
जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
सौरव बासू
म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. यातील ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’च्या फायद्यांची आपल्याला जाणीव होत असते, मात्र ‘एसआयपी’विषयी अनेक गैरसमजही आहेत....जाणून घेऊयात याबद्दल
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीत समान हप्त्यांमध्ये पैसे जमा करून दीर्घ कालावधीसाठी संपत्ती जमा करू शकतो. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीमुळे दीर्घकालीन बचत होते, तसेच संपत्तीनिर्माण करण्याची शिस्त लागते. मात्र ‘एसआयपी’विषयी अनेक गैरसमजही आहेत. हे गैरसमज दूर झाल्यास ‘एसआयपी’चा निर्णय घेणे सोपे होऊ शकते. (Common Misconceptions about SIP Investment)
म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणूकदारांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय गुंतवणूक (Investment) पर्यायांपैकी एक आहे. यातील ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’च्या फायद्यांची आपल्याला जाणीव होत असते, मात्र ‘एसआयपी’विषयी अनेक गैरसमजही आहेत. आपल्यापैकी काहींना वाटते, की ‘एसआयपी’ (SIP) सुरक्षित आहे, ‘एसआयपी’ करमुक्त आहे आणि ‘एसआयपी’मधून व्याज (Interest) मिळते. अलीकडच्या काळात आर्थिक साक्षरता बरीच वाढली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’विषयीच्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. आपल्या संपत्तीनिर्मितीच्या प्रवासात पुढे जाताना काही गोष्टींची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.
म्युच्युअल फंडांतील ‘एसआयपी’संबंधी सर्वसामान्यतः सात गैरसमज आहेत, ते पुढीलप्रमाणे-
• गैरसमज क्र. १
‘एसआयपी’ ही फक्त छोट्या गुंतवणूकदारांसाठी असते.
‘एसआयपी’द्वारे कमी रकमेमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय असला, तरी मोठ्या प्रमाणातही ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते. गुंतवणूकदार ‘एसआयपी’च्या माध्यमातून आपल्या आवडीनुसार कितीही आणि केवढीही रक्कम गुंतवू शकतो. मोठी संपत्ती असलेले आणि श्रीमंत असे अनेक गुंतवणूकदार ‘एसआयपी’च्या मार्गाने बाजारात गुंतवणूक करीत असतात. ‘एसआयपी’ सुरू करण्यासाठी केवळ ‘केवायसी’ पूर्ण करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदाराला बाजारात नियमितपणे गुंतवणूक करण्यास ‘एसआयपी’ सक्षम करते. या पद्धतीमुळे त्याला दीर्घकालीन (बाजारातील अस्थिरतेवर अवलंबून) चांगला परतावा मिळवता येतो. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही पद्धत अवलंबू शकते. त्यामुळे, ‘एसआयपी’ फक्त छोट्या गुंतवणूकदारांसाठीच योग्य आहे, असा विचार करणे चुकीचे आहे.
• गैरसमज क्र. २
फक्त इक्विटी फंडांसाठीच ‘एसआयपी’ करता येते.
गुंतवणूकदारांमध्ये सर्वसामान्यपणे समज असा आहे, की ते ‘एसआयपी’द्वारे केवळ इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र हे खरे नाही. ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना, डेट फंड, हायब्रीड फंड, फंड ऑफ फंड्स, इंडेक्स फंड, थीमॅटिक फंड यांसारख्या उपलब्ध पर्यायांमधून निवड करता येते. ही यादी बरीच मोठी आहे. आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन, गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारचा फंड निवडू शकतात.
• गैरसमज क्र. ३
‘एसआयपी’ हे एक गुंतवणूक योजना आहे.
‘एसआयपी’ ही गुंतवणूक योजना नसून, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत वा सुविधा आहे. गुंतवणूकदार त्याद्वारे नियमित अंतराने वेळोवेळी गुंतवणूक करू शकतात. उपलब्ध म्युच्युअल फंड योजनांमधून गुंतवणूकदार कोणतीही योजना निवडू शकतात. त्यांच्या बँक खात्यामधून गुंतवणुकीची ठराविक रक्कम वळती केली जाते आणि संबंधित योजनेमध्ये गुंतविली जाते. आपली आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम यांच्या क्षमतेनुसार गुंतवणूकदार वेगवेगळ्या योजनांमधून निवड करू शकतात. एखाद्या गुंतवणूकदाराला २४ हजार रुपयांची एकूण गुंतवणूक करायची असेल, तर १२ महिन्यांच्या कालावधीत या गुंतवणूकदाराला दरमहा दोन हजार रुपये गुंतवून म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करण्याची सुविधा मिळते. थोडक्यात, ‘एसआयपी’ ही योजना नसून, ती गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे.
• गैरसमज क्र. ४
‘एसआयपी’मध्ये बदल करता येत नाहीत.
अनेक गुंतवणूकदारांना असे वाटते, की एकदा ‘एसआयपी’ सुरू केल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. ही बाबदेखील खरी नाही. ‘एसआयपी’ हा भांडवली बाजारात गुंतवणुकीचा सर्वोत्तम आणि सर्वांत लवचिक स्वरुपाचा मार्ग आहे. ‘एसआयपी’ची योजना, तिचा हप्ता, कालावधी या बाबी ठरवून झाल्यावर ‘एसआयपी’ला अंतिम रूप दिल्यानंतरदेखील, या सर्व बाबी, अगदी म्युच्युअल फंडाची योजनादेखील आपण बदलू शकतो. गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी बदलण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘एसआयपी’ योजनेचा किमान कार्यकाळ पूर्ण होईल, याची मात्र प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, अन्यथा ‘एक्झिट लोड’ हे शुल्क भरावे लागते. आपले उत्पन्न वाढल्यास किंवा अधिक बचतीची/गुंतवणुकीची योजना हवी असल्यास, गुंतवणूकदार ‘एसआयपी’ची रक्कम बदलू शकतात.
