
क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
सुधाकर कुलकर्णी
क्रेडिट कार्ड वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत. क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा चांगला लाभ होऊ शकतो..जाणून घ्या क्रेडिट कार्ड वापरताना काय पथ्ये पाळावीत याची माहिती...
क्रेडिट कार्ड वापरणे ही आजकाल सर्रास बाब झाली असली, तरी काही काळापूर्वी मात्र ती अगदी विशेष सुविधा होती. खास उच्चभ्रू वर्गापुरती ती मर्यादित होती. आता वाढलेली स्पर्धा, डिजिटल पेमेंटची सर्वव्यापी सुविधा, उच्च उत्पन्न वर्गाचे वाढलेले प्रमाण, नव्या पिढीची जीवनशैली (Lifestyle) आदी कारणांमुळे क्रेडिट कार्डचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांत झाला आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत. क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा चांगला लाभ होऊ शकतो. (Dos and Donts about Credit Card issued by banks)
आजकाल डिजिटल पेमेंटचा (Digital Payments) सर्वत्र बोलबाला आहे आणि एकूणच डिजिटल पेमेंटचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तथापि, ज्याकाळी डिजिटल पेमेंट हा शब्दही उच्चारला जात नव्हता, तेव्हासुद्धा कॅशलेस व्यवहार करता येत होते व तेही क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरून. क्रेडिट कार्डाची संकल्पना भारतात सर्वप्रथम सिटी बँकेने ‘डायनर क्लब कार्ड’ नावाने १९६० च्या सुमारास आणली. सुरवातीस केवळ उच्चभ्रू खातेदारांनाच ही सुविधा दिली जात होती. पुढील २० वर्षे यात फार प्रगती झाली नाही; मात्र १९८० मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मास्टर कार्डशी सहयोग करून ‘सेंट्रल कार्ड’ हे क्रेडिट कार्ड देण्यास सुरवात केली.
पुढे हळूहळू सर्वच राष्ट्रीयीकृत बँका, परदेशी बँका (Banks) आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊ लागल्या व आता क्रेडिट कार्ड ही उच्चभ्रूंची मक्तेदारी न राहता सर्वांसाठीच क्रेडिट कार्ड सहजगत्या उपलब्ध होऊ लागले आहे. सध्या आपल्या देशात सुमारे आठ कोटी क्रेडिट कार्ड वितरीत झाले असून, आजकाल उच्च मध्यमवर्गीय व उच्चभ्रू लोकांकडे किमान एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असल्याचे दिसून येते. (६३ टक्के लोकांकडे दोन किंवा त्याहून जास्त क्रेडिट कार्ड असल्याचे दिसून येते.) यातील बहुतेक जण कार्डाचा वापर आपल्या विविध पेमेंटसाठी करत असतात, तर फार थोडेजण याचा वापर आकस्मिक येणाऱ्या खर्चासाठी करीत असल्याचे दिसून येते. क्रेडिट कार्ड हे एक दुधारी शस्त्र आहे, याची जाणीव कार्डधारकास असणे अत्यंत आवश्यक आहे व ती असतेच असे नाही.
क्रेडिट कार्डचा वापर योग्यरितीने केला तर आपणास अनेक फायदे घेता येतात. मात्र, चुकीच्या पद्धतीने केलेला वापर आपणास कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकतो; ज्यामुळे आपली समाजातील व बँका व अन्य वित्तीय संस्थांकडील पत खालावत जाऊन आपण आर्थिक अडचणीत येऊ शकतो. त्यादृष्टीने क्रेडिट कार्डबाबतची प्राथमिक माहिती कार्डधारकास असणे आवश्यक आहे व ती पुढीलप्रमाणे आहे-
१) बिनव्याजी उचल मर्यादा (इंटरेस्ट फ्री क्रेडिट लिमिट): प्रत्येक क्रेडिट कार्डधारकास एक ठराविक मर्यादेपर्यंत उचल घेता येते. यालाच कार्डची ‘क्रेडिट लिमिट’ अथवा ‘क्रेडिट लाइन’ असे म्हणतात. ही मर्यादा कार्डधारकाची आर्थिक क्षमता विचारात घेऊन ठरविली जाते. उदा. आपल्या कार्डची क्रेडिट लिमिट एक लाख रुपये इतकी असेल, तर आपल्याजवळ अथवा बँकेत शिल्लक नसतानासुद्धा एक लाख रुपयांपर्यंत आपण खरेदी अथवा बिल पेमेंट करू शकता आणि विशेष म्हणजे याची परतफेड आपण बिलाच्या देय तारखेपर्यंत (ड्यू डेट) कधीही करू शकता. या रकमेवर कोणतीही व्याज आकारणी केली जात नाही.
थोडक्यात, बिलाची देय रक्कम या कालावधीसाठी आपणास बिनव्याजी दिली जाते. हा कालावधी किमान २० दिवस व कमाल ५० दिवसांच्या दरम्यान कितीही असू शकतो व तो आपण कार्ड कोणत्या तारखेस वापरले आहे, यावर अवलंबून असतो. सध्या नेट बँकिंगमुळे अगदी शेवटच्या दिवशी पेमेंट करता येते आणि जास्तीतजास्त कालावधीचा लाभ घेता येतो. बहुतेक सर्व क्रेडिट कार्डांची बिल डेट महिन्याच्या १० तारखेच्या जवळपास असते व पेमेंट डेट ३० तारखेच्या जवळपास असते. उदा. एसबीआय क्रेडिट कार्डची बिल डेट दरमहाची नऊ तारीख असून, पेमेंट डेट दरमहाची २९ तारीख आहे.
आता आपण बिल कसे होते ते पाहू. समजा, आपण डिसेंबरमध्ये कार्ड वापरत आहात व आपली क्रेडिट लिमिट २,५०,००० रुपयांइतकी आहे, तर आपण १० डिसेंबरपासून ते नऊ जानेवारीपर्यंत जास्तीतजास्त २,५०,००० रुपयांपर्यंतच आपल्या कार्डवर खरेदी अथवा बिल पेमेंट करू शकाल आणि समजा, या कालावधीत वेळोवेळी केलेली खरेदी ८५,००० रुपये इतकी असेल, तर आपल्याला १० जानेवारीला नऊ तारखेपर्यंतचे ८५,००० रुपयांचे बिल पाठविले जाईल व या बिलाचे पेमेंट २९ जानेवारीपर्यंत करणे आवश्यक असेल. आपण १० डिसेंबरला रु. ३५,००० ची, २५ डिसेंबरला २५,००० रुपयांची व नऊ डिसेंबरला २५,००० रुपयांची खरेदी केली असेल, तर या एकूण ८५,००० रुपयांचे पेमेंट २९/०१/२०२३ पर्यंत करणे जरुरीचे आहे. थोडक्यात, १० तारखेला केलेल्या खरेदीचे पेमेंट करण्यासाठी ५० दिवसांचा, तर २५ तारखेला केलेल्या खरेदीसाठी ३५ दिवसांचा, तर ९ तारखेला केलेल्या खरेदीसाठी २० दिवसांचा कालावधी मिळतो व यासाठी व्याज आकारले जात नाही.
हे देखिल वाचा-
२) केलेल्या व्यवहारांची नोंद (रेकॉर्ड ऑफ ट्रॅन्झॅक्शन): क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या पेमेंटचे दरमहा स्टेटमेंट कार्डधारकास मिळत असते. त्यामुळे वेगळे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसते. यामुळे आपण करत असलेल्या खर्चाचा तपशील व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. आजकाल बहुतेक सर्व क्रेडिट कार्डचे मोबाईल अॅप असल्याने आपल्या कार्डवरील व्यवहार कधीही पाहता येतात. तसेच एक ठराविक कालावधीतील व्यवहारही हवे तेव्हा मिळू शकतात.
३) विविध ऑफर: बहुतेक सर्व कार्डवर वेळोवेळी निरनिराळ्या ऑफर देऊ केल्या जातात. तसेच कार्ड वापरावर रिवॉर्ड पॉईंटस दिले जातात. असे रिवॉर्ड पॉईंटस ‘रिडीम’ करता येतात, तर काही वेळा कार्डवर खरेदी केल्यास कॅश बॅकही (५ ते १० टक्के) दिली जाते. अशा ऑफर साधारणपणे सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
४) इन्शुरन्स कव्हरः क्रेडिट कार्डधारकास कार्ड श्रेणीनुसार विविध प्रकारचे इन्शुरन्स कव्हर मिळत असते. बऱ्याचदा कार्डधारकास याची माहिती नसते. सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम व प्रीमियम अशा श्रेणी असतात.
अ) कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास एक ते चार लाख रुपयांपर्यंत (कार्ड श्रेणीनुसार) रक्कम वारसास दिली जाते. विमान अपघातात मृत्यू झाला, तर १० ते ४० लाख रुपयांची रक्कम वारसास दिली जाते. यासाठी मृत्यूच्या दाखल्यासह व अपघाताच्या अन्य तपशिलासह अपघात झाल्यापासून ३० दिवसांच्या आत क्लेम दाखल करणे आवश्यक असते. तसेच कार्डधारकाच्या नावावर असलेल्या रकमेपैकी ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम माफ केली जाते.
ब) कार्डद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंची खरेदी तारखेपासून १८० दिवसांच्या आत चोरी, खराबी अथवा आगीत जळणे असा प्रकार घडल्यास ५०,००० रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. कालावधी व नुकसानभरपाई कार्डनुसार कमी-अधिक असू शकते.
क) कार्ड चोरीस गेल्यास अथवा गहाळ झाल्यास व तशी नोटिस कार्ड कंपनीस दिल्यास तेथून पुढे होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी कार्डधारकावर राहात नाही.
५) सिबिल स्कोअर : आजकाल कोणतेही कर्ज मंजूर करण्यापूर्वी सर्व वित्तीय संस्था ‘सिबिल स्कोअर’ पाहतात. तो समाधानकारक असेल तरच कर्जमागणी अर्ज विचारात घेतला जातो. हा स्कोअर ३५० ते ९५० च्या दरम्यान असतो. तो जितका जास्त तितका चांगला. आपण क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेत केले असेल आणि आपली क्रेडिट लिमिट योग्य पद्धतीने वापरली असेल, तर कार्डधारकाचा क्रेडिट स्कोअर आपोआप चांगला राहतो व कार्डधारकाची पत वाढते.
६) इमर्जन्सीच्या वेळी उपयोगः अडीअडचणीच्यावेळी क्रेडिट कार्ड खूप उपयोगी पडते. (उदा. अकस्मात येणारे गंभीर आजारपण, अचानक करावा लागणारा प्रवास किंवा खरेदी) मात्र, यासाठी कार्डची क्रेडिट लिमिट दोन ते तीन लाख रुपयांची असणे आवश्यक असते. प्रसंगी क्रेडिट कार्डवर एटीएममधून रोख रक्कमसुद्धा काढता येते. शक्यतो क्रेडिट कार्डने एटीएमवर रोख रक्कम काढण्याचे टाळावे. कारण यासाठी चार्जेस जास्त असतात.
हे देखिल वाचा-
आता आपण क्रेडिट कार्डचे तोटे काय आहेत, ते पाहू.
१) पैसे नसतानाही अनावश्यक खरेदी केली जाऊ शकते.
२) बऱ्याचदा कार्डवरील नियमित वापर पाहून कार्डधारकास क्रेडिट लिमिट वाढवून दिली जाते. वाढीव लिमिटमुळे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू शकते.
३) बहुतेक सर्व क्रेडिट कार्डधारकास बिल पेमेंटसाठी ‘ईएमआय’ची सुविधा देऊ करतात. वरकरणी ही सुविधा आकर्षक वाटत असली, तरी प्रत्यक्षात फसवी असते. ते कसे हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. उदाहरणातील रु. ८५,००० चे बिल २९/०१/२०२३ अखेर पूर्णपणे भरल्यास कार्डधारकास ही रक्कम वरीलप्रमाणे बिनव्याजी मिळेल. मात्र, काही कारणाने संपूर्ण रक्कम देय तारखेच्या आत भरणे शक्य नसेल, तर कार्डधारक बिलाच्या किमान पाच टक्के रक्कम भरून (रु. ४२५०) उर्वरित रक्कम १२ समान हप्त्यांत भरू शकतो.
यामुळे कार्डावरील नावे बाकी अनियमित होत नाही. मात्र, पुढील महिन्यात रु. १,६०,७५० पर्यंतच कार्डवर खरेदी करता येईल. (२,५०,०००-८५,०००+४,२५०=१,६०,७५०) व उर्वरित रु. ८०,७५० (८५,०००-४,२५०) रकमेवर १० ते १२ टक्के दराने व्याजआकारणी केली जाते. या सुविधेमुळे कार्डधारकास अन्य कर्जासाठी करावी लागणारी पूर्तता (उदा. कर्जमागणी अर्ज, जामीनदार, कर्जाचे कारण, तारण, डॉक्युमेंट) न करता अगदी विनासायास एक वर्षासाठी कर्ज मिळू शकते. आजकाल बऱ्याच कार्डवर ही सुविधा उपलब्ध असते. असे असले तरी शक्यतो ही सुविधा न वापरलेलीच बरी!
समजा, कार्डधारकाने पहिल्या वापरातच कार्डची सर्व लिमिट वापरली आणि पुढे दरमहा पाच टक्के इतकेच पेमेंट केले, तर ही रु. २,५०,००० ची परतफेड करण्यास त्याला ४५ महिने इतका कालावधी लागेल. म्हणून ही सुविधा शक्यतो वापरू नये आणि काही अपरिहार्य कारणाने वापरावी लागली, तर उर्वरित रक्कम पुढील एक-दोन महिन्यांतच चुकती करावी; जेणेकरून आपण कर्जाच्या सापळ्यात अडकणार नाही. शक्यतो कार्ड पेमेंट लिमिटच्या ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतच वापरावी. एक किंवा दोन क्रेडिट कार्डच वापरावीत, त्यापेक्षा जास्त कार्ड वापरणे योग्य नाही.
४) कार्ड पेमेंट देय तारखेपर्यंत झाले नाही, तर ३६ ते ४० टक्के इतक्या दराने व्याज आकारणी केली जाते. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
५) याशिवाय कार्डधारकास पुढीलप्रमाणे विविध चार्जेस आकारले जातात-
अ) वार्षिक फी तसेच नूतनीकरण फी.
ब) लेट पेमेंट चार्जेस
क) रिवार्ड पॉईंटस रिडीम चार्जेस
ड) अवाजवी व्याजदर
क्रेडिट कार्डचा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक आता ‘टोकनायझेशन’ची सुविधा देऊ करत आहे. यामुळे आपल्या कार्डवरील नाव, नंबर, एक्सपायरी डेट यासारखा महत्त्वाचा तपशील मर्चंटच्या वेबसाईटवर साठविला जाणार नाही व आपल्या कार्डाचा गैरवापर टाळता येईल. तसेच आतापर्यंत गुगलपे/भीम/फोनपे यासारख्या यूपीआय अॅपचा वापर करताना क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत नव्हते. नुकतीच ही सुविधा रूपे क्रेडिट कार्डला रिझर्व्ह बँकेने देऊ केली आहे. लवकरच अन्य कार्ड (मास्टर/व्हिसा) सुद्धा गुगलपे/भीम/फोनपे यासारख्या यूपीआय अॅपशी संलग्न करता येतील आणि कोठेही क्रेडिट कार्डद्वारे क्यूआर कोड स्कॅन पेमेंट करता येईल.
थोडक्यात असे म्हणता येईल, की क्रेडिट कार्ड ही एक उत्तम सुविधा आहे. मात्र, गरज आहे ती योग्य प्रकारे त्याचा वापर करण्याची; अन्यथा हे दुधारी शस्र आहे, ज्यामुळे कार्डधारक कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो.
रिझर्व्ह बँकेच्या काही मार्गदर्शक सूचना
ता. १/१०/२०२२ पासून रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार-
१) कार्डधारकाने कार्ड इश्यू केल्यापासून ३० दिवसांच्या आत आपले कार्ड अॅक्टिव्हेट (कार्यान्वित) केले नसेल, तर त्यानंतर कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी ‘ओटीपी’द्वारे कार्डधारकाची संमती घेणे बँकेवर बंधनकारक असेल. अशी संमती नसेल, तर सात दिवसांच्या आत कार्ड रद्द करावे लागेल व त्यासाठी चार्जेस लावता येणार नाहीत.
२) कार्डधारकाच्या लिखित विनंतीशिवाय कार्डाची क्रेडिट लिमिट बँकेस परस्पर वाढविता येणार नाही.
३) क्रेडिट कार्डच्या देय रकमेच्या पेमेंटसाठी, तसेच किमान पेमेंटबाबतची व थकीत पेमेंटबाबतच्या अटी व शर्तींची तपशीलवार माहिती कार्डधारकास देणे बँकेवर बंधकारक असेल.
४) नवे कार्ड देताना किंवा आधीच्या कार्डाचे नूतनीकरण करताना देण्यात येणारे कार्ड हे फक्त देशांतर्गत आर्थिक व्यवहारांसाठी उदा. एटीएममधून रोख रक्कम काढणे किंवा पॉस मशीनवर पेमेंट करण्यासाठी वापरता येईल, असे देणे अपेक्षित आहे.
५) कार्डधारकास ऑनलाइन पेमेंट, कॉन्टॅक्टलेस पेमेंट (संपर्करहित), तसेच परदेशी व्यवहार (इंटरनॅशनल) करायचे असतील, तरी अशी सुविधा संबंधित कार्डधारकाने आपल्या कार्डवर स्वतंत्रपणे कार्यान्वीत करून घेणे आवश्यक आहे.
६) कार्डधारकाला आपल्या सर्व प्रकारच्या व्यवहारांची कमाल मर्यादा आता ठेवता येणार आहे व यात आपल्या गरजेनुसार बदल करता येणार आहे. मात्र, क्रेडिट कार्डच्या बाबतीत असलेल्या लिमिटपेक्षा जास्त कमाल मर्यादा ठेवता येणार नाही. तसेच आपले कार्ड स्वीच ऑन व स्वीच ऑफसुद्धा करता येणार आहे, हे बदल कार्डधारकास मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा आयव्हीआर (इनरिॲक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) माध्यमातून सहजपणे करता येतील.