Investment- बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नकारात्मक बातम्या आणि गुंतवणूकदारांची मानसिकत}
गुंतवणूक भावनांवर आधारित नको

बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

मकरंद विपट

बरेच जण कोणीतरी सांगितल्यामुळे, कुठेतरी वाचून अथवा ऐकून आर्थिक उन्नतीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक चालू करतात. बरेच लोक ऐकीव माहितीवर, टिप्सवर, फुकटच्या सल्ल्यांवर गुंतवणूक चालू करतात. ही अशी गुंतवणूक करणे योग्य नाही..मग कशी करावी गुंतवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेकजण इतरांना मिळालेला घवघवीत फायदा बघून आपल्यालाही असा भरपूर पैसा मिळावा, या उद्देशाने गुंतवणूक सुरू करतात. मात्र, स्वतः अभ्यास करून गुंतवणूक करण्याची अनेकांची तयारी नसते. अनेकदा गुंतवणूक केल्या-केल्या एखादी वाईट बातमी येते किंवा काही कारणांनी घेतलेला शेअर घसरतो, नुकसान होते. त्यामुळे अनेक लोक शेअर बाजारातून माघार घेतात आणि कायमचे एका चांगल्या परतावा देणाऱ्या पर्यायापासून दूर होतात. नकारात्मक बातम्यांचा शेअर बाजारावर होणारा परिणाम आणि त्यावरून घेतले जाणारे निर्णय याबाबत मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न... (Dont invest based on news and tips)

बरेच जण कोणीतरी सांगितल्यामुळे, कुठेतरी वाचून अथवा ऐकून आर्थिक उन्नतीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक चालू करतात. बरेच लोक ऐकीव माहितीवर, टिप्सवर, फुकटच्या सल्ल्यांवर गुंतवणूक चालू करतात. ही अशी गुंतवणूक करणे योग्य नाही. शेअर बाजाराने दीर्घ कालावधीत बाकी सर्व गुंतवणूक प्रकारांपेक्षा नक्कीच चांगला परतावा दिला आहे; पण गुंतवणूक करताना एकतर आपण योग्यप्रकारे अभ्यास करून गुंतवणूक करावी अथवा एखाद्या चांगल्या सल्लागाराची मदत घ्यावी.

हेही वाचा: भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

ज्या लोकांना त्यांच्या कामामुळे वेळ मिळत नाही ते म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करतात. अशाप्रकारची गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीसाठी म्हणून सुरू तर करतात; पण नक्की किती गुंतवणूकदार खरेच दीर्घ कालावधीसाठी टिकतात हा एक प्रश्नच आहे.

असे म्हणायचे कारण असे, की गुंतवणूक चालू करायच्या अगोदर शेअर बाजाराकडे कधी लक्ष दिले नव्हते; पण ज्या दिवसापासून गुंतवणूक चालू केली, त्यानंतर आता आयुष्यात दुसरे काही उरलेच नाही अशाप्रकारे वागतात. म्हणजे एखाद्याने म्युच्युअल फंडाद्वारे १० वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक चालू केली असेल, तर मग त्या गुंतवणुकीकडे रोज रोज का बघावे?आज मार्केट वर गेले, किती फायदा झाला? आज मार्केट पडले, किती नुकसान झाले? मग कोणती चांगली बातमी आली, कोणती वाईट बातमी आली, या अशा गोष्टींकडे का लक्ष द्यायचे? विशेषतः या बातम्यांमधील नकारात्मक बातम्यांचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त होतो आणि जेव्हा शेअर बाजारात एखादी छोटी घसरण येते, तेव्हा आपण आपल्या या स्वभावामुळे शेअर बाजारातील दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून जबरदस्तीने बाहेर पडतो आणि मग दीर्घ कालावधीनंतर गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे एक स्वप्नच बनून राहते.

शेअर बाजार व नकारात्मक बातम्या

आपण शेअर बाजाराचा गेल्या जवळपास १४ वर्षांचा आढावा घेतला, तर अशा कितीतरी शेअर बाजाराशी निगडित असलेल्या नकारात्मक बातम्या येऊन गेल्या आणि त्यामुळे शेअर बाजार कितीतरी वेळा घसरला. पण त्या सर्व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष्य करून गुंतवणूक ठेवली असती तर नक्की काय झाले असते, ते आपण सोबतच्या तक्त्यातून पाहू.

वर्ष नकारात्मक घडामोडी ‘निफ्टी’ ३१ डिसेंबरचा बंद फंड योजना एनएव्ही

२००८ लेहमन ब्रदर्स प्रकरण २९५९ २१२.७६

२०१० महागाईचा दर -व्याजदर जास्त ६१३४ ४९४.८२

२०१२ फेड टेंपरिंग ५०९५ ४९८.३१

२०१३ रुपयाचे अवमूल्यन ६३०४ ५१३.१६

२०१५ खराब मान्सून ७९४६ ८०१.६२

२०१६ ब्रेक्झिट ८१८५ ८१७.५८

२०१७ नोटाबंदी १०५३० ११९४.११

२०१९ पीएनबी घोटाळा १२१६८ ११७८.१६

२०२० कोविड १३९८१ १३८७.४८

२०२१ कोविड दुसरी लाट १७३५४ २००२.८४

२०२२वाढती महागाई-वाढते व्याजदर १८००० २२२४.१५

(तक्त्यातील उदाहरण हे नामवंत म्युच्युअल फंडाच्या एका योजनेचे आहे.)

सोबतच्या तक्त्यावरून आपणास असे समजते, की २००८ ते २०२२ पर्यंत शेअर बाजाराशी निगडित अशा कितीतरी नकारात्मक घडामोडी होऊन गेल्या; तरी पण आपण ‘निफ्टी’चा परतावा बघितला तर तो जवळपास ५०८ टक्के आहे आणि म्युच्युअल फंडातील केलेल्या गुंतवणुकीवर साधारण ९५० टक्के परतावा आहे. हा परतावा त्याच गुंतवणूकदाराला मिळाला असेल, ज्याने कधीच या सर्व नकारात्मक गोष्टींचा आपल्या मानसिकतेवर आणि पर्यायाने आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊन दिला नाही.

म्हणून गुंतवणूकदारांनो, आपण दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक, विशेषतः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोज रोज पाहू नका. अशा अनेक प्रकारच्या बातम्या यापुढेही तुमच्या कानावर येतील; मात्र, त्याकडे दुर्लक्ष्य करून आपली गुंतवणूक चालू ठेवा. ज्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली आहे, ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यावरच विका. आपल्या आर्थिक सल्लागारावर विश्वास, संयम आणि शिस्तबद्ध नियमित गुंतवणूक हेच या प्रकारच्या गुंतवणुकीतून समृद्ध होण्याचे खरे सूत्र आहे.

(लेखक किरण जाधव अँड अससोसिएट्स येथे म्युच्युअल फंड तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)