Silicon Vally Bank- ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिकाॅन व्हॅलीत खळबळ}

ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

अतुल सुळे

सिलिकाॅन व्हॅलीत नवउद्योगांना भांडवल पुरणाऱ्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्या आणि प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांना गरजांनुसार सेवा पुरवणारी बलाढ्य सिलिकाॅन व्हॅली बँक ४८ तासांत बुडाली आणि जगभरात खळबळ उडाली...जाणून घ्या ही बँक बुडाली कशी...

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील दक्षिण सॅन फ्रन्सिस्को बे एरिया हा तंत्रज्ञानावर आधारीत मोठ्या कंपन्यांचे माहेरघर मानले जातो. या प्रदेशाला ‘सिलिकॉन व्हॅली’ असे म्हटले जाते. ॲपल, गुगल, मेटा यासारख्या मोठ्या कंपन्यांबरोबरच असंख्य छोटी-मोठी स्टार्ट-अप (नवउद्योग) येथे जन्मला आले आणि मोठे झाले. अशा नवोद्योगांना भांडवल पुरवणाऱ्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्या व प्रायव्हेट इक्विटी कंपन्या सुद्धा येथे अस्तित्वात आहेत व या सर्वांना त्यांच्या गरजांनुसार सेवा पुरवणारी एक प्रख्यात बँक म्हणजे ‘सिलिकॉन व्हॅली बँक.’ (How Silicon Vally Bank collapsed in short time)

या बँकेचे मुख्य कार्यालय सांटाक्लारा, कॅलिफोर्निया येथे असून, ही बँक गेली चार दशके कार्यरत आहे. या बँकेत ८५५३ कर्मचारी असून, ती अमेरिकेतील १६ नंबरची बँक आहे. या बँकेला गेली पाच वर्षे ‘बेस्ट बँक ॲवॉर्ड’ही फोर्ब्ज मासिकाने दिले आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी या बँकेच्या ॲसेट (प्रामुख्याने दिलेली कर्जे २१२ अब्ज डॉलर, तर लायबिलिटी (प्रामुख्याने ठेवी) १७५ अब्ज डॉलर एवढी होती.

बँकेला १.८ अब्ज डॉलरचा तोटा
सर्व काही आलबेल असतानाच बँकेचे मुख्य अधिकारी ग्रेगरी बेकर यांनी आठ मार्च २०२३ रोजी असे जाहीर केले, की बँकेने २१ अब्ज डॉलरच्या सिक्युरिटीज (रोखे) विकल्या असून, त्यावर बँकेला १.८ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. ही बातमी जाहीर होताच खातेदारांनी ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली म्हणजे भल्याभल्या बँका ज्याला घाबरतात तो ‘बँक रन’ सुरू झाला. शुक्रवार, १० मार्च २०२३ रोजी ‘एसव्हीबी’चा शेअर २६७ डॉलरवरून ६० टक्क्यांनी कोसळून १०६ डॉलरवर बंद झाला.

तातडीने ‘कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फिनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशन’ या वित्तीय नियामक संस्थेने ही बँक बंद करून ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ला (एफडीआयसी) ‘रिसिव्हर’ म्हणून नेमल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे ‘सिलिकॉन व्हॅली’त एकच खळबळ उडाली. ‘एफडीआयसी’च्या नियमानुसार फक्त २,५०,००० डॉलरपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे. या बँकेचे बहुतांश ठेवीदार (९७ टक्के) मालदार असल्याने त्यांना हे सुरक्षाकवच उपलब्ध होणार नसल्याने त्यांचे धाबे दणाणले. आता रिसिव्हर ॲसेट विकून जो लाभांश देईल, त्यावरच त्यांना समाधान मानावे लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे.

हे देखिल वाचा-

बँक ४८ तासांत कोसळलीच कशी?
आता वाचकांना प्रश्न पडणे साहजिकच आहे, की ४० वर्षे जुनी, एवढी मातब्बर बँक ४८ तासांत कोसळलीच कशी? दोनच वर्षांपूर्वी स्टार्ट-अप व्हेंचर कॅपिटॅलिस्ट, प्रायव्हेट इक्विटी कंपन्या खूपच जोरात होत्या. स्टार्ट-अपचे नवनवीन इश्यू बाजारात येत होते व त्यांच्या शेअरची अतिशय चढ्या भावाने विक्री होत होती, त्याला उत्तम प्रतिसादही मिळत होता व त्यामुळे व्हेंचर कॅपिटलिस्ट व प्रायव्हेट इक्विटीवाल्यांनी भरपूर पैसा कमाविला. या काळात ‘एसव्हीबी’च्या ठेवी १९८ अब्ज डॉलरपर्यंत गेल्या होत्या व बँकेचा शेअर ५९७ डॉलरपर्यंत वधारला होता. त्यावेळी अमेरिकेतील ‘फेडरल रिझर्व्ह’चा रेफरन्स रेट ० ते ०.२५ टक्के होता.

परंतु, महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘फेड’ने व्याजाचे दर वाढवत वाढवत ४.५ टक्क्यांपर्यंत नेले. त्यामुळे ‘स्टार्ट-अप’ना फंडिंग मिळेनासे झाले, कर्जाचा उठाव कमी व त्यामुळे ‘एसव्हीबी’ने जास्तीचे पैसे अमेरिकन ट्रेझरी व मॉर्गेज बॅक्ड रोख्यांमध्ये गुंतविले. हे रोखे सुरक्षित असले तरी जसजसा व्याजाचा दर वाढत जातो, तसतशी या रोख्यांची किंमत कमी होते. हे रोखे दोन प्रकारचे असतात- ‘ॲव्हेलेबल फॉर सेल’ (विक्रीस उपलब्ध) व ‘हेल्ड टिल मॅच्युरिटी’ (मुदतपूर्तीच्या वेळीच उपलब्ध). ‘एसव्हीबी’ने २१ अब्ज डॉलरचे रोखे विकून १.८ अब्ज डॉलरचा ‘लॉस बुक’ केला.

त्यामुळे बाजारात घबराट पसरली, ठेवीदारांनी पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी व्हायचे तेच झाले- बँक बंद पडली आणि मोठे ठेवीदार अडचणीत सापडले. आता हा प्रश्न एकाच बँकेपुरता मर्यादित आहे, का सब-प्राईम कर्जाच्या समस्येसारखा तो इतर क्षेत्रांमध्ये पसरणार, हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु, अमेरिकी ‘फेड’ने व्याजदरवाढीच्या धोरणाचा फेरविचार करणे गरजेचे झाले आहे. कारण एका अंदाजानुसार अमेरिकी बँकांच्या ताळेबंदावर सध्या ६२० अब्ज डॉलर ‘बुक न केलेले लॉसेस’ बसलेले आहेत. हा ‘टाईम बाँब’ कधीही फुटू शकतो.

भारतावर परिणाम होणार का?
या आजाराची लागण, विशेषतः भारतात पसरू शकते का? हेही आता सांगणे कठीण आहे. आपल्याकडेही रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेट वाढविण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे ‘इएमआय’ भरमसाठ वाढले आहेत. हे सत्र असेच चालू राहिले, तर आपला जीडीपी वाढीचा दर ४-५ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो; शिवाय देशातील बँकांच्या ताळेबंदात ‘ॲव्हेलेबल फॉर सेल’ रोखे किती आहेत व त्यावर व्याजदरवाढीमुळे ‘मार्क टू मार्केट’ लॉसेस किती झाले आहेत, त्याचा आढावा घेणे अत्यावश्यक झाले आहे. म्हणतात ना, ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’!
- सिलिकॉन व्हॅली बँक -
स्थापना : १९८३
मुख्य कार्यालय : सांटाक्लारा, कॅलिफोर्निया.
कर्मचारी : ८५५३
ॲसेट (३१/१२/२०२२) : २१२ अब्ज डॉलर
ठेवी (३१/१२/२०२२) : १७५ अब्ज डॉलर
शेअरचा भाव (९/३/२०२३) : २६७ डॉलर
शेअरचा भाव (१०/३/२०२३) : १०६ डॉलर
गेल्या वर्षातील उच्चांकी भाव : ५९७ डॉलर

(लेखक बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक-विश्लेषक आहेत.)

टॅग्स :Share MarketBanking