Cement War in India: सुरुवात भारतातल्या सिमेंट उद्योगातल्या छुप्या 'युद्धा'ची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या शेअर बाजारातल्या घडामोडी}
काय घडते आहे सिमेंट उद्योगात ते घ्या जाणून

सुरुवात भारतातल्या सिमेंट उद्योगातल्या छुप्या 'युद्धा'ची

साऱ्या जगावर रशिया-युक्रेन युद्धाचे सावट आहे. या युद्धाचे परिणाम अनेक क्षेत्रावर पहायला मिळाले. भारतीय शेअर बाजार याला अपवाद नाही. भारतीय शेअर बाजारात बुल्स आणि बेअर्समध्ये घनघोर 'युद्ध' पहायला मिळते आहे. याच युद्धाच्या सावटात आणखी एक युद्ध छेडलं गेलंय. हे युद्ध आहे सिमेंट उद्योगातले.....

गेले सुमारे तीन आठवडे भारतीय शेअर बाजार (Share Market) कोलांटउड्या खातोय. लाल आणि हिरव्या जपानी कँडलस्टिक शेअर बाजाराच्या चार्टवर घनघोर लढाई खेळत आहेत. करोडो गुंतवणूकदारांचे खिसे या काळात रिकामे झाले. निर्देशांक (Sensex) चढता आहे हे दाखविणारे 'बुल्स' आणि बाजारात शेअर विक्रीचा भडीमार करुन निर्देशांक उतरवणारे 'बेअर्स' यांच्यात चढाओढ लागल्याचे या काळात पाहिले. (Cement War in Indian Market after Ambuja ACC Sell to Adani Group)

आता बुल्स मार्केट आणि बेअर्स मार्केट (Bulls and Bear Market) या संज्ञा सुरुवातीला समजून घेऊ. जेव्हा शेअर बाजार चढत्या भाजणीत असतो त्याला बुल्स मार्केट म्हणतात. तर जेव्हा विक्रीच्या जोरामुळे बाजार घसरतो त्याला बेअर्स मार्केट म्हणतात. बाजाराच्या तांत्रिक चार्टवर बुल्स हिरव्या रंगात तर बेअर्स लाल रंगात दर्शवलेले असतात. ही झाली तांत्रिक माहिती.

...तर गेले तीन आठवडे सुरु असलेल्या घनघोर लढाईत एक बातमी आली ती एका सिमेंट कंपनीच्या विक्रीची. अंबुजा सिमेंट (Ambuja) आणि एसीसी (ACC) हे भारतातले दोन आघाडीचे सिमेंट उत्पादक ब्रँड. १९३६ च्या आसपास अखंड भारतात अनेक छोट्या सिमेंट कंपन्या कार्यरत होत्या. ओखा सिमेंट लिमिटेड, ग्वालियर सिमेंट, पंजाब अँड पोर्टलँड सिमेंट अशा या कंपन्या.

याच काळात जेआरडी टाटा, सेठ एडुजी दिनशा, अंबालाल साराभाई, वालचंद हिराचंद, हैदराबाद संस्थानचे तत्कालिन पंतप्रधान नवाब सालारजंग, धर्मेशी खटाव, सर होरमाशज फिरोजशहा मोदी आदींनी एकत्र येत 'एसीसी सिमेंट' तशा असोसिएटेड सिमेंट कंपनीची स्थापना केली. तिचे मुख्यालय कराचीत होते.

फाळणीनंतर या कंपनीचे दोन तुकडे झाले. वर दिलेल्या संस्थापकांपैकी एक सेठ एडुजी दिनशा कराचीतच थांबले. पुढे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे तिथे खूप हाल झाले. 'एसीसी'चे भारतातले मुख्य कार्यालय मुंबईत स्थापले गेले. पुढे तत्कालिन पंतप्रधान (कै. इंदिरा गांधी) यांच्या काळात परमीट राज आले आणि मग भारतातला सिमेंट उद्योग हेलकावे खाऊ लागला.

अंबुजा सिमेंटची स्थापना १९८३ मधली. कोलकत्त्याचे दोन मारवाडी व्यापारी नरोत्तम सेकसरिया आणि सुरेश नियोतिया यांनी अंबुजा सिमेंट कंपनीची स्थापना केली. या कंपनीने आपले चार प्लँट गुजरातमध्ये उभारले. नंतरच्या काळात आशियातल्या सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादकांच्या यादीत या कंपनीचे नांव घेतले जाऊ लागले.

भारतीय सिमेंट उद्योगाने कात टाकली ती २००४ मध्ये तत्कालिन पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनी खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि परदेशी कंपन्यांना भारतात येण्यासाठी मुक्तद्वार करुन दिले. याच काळात विदेशातल्या अनेक कंपन्या भारतीय सिमेंट कंपन्या खरेदी करायला सरसावल्या. जर्मनीची हॅडलबर्ग, स्वित्झर्लंडची होलसिम ग्रुप, फ्रान्सची विकाट अशा कंपन्यांनी भारतीय सिमेंट बाजारावर कबजा मिळवायला सुरुवात केली.