• गैरसमज क्र. ५
‘एनएव्ही’ कमी असलेल्या फंडांमध्ये ‘एसआयपी’ केल्यास जास्त परतावा मिळतो.
अनेक गुंतवणूकदारांचा असा समज असतो, की कमी नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) असलेले म्युच्युअल फंड स्वस्त असतात आणि त्यांतून जास्त परतावा मिळतो. वास्तविक पाहता, गुंतवणूक करताना ‘एनएव्ही’ महत्त्वाचा घटक असला, तरी म्युच्युअल फंड योजना किती परतावा देऊ शकेल, हे या ‘एनएव्ही’मधून ठरत नाही. गुंतवणूकदार ज्या मूल्यावर म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करतात किंवा विकतात, ते मूल्य म्हणजे त्या फंडाची ‘एनएव्ही’. ‘एनएव्ही’ नियमितपणे बदलत असते. म्युच्युअल फंडाच्या युनिटचे मूल्य (एनएव्ही) हे परतावा ठरवत नाही.
उदाहरणार्थ, जर एखाद्याला १० हजार रुपये गुंतवायचे असतील आणि त्याच्याकडे दोन पर्याय असतील. एका फंडाची एनएव्ही रु. १०० आणि दुसऱ्या फंडाची एनएव्ही रु. १०००, तर ‘कमी एनएव्ही’ असलेल्या फंडाची १०० युनिट्स ती व्यक्ती खरेदी करू शकेल आणि ‘जास्त एनएव्ही’ असलेल्या फंडाची १० युनिट्स ती खरेदी करू शकेल. येथे दोन्ही बाबतीत, गुंतवलेली रक्कम दहा हजार रुपये एवढीच आहे आणि गुंतवणुकीचे मूल्यही समान आहे. गुंतवणूकदारांनी केवळ ‘एनएव्ही’पेक्षा फंडाच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
• गैरसमज क्र. ६
‘एसआयपी’मधून परताव्याची हमी मिळते.
गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांमध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्याची सुविधा ‘एसआयपी’मधून मिळते. थेट शेअर बाजाराच्या तुलनेत म्युच्युअल फंडांमध्ये ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणे सुरक्षित असते, तथापि म्युच्युअल फंड हे बाजारातील अस्थिरतेनुसार जोखमीच्या अधीन असतात. गुंतवणूकदारांना अल्प काळात खात्रीशीर परतावा मिळणे कठीण असते, दीर्घ मुदतीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानेच भांडवलाची वाढ होण्यास मदत होते. म्हणून, बाजारात गुंतवणूक करताना काही प्रमाणात जोखीम असते, याचे भान राखून, तशी तयारी ठेवून गुंतवणूक करायला हवी. म्युच्युअल फंडांमध्ये ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदाराला ‘रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग’चा (आरसीए) फायदा होतो. परंतु, निश्चित दराने परताव्याची हमी मिळत नसते.
• गैरसमज क्र. ७
बाजारात तेजी असताना ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करू नये.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी शिस्त, संयम आणि संशोधन यांची कास धरायला हवी. बहुसंख्य वेळा ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक केलेल्या योजनांचे दीर्घ मुदतीत चांगले परतावे मिळतात. बाजारात नेमक्या वेळेला नेमकी कृती करणे सर्वांना शक्य नसते. कमी दराने खरेदी करणे आणि उच्च दराने विक्री करणे, हे सैद्धांतिकदृष्ट्या शक्य असले, तरी व्यावहारिक निर्णय घेताना ते शक्य होत नाही. दीर्घ कालावधीत ‘एसआयपी’तील गुंतवणूक जास्त चांगला परतावा मिळवून देते. तुम्ही एकरकमी पद्धतीने गुंतवणूक करीत असाल, तर मात्र तेजी आणि मंदीच्या टप्प्यांचा विचार करणे आवश्यक आहे. ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करीत असाल, तर रुपयाची सरासरी किंमत ही वेळोवेळी पोर्टफोलिओवरील प्रभाव नष्ट करते, ‘एसआयपी’मुळे बाजारातील अस्थिरतेचा पोर्टफोलिओवरील प्रभाव कमी होतो. अशा प्रकारे, ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य वेळेची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. लोकांनी लवकर गुंतवणुकीचे महत्त्व समजून घेणे आणि चक्रवाढीचा फायदा मिळवणे महत्त्वाचे आहे.
‘एसआयपी’बाबतच्या अनेक गैरसमजांमुळे गुंतवणूकदार त्यापासून दूर राहतात. गैरसमज दूर झाल्यावर मात्र ‘एसआयपी’चा निर्णय घेणे सोपे होऊ शकते. गुंतवणूकदारांनी नेहमी आयुष्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच आपला गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला पाहिजे. ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करू इच्छित असल्यास दीर्घकालीन धोरणाचाच विचार करा. ‘एसआयपी’मधील गुंतवणूक ही शिस्तबद्धच असायला हवी. त्यात संयम बाळगल्यास विशिष्ट कालावधीत संपत्ती निर्माण होऊ शकते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. जितक्या लवकर तुमचा या गुंतवणुकीचा प्रवास सुरू कराल, तितका चांगला परतावा तुम्हाला भविष्यात मिळेल.
(लेखक टाटा कॅपिटलच्या संपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत.)