Women and Investment- देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला आणि आर्थिक नियोजन}

देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सुवर्णा बेडेकर
देशातील अर्धी लोकसंख्या आर्थिक नियोजनाविषयी उदासिन असेल, तर आर्थिक विकासाची गाडी वेग कशी घेणार? भारतीय महिलांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आज गरज आहे. विशेष म्हणजे देशात ३२ महिला फंड मॅनेजर एकूण ४.५५ लाख कोटी रूपयांची मालमत्ता सांभाळतात आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ करीत आहेत. याचाच अर्थ महिलांनी ठरवलं, तर त्या आर्थिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य करू शकतात.

अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. ‘भारतामध्ये आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचं क्षेत्र महिलांकडून दुर्लक्षित राहिलं आहे,’ अशा आशयाची ही बातमी होती. या संदर्भात एका खासगी पाहणी संस्थेनं देशातल्या वेगवेगळ्या शहरातल्या साधारण चार हजारांपेक्षा अधिक महिलांकडून प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण केलं आहे. बातमी जशी लक्षवेधी आहे, तशीच ती विचार करायला लावणारीही आहे. पन्नास टक्के लोकसंख्या आर्थिक नियोजनाबद्दल ढिसाळपणा दाखवत असेल, तर आर्थिक विकासाची गाडी वेग कशी घेणार? इतका मोठा, व्यापक विचार यातून करण्याची आवश्यकता आहे. (Indian Women and Financial Planning)

महिलांचे बचतीला महत्त्व कायम
वास्तविक, आपण भवताली चित्र पाहिलंय, ते थोडं वेगळं होतं. अगदी आपल्या आई-आजींनी तांदळा-डाळींच्या डब्यात साठवलेले पैसे घरातल्या आणीबाणीच्या काळात कितीतरी उपयोगी पडायचे. विशेष म्हणजे ही गोष्ट ज्या काळात महिला सर्रास कमावत्या नव्हत्या, तरीही घडत होती. तसंच वर्षभरातून दसरा, दिवाळी, दोन पाडवे, गुरूपुष्यामृत अशा मुहूर्तांना न चुकता आपल्या साठवलेल्या पैशातून ग्रॅम-दोन ग्रॅम सोनं घेऊन, दोन-तीन वर्षांनी घसघशीत दागिना करणाऱ्या गृहिणी आपण आजूबाजूला पाहिल्या आहेत. हा झाला ६० च्या दशकातला किंवा त्याआधीचा काळ! यानंतर नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढायला लागली. शिक्षिका आणि परिचारिका अशी तुलनेनं सुरक्षित क्षेत्र महिलांना नोकरीसाठी योग्य, असा एक समज दृढ होता.

एक मात्र नक्की, की त्या काळात नोकरी करणाऱ्या बाईलाही आपल्या कष्टाचा पैसा मनाला वाट्टेल तसा खर्च करण्याची मुभा अजिबातच नव्हती. कारण घरामध्ये सासू-सासरे, दीर-जाऊ, घरात एखादी लग्नाची धाकटी नणंद असायची आणि घराची सगळी आर्थिक सूत्रं बहुतेक सासरे, मोठे दीर, चुलत सासरे यांच्या हाती असायची. म्हणजे आपला नवराच त्याच्या वडिलांच्या, काकांच्या हाती पगार देत असेल, तर आपला पैसा स्वतःच्या मनाप्रमाणे खर्च करण्याचं धाडस सुनेमध्ये नसायचं. आता पुलाखालून पाणी बरंच वाहून गेलंय. मी कष्ट करते, मी कमावते, माझा पैसा! इतका स्पष्ट, रोखठोक व्यवहाराचा काळ आज आला आहे. असं असतानाही महिला गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अजून प्राथमिक इयत्तेत का बरं?

महिलांसाठी आर्थिक नियोजनाचं महत्त्व
या प्रश्नाकडं वळण्याआधी महिलांसाठी आर्थिक नियोजन का महत्त्वाचं आहे, याचा विचार आपण करू! एक तर महिला आणि पुरूष यांच्याकडील संपत्तीचा म्हणजेच त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा विचार केला, तर दोघांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात फरक आहे आणि म्हणूनच महिलांनी आपल्या उत्पन्नाचं अगदी व्यवस्थित तज्ज्ञांच्या मदतीनं नियोजन करण्याची गरज आहे. एका पाहणीत असं दिसून आलं आहे, की महिला आपल्या उत्पन्नापैकी बराचसा भाग घरासाठी, कुटुंबासाठी वापरतात.

म्हणजे, घर आणि नोकरी एवढी यातायात करते ती संसारासाठीच, मग घराचे हप्ते माझ्या पगारातून गेले तर कुठं बिघडलं? मग भले ते घर त्या महिलेच्या नावे असो अथवा नसो, काही फरक पडत नाही. घरात कोणताही मोठा खर्च आला, लग्नकार्य आलं, तर महिलेच्या नोकरीतून साठवलेल्या पैशातून तो खर्च केला जातो. थोडं वेगळ्या भाषेत लिहायचं झालं, तर घराची आर्थिक उन्नती लवकर होण्यात कमावत्या महिलेचा मोठाच हातभार लागतो, हे कोणीही नाकारणार नाही. वास्तविक तिच्या उत्पन्नाचं उत्तम नियोजन केलं गेलं, तर आणखी पैसे गाठीला बांधले जातील, हा विचार मात्र गांभीर्यानं केला जात नाही.

इन्फोसिस कंपनी सुरू करण्यासाठी सर्वांत पहिली गुंतवणूक म्हणून सुधा मूर्ती यांनी