यापैकी होलसिम ग्रुपने भारतातले अंबुजा आणि 'एसीसी' हे दोन ब्रँड पूर्णतः खरेदी केली. तर प्रिझ्मा, श्री, अल्ट्राटेक अशा कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांनी तीस टक्के भांडवल गुंतवले. आता भारतीय बाजारावर कुठल्या कंपनीचा वरचष्मा असेल याची चढाओढ सुरु झाली.

गेल्याच आठवड्यात बातमी आली ती 'अंबुजा' आणि 'एसीसी'च्या विक्रीची. गेले काही महिने अदानी विल्मर, अदानी पाॅवर ही नांवे भारतीय शेअर बाजारात चर्चिली जात आहेत. अंबानींपेक्षा जास्त श्रीमंत म्हणून अदानी ग्रुपच्या गौतम अदानींचे नाव समोर आले आहे. याच अदानी ग्रुपने हे दोन्ही ब्रँड होलसिम ग्रुपकडून खरेदी करण्याचा करार केला.

होलसिम ग्रुपचा अंबुजा सिमेंटमध्ये ६३.११ टक्के तर एसीसीमध्ये ४.४८ टक्के थेट हिस्सा आहे. हे हिस्से अदानी कंपनी ६.४ अब्ज डाॅलर्स म्हणजे अंदाजे पन्नास हजार कोटी रुपयांना विकत घेत आहे. त्या व्यतिरिक्त अंबुजा आणि एसीसीमध्ये असलेला सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा हिस्साही चढ्या दराने विकत घेण्याची आॅफर अदानींनी दिली आहे.

२००४ ते २०२२ या काळात अंबुजा आणि एसीसी सिंमेंटच्या मालकी हक्कांबाबत अनेक घडामोडी घडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात होलसिम ग्रुपने एसीसी सिमेंट कंपनीचा अगदी किरकोळ हिस्सा विकत घेतला होता. त्यानंतर आपला हिस्सा वाढवत होलसिम ग्रुपने 'एसीसी' वर पूर्ण नियंत्रण मिळवले. २०१३ मध्ये अंबुजा सिंमेंटने होलसिम ग्रुपचा थेट हिस्सा विकत घेतला.

जागतिक विस्तारासाठी भारतात आलेल्या होलसिम ग्रुपची धोरणे पुढच्या काळात बदलली. या धोरणानुसार होलसिमने ब्राझिलमधला आपला सिमेंट उद्योग विकला. त्यानंतर आता झिंबाब्वेमधला उद्योगही विकण्याची तयारी सुरु केली आहे. अंबुजा-एसीसी घेण्यासाठी भारतात जेएसडब्ल्यू, मित्तल अशा जायंट्सनीही बोली लावली होती. पण त्यात अव्वल ठरले गौतम अदानी.

यात फायदा अदानींचा होणार आहे. कारण उर्जा निर्मिती, बंदरे, विमानतळे अशा अनेक क्षेत्रांमध्ये अदानी अग्रेसर आहेत. या उद्योगांसाठी लागणार सिमेंट त्यांना आपल्याच कंपनीतून उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या बाजूला भारतात नवे सिमेंट वाॅर सुरु होईल अशी चिन्हे आहेत

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीवर जोर दिला जातोय. नवे विमानतळ, नवे महामार्ग, मेट्रो यांच्या बरोबरच मोठे गृहप्रकल्प यांची उभारणी केली जातेय. या साऱ्या सुविधांसाठी लागणार सिमेंट पुरविण्याची मोठी जबाबदारी भारतीय सिमेंट कंपन्यांवर राहणार आहे. सिमेंट निर्मितीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सध्या भारतात अल्ट्राटेक सिमेंट पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीची उत्पादन क्षमते सुमारे १२० दशलक्ष टन आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेलेल अंबुजा-एसीसीचे ७० दशलक्ष टनांचे उत्पादन आहे. हे उत्पादन येत्या पाच वर्षांत दुप्पट म्हणजेच १४० दशलक्ष टन करण्याची घोषणा गौतम अदानींनी केली आहे.

थोडक्यात एकूणच देशभरात सिमेंट निर्मितीचा जोर पुढच्या काळात राहिल हे निश्चित. अदानी आपले उत्पादन दुप्पट कसे करतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. सर्वच क्षेत्रात हातपाय पसरणारा अदानी ग्रुप भारतातल्या अन्य छोट्या कंपन्या विकत घेणार की स्वतःचे नवे प्लँट उभारणार हे येणारा काळ ठरवणार आहे.

(सूचना- हा लेख भारतीय बाजारपेठेतल्या घडामोडी दर्शविण्यासाठी आहे. यात शेअर खरेदी विक्रीचा कुठलाही सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागाराच्या सल्ल्यानुसार बाजारपेठेत गुंतवणूक करावी)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top