झाले होते...मीडियाला घेऊन येते...पोलिसात तक्रार द्यायला इथूनच जाते ....
पण यांना विचारावं लागेल ....इथे त्यांची गाडी अडली होती...
‘आधी किती तारखेला आला होता’
मी आपलं गरीबपणे विचारलं..
‘शोधा तुम्हीच’ ....त्या बरसल्या
‘तुमच्या रिजनल हेडचा फोन द्या....मला बोलायचंय त्यांच्याशी’
आमच्या पायातली शक्ती संपत चालली होती...
पुढे आता काय काय वाढून ठेवलंय मला समजेनासं झालं होतं....
‘थांबा, आता यांनाच बोलायला सांगते त्यांच्याशी’ असे म्हणल्या आणि ताडकन उठून निघून गेल्या....
मी ब्रँच हेड म्हणून आणि कस्टोडियन जबाबदार व्यक्ती म्हणून असहायपणे मॅडमनी आधी कधी कधी लॉकर ऑपरेट केलाय हे शोधत बसलो कारण तेव्हा त्या गोष्टीचे संगणकीकरण झाले नव्हते, ना सीसीटीव्ही होता आमच्या मदतीला....
शप्पथ सांगते रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला....स्वप्नात मी तुरुंगातही जाऊन आले....
दुसऱ्या दिवशी कुठल्याही क्षणी रिजनल हेडचा फोन येईल आणि आपल्याला त्या ऑफिसमध्ये जावे लागेल याची मनाची तयारी केली होती....आणि पोलीस येऊन चौकीत घेऊन गेले तर....जिवाची घालमेल झाली होती....पण तसे काहीच घडले नाही आणि माझे टेन्शन आणखी वाढले....
हे देखिल वाचा-
दोन दिवस गेले आणि मग अगदी बळ एकवटून मी मॅडमना फोन लावला.....
‘अहो हो, तुम्हाला सांगायचे राहूनच गेले .…..मी ते दागिने दुसऱ्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते.... गाडीत बसल्यावर मला आठवले.... हल्ली बघा हे असे विसरायला होतं... कुठे कुठे बघायचे मी...आणि काय काय लक्षात ठेवायचे’
माझ्या डोळ्यात संतापाने पाणी जमा झालं होतं....एका शब्दाने दिलगिरीही व्यक्त नाही केली त्यांनी....
मी मनात म्हणाले, माझ्या जन्मभर लक्षात रहाल मॅडम तुम्ही...
वाचकहो!....एक कळकळीचे सांगणे....
आपण कुठल्या लॉकरमध्ये काय ठेवलंय आणि काय काय काढून आणलंय याची एक नोंद वही ठेवा....जसे जसे वय होते तसे तसे विस्मरण होण्याची शक्यता असतेच....त्यामुळे निष्कारण असे मनस्तापाचे प्रसंग टाळा तुमच्यासाठीही आणि आम्हा बिचाऱ्या बँकरसाठीही...
लॉकररूममध्येच तुतु-मैमै...(प्रसंग दुसरा)
पुन्हा एकदा दुपारची वेळ ...कधी कधी थोडासा निवांतपणा सापडतो बँक कर्मचाऱ्यांना....पाटील बंधू (नाव बदलले आहे) आपआपल्या पत्नींसह आले होते...थोडेसे चिंताग्रस्त वाटले....साहजिकच होत...पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते...ते आम्हाला त्यांनी पेपरमध्ये दिलेल्या त्यांच्या आईच्या पानभर फोटोमुळे कळले होते...मी त्यांचे सांत्वन केले.... ग्राहक होते ना दोघेही....
‘मॅडम एक विनंती आहे....आमच्या दोघांचेही वेगवेगळे लॉकर आहेत..बायकोचेपण नाव आहे बरोबर ....तर आम्हाला चौघांना एकदम आत जायला परवानगी द्या...’
मी कस्टोडियनशी बोलले... आणि मग त्यांना तशी परवानगी दिली.
एक भली मोठी बॅग घेऊन चौघेहीजण आत गेले....सगळा स्टाफ आज पटापट आवरून घरी जाण्याच्या मूडमध्ये होता.त्यामुळे शांतपणे भराभर आपापली कामे उरकण्याच्या मागे होता.एवढ्यात....
‘त्याला हात लावून तर बघा....सासूबाईंनी मला दिलंय ते’
‘मोठी आलीय ग तू....त्यांचं करायला आम्ही आणि घ्यायला तुम्ही...’
‘दादा, ही चेन आईनी माझ्यासाठी केली होती’
‘अरे जा....माझ्या गळ्यात घातली तिने मागच्या महिन्यात’
‘देवाची भांडी जाऊबाई सगळी तुम्हाला?’
‘पूजा तरी करतेस का ग कधी....सगळे सणवार कुळाचार आमच्याच माथी....’
‘आण तो तांब्या इकडे’
‘बरी जड जड भांडी उचलताय हो’
आणि मग चक्क भांडी फेकाफेकीचे जोरदार आवाज....
आत घमासान चालू होते आणि बाहेर आमचे हसून हसून पोट दुखायला लागले....
शेवटी आता याला आवर घातला पाहिजे म्हणून मी मोबाईलवरून एक भावाला फोन केला आणि दुसरा कस्टमर बाहेर वाट
बघतोय असे खोटेच सांगितले...कारण मी आत तरी कशी जाणार?
तरी दहा मिनिटे त्यांचे वाद लॉकररूममध्ये चालूच होते....
अखेर दोन्ही भाऊ लाल डोळ्यांनी आणि बायका डोळे पुसत बाहेर आल्या....
आमची धमाल करमणूक करून चौघे ब्रँचच्या बाहेर पडले.....
कदाचित आत हातापायी आणि केस धराधरीदेखील झाली असेल....
आईच्या दहाव्याला पेपरमध्ये शोकमग्न पाटील बंधू आणि त्यांच्या सुना त्यांच्या नकळत सगळया स्टाफला त्यांचे खरे रूप दाखवून गेले....
वाचकहो! बँक ही आपले खासगी वाद जाहीरपणे करण्याची जागा नाही....अशावेळी आधी घरीच वाटण्या करा आणि मगच तुमच्या लॉकरमध्ये जे काही मिळाले असेल ते ठेवा....
असो....काहीही झाले तरी ग्राहक हा आमचा राजा असतो.....
(लेखिका निवृत्त बँक अधिकारी आहेत.)