Share Market- ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशी ही बनवाबनवी}

ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

अदानी उद्योगसमूहाचा ‘कॅश फ्लो’ दमदार आहे. तसेच मालमत्ताही भरभक्कम आहे. बँकांच्या कर्जाचे तारण पुरेसे आहे. हे असे झाल्यास उर्वरित शेअर बाजाराला धोका नाही...पण तरीही गुंतवणूकदारांनी काळजी ही घ्यायलाच हवी....

महाभारतात पांडवांचा शेवटचा वंशज अभिमन्यू पुत्र, परीक्षित राजाला शाप मिळाला होता, की एका नागाच्या हातून त्याला सात दिवसांत मृत्यू येईल. राजाने महालात कुठलाही साप आत येणार नाही, असा अत्यंत कडेकोट बंदोबस्त केला. नेमका सातव्या दिवशी तक्षक नाग एका अळीचे रूप घेऊन आला आणि त्याने राजाचा बळी घेतला. कथेच्या तपशीलात न जाता, इतकेच सांगतो, की असाच एक तक्षक नाग ‘हिंडेनबर्ग’च्या रूपाने अदानींच्या साम्राज्यात शिरला आणि त्याने भरपूर विध्वंस केला, असे दिसते, तो येथेच थांबावा, ही अपेक्षा. (Hindenburg Report and Adani What Investors and Traders should do)

अदानी (Adani) समूहाने २५ नोव्हेंबर २०२२ रोजी स्टॉक एकस्चेजेसना ‘आम्ही जनतेकडून पैसे उभे करणार आहोत,’ हे कळवले. त्या दिवशी अदानी एंटरप्रायझेसचा भाव होता रु. ३९००. त्यानंतर मात्र या शेअरची (Shares) पुढील वाटचाल अडखळतच झाली. तोपर्यंत हा शेअर फक्त वर जात असे व हौशेनवशे त्यात पैसे गुंतवून नफाही मिळवीत असत. तेव्हाही या शेअरचे पी/ई गुणोत्तर ३५० च्या वर होते. कुठल्याही निकषावर हे मूल्यांकन अतिमहाग याच सदरात मोडले असते.

पण एक जून २०२१ च्या रु. १५४६ या भावापासून तो वरच जात असे. त्यात गेल्या तीन वर्षांत सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी जी दमदार पावले उचलली होती, त्यात अदानींचा मोठा वाटा होता. देखण्या वधूचे गोत्र विचारू नये, असे म्हणतात. साहजिकच या पार्श्वभूमीतून वर जाणाऱ्या शेअरवर परदेशी संस्थाही भाळल्या. ‘ग्रोथ स्टॉक’ या नावाखाली शेअरचा भाव, त्याचा पी/ई कडे न पाहता भरपूर वाढत गेला, गुंतवणूक होत गेली.

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ (Hindenburg Research) ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था शेअर व बाँडची विक्री (स्वत:कडे मालकी नसताना) करून, शेअर खाली आला तर तो विकत घेऊन, त्यात पैसे मिळवण्यासाठीच संशोधन करते. लायकीपेक्षा अतीमोठा भाव असलेला शेअर, त्या भावाच्या थोडे खाली पुन्हा वीस हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना, त्यात अतिशय वेगाने आशिया खंडात सर्वांत श्रीमंत म्हणून गणना होणाऱ्या व्यक्तीला असणारे हितशत्रू, ‘हिंडेनबर्ग’साठी सारे रसायन तयारच होते. त्यांनी भरपूर खोदकाम करून या समूहावर अनेक आरोप केले. त्यातील महत्त्वाचे आरोप पुढीलप्रमाणे-

१. अदानी समूहाने हवाला मार्गाने परदेशी पैसे पाठवले आणि ते परदेशी संस्थांमार्फत पुन्हा स्वत:च्याच शेअरमध्ये गुंतवून शेअरचे भाव फुगवले.
२. समूह ऑपरेटर्सना हाताशी धरून शेअर बाजारात मोठी उलाढाल करते आणि त्यातून शेअरचे भाव फुगवते. त्या वाढीव भावांवर पुन्हा कर्ज घेते व नवनव्या कंपन्या विकत घेते.

हे देखिल वाचा-

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
यावर अदानींनी सर्व आरोप खोडून काढत आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू, असे म्हटले आहे आणि ते आव्हान ‘हिंडेनबर्ग’ने स्वीकारले आहे. यातील पहिला आरोप यापूर्वीही विविध व्यक्ती व समूह यांच्यावर झालेला आहे. भारतातून हवाला मार्गाने पैसे परदेशी जातात व ‘योग्य’ त्यावेळी मॉरिशसमार्गे ते देशात आणले जातात, असा आरोप वेळोवेळी केला जातो. यात काही राजकीय नेत्यांचीही नावेही मागे येत असत. आजपर्यंत तरी असा आरोप सिद्ध झालेला नाही.

तसेच याआधी १९९९ मध्ये अदानी एक्स्पोर्टचे शेअर एक महिन्यात रु. ४९५ चे रु. १३०० असे वाढले व त्यात एक ऑपरेटर केतन पारेख गुंतलेला होता, त्यात या समूहाचा हात असावा, असा ‘सेबी’ला संशय आला व चौकशीही झाली. चौकशीअंती या समूहावर केतन पारेखबरोबर व्यवहार केल्याचा ठपका आला होता. त्यात दोन वर्षे या समूहातील काही कंपन्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदीही होती. या जुन्या इतिहासाने ‘हिंडेनबर्ग’ संस्थेला बळ मिळाले असावे.
तसेच जून २०२१ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत कंपनीची कामगिरी फारशी दैदिप्यमान नसताना भाव दोन-अडीचपट झाला. यात काही ऑपरेटरशी हातमिळवणी वा हितसंबंध आहेत का, याची चौकशी ‘सेबी’ करणार आहे, तसेच कथित हवाला व्यवहाराची चौकशी रिझर्व्ह बँक व इतर योग्य त्या संस्था करतीलच व त्यातून सत्य बाहेर येईल, त्यासाठी कल्पनाविलास नको.

हे देखिल वाचा-

‘एफपीओ’ मागे घेण्याची चाल
असे म्हणतात, की प्रत्यक्ष घटनेपेक्षा, ती होणार ही भीतीच जास्त प्रभावशाली असते. बाजार आता पडणार या भीतीनेच विक्री होत राहते. ‘हिंडेनबर्ग’च्या आरोपांची पूर्ण शहानिशा न करताच, भागधारक परदेशी संस्थांनी डोळे झाकून विक्री केली. उदा. नॉर्वेजियन सॉव्हरिन फंडाने भांडारातील जवळपास सर्व शेअर विकले. या जोडीला हिंडेनबर्ग व स्थानिक सट्टेबाजांनीही हात धुवून घेतले. पाहतापाहता हा शेअर रु. ३३०० वरून रु. १५०० वर पोचला. या सगळ्या गदारोळात अदानी समूहाने आपले नेटवर्क वापरून ‘एफपीओ’चा संपूर्ण भरणा होईल हे बघितले व तसे वृत्त प्रसूत झालेही. मात्र, एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन अदानींनी ही भागविक्रीच मागे घेतली. झाली तेवढी शोभा पुरे झाली; आता नव्याने बाजारात जाऊ, असे त्यांनी ठरवले असावे.

आता अदानी समूहापुढील पर्याय :
१. ‘ऑपरेटर नेक्सस’च्या आरोपातून व हवाला आरोपातून सहीसलामत बाहेर पडणे.
२. कर्ज गेल्या वर्षात दुप्पट झाले आहे, यापुढे ते अधिक न वाढवणे. त्याच्या व्याजाचा भरणा, तारीख न चुकवता करणे. खरे तर या उद्योगसमूहाचा ‘कॅश फ्लो’ दमदार आहे. तसेच मालमत्ताही भरभक्कम आहे. बँकांच्या कर्जाचे तारण पुरेसे आहे. हे असे झाल्यास उर्वरित शेअर बाजाराला धोका नाही.

सरकारपुढील पर्याय :
१. वरील गोंधळाचा फायदा विरोधी पक्ष घेणारच. त्यातून निवडणुका एक वर्षात आहेत. अदानी समूहापासून अलिप्त राहून स्वत:ची प्रतिमा सांभाळणे सर्वांत महत्त्वाचे.
२. कायदेशीर कार्यवाही निःपक्षपातीपणे चालेल, याची खात्री करणे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?
१. कोणत्याही शेअरच्या मागे धावताना वेळोवेळी नफा ताब्यात घ्यायलाच हवा. भरमसाठ वाढलेला शेअर तसाच वाढत राहील, ही सतत अपेक्षा करणे चुकीचेच आहे.
२. शेअरचे मूल्यांकन ध्यानी घ्यायलाच हवे. ‘रिव्हर्जन टू मीन’ हे तत्व लक्षात ठेवावे. कधीतरी बाजाराचा प्राधान्यक्रम बदलतो, आपण त्याप्रमाणे आपले धोरण बदलले पाहिजे.
३. ‘डे ट्रेडिंग’ असो, अल्प वा दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक, ‘स्टॉपलॉस’ हवाच!

(लेखक ‘अर्थबोध शेअर्स’ या संस्थेचे कार्यकारी संचालक व शेअर बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक आहेत.)