
कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
संजीव मोघे
बँकांकडून क्रेडिट कार्ड घ्या असे फोन येतात...अनेक वेगवेगळे फायदे या बँकांचे प्रतिनिधी सांगतात. पण क्रेडिट कार्ड निवडताना नक्की कुठलं निवडावं यासाठी वाचा....
क्रेडिट कार्डचा (Credit Card) उपयोग पेमेंटची सोयीस्कर पद्धत यापेक्षाही बराच जास्त आहे. प्रत्येक कार्डमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक, डिस्काउंट आणि इतर फायदे यासारखी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तुमच्या गरजांसाठी सर्वांत योग्य असे क्रेडिट कार्ड निवडणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी सर्वांत योग्य कार्ड निवडायला मदत करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स देत आहे. (How to choose right Credit Card)
१) आवश्यक पात्रताः आवश्यक पात्रता ही कार्डनुसार बदलू शकते. काहींना उच्च रक्कम आणि क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे. ते कोणत्या कार्डसाठी पात्र आहेत, ते तपासावे आणि फक्त त्यांचीच यादी करावी. नाकारला जाईल अशा कार्डसाठी अर्ज करण्यात काही अर्थ नाही आणि या प्रक्रियेत एखाद्याचा क्रेडिट स्कोअर कमी होईल.
२) खर्चाच्या पद्धती लक्षात घ्या: एखाद्याने त्यांच्या खर्चाची पद्धत शोधून काढली पाहिजे आणि त्याच्याशी कार्डचे फायदे अधोरेखित केले पाहिजेत. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कामावर जाण्यासाठी दुचाकी वापरत असल्यास, इंधन (Fuel) भरताना कॅशबॅक देणारे कार्ड शोधण्यात अर्थ आहे. दुसरीकडे, एखादी व्यक्ती ऑनलाइन खरेदी अधिक करत असेल तर शॉपिंग पोर्टल किंवा ब्रँडवर सूट देणारे कार्ड निवडणे अधिक फायदेशीर ठरेल.
कॅशबॅक (Cashback) आणि सवलत यांसारखे फायदे कसे कार्य करतात, हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी नेहमी फाइन प्रिंट वाचा. तेथे बँका लागू करू शकतील असे रायडर, डिस्क्लेमर किंवा किमान खर्च मर्यादा असू शकतात. संपूर्ण गोष्टी समजून घेतल्यावरच माहितीपूर्ण निर्णय घेता येऊ शकतो.
पतमर्यादा: क्रेडिट (Credit) मर्यादा म्हणजे बँक ग्राहकाला कार्डवर खर्च करू देते ती कमाल रक्कम. खरे सांगायचे झाले, तर एखाद्याने सर्वांत जास्त क्रेडिट मर्यादा सादर करणारे कार्ड निवडले पाहिजे. बँकांद्वारे दिली जाणारी क्रेडिट मर्यादा उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअरवर आधारित वेगवेगळी असते. तथापि, महिन्यासाठीची संपूर्ण क्रेडिट मर्यादा खर्च करणे उचित नाही, कारण बँकांकडून याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. वास्तविक, मासिक खर्च कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यास मदत होईल. कार्डमधील उच्च उपलब्ध शिल्लक सूचित करते, की तुमच्या सर्व गरजा पूर्ण करताना तुम्ही या ५० टक्के मर्यादेत राहू शकता. याशिवाय, वैद्यकीय आणीबाणीसारख्या घटनांमध्ये कार्डवर जास्त उपलब्ध क्रेडिट उपयुक्त ठरू शकते.
बजेट: तुम्ही क्रेडिट कार्डच्या खर्चासाठी मासिक बजेट देखील बनवावे आणि त्या बजेटसाठी सूट किंवा कॅशबॅकच्या बाबतीत कोणते कार्ड सर्वोत्तम फायदे देतात, ते तपासावे. उदाहरणार्थ, युटिलिटी बिले भरण्यासाठी आणि खरेदीसाठी तुमचे बजेट १५,००० रुपये असेल आणि अशा खर्चावर १० टक्के कॅशबॅक देणारे कार्ड निवडल्यास तुम्ही सहजपणे प्रति महिना सुमारे १५०० रुपये वाचवू शकता.
वार्षिक शुल्क: बऱ्याच बँका अशा प्रकारचे काही कार्ड प्रकार देतात, ज्यात कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही. हे जरी आकर्षक वाटत असले तरी अशा कार्डांची इतर वैशिष्ट्ये बऱ्याचदा मर्यादित असतात. विविध प्रकारची कार्डस मोठ्या वार्षिक शुल्कासह मिळू शकतात; परंतु त्यांचे विविध फायदे असतात. त्यामुळे हे निकष बघून मगच योग्य निर्णय घ्यावा.
हे देखिल वाचा-
इतर फायदे: अनेक कार्डे विमानतळ लाउंज प्रवेश, वर्धित लॉयल्टी पॉइंट्स, आंतरराष्ट्रीय प्रवासावर आणि हॉटेल बुकिंगवर सवलत यासारखे फायदे देतात. क्रेडिट कार्ड निवडताना अशी वैशिष्ट्ये आपल्यासाठी महत्त्वाची आहेत का ते पाहा आणि नंतर निर्णय घ्या.
शेवटचे, परंतु महत्त्वाचे म्हणजे कोणीही कोणतेही कार्ड निवडले तरीही क्रेडिट कार्डचे बिल पूर्ण आणि देय तारखेपूर्वी भरले पाहिजे. तुम्ही तुमच्या बिलाची केवळ किमान रक्कम भरणे देखील टाळले पाहिजे. यामुळे खर्चाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात आणि आर्थिक शिस्त निर्माण करण्यात मदत होईल.
(लेखक ॲक्सिस बँकेच्या कार्डस आणि पेमेंट्स विभागाचे प्रमुख आहेत.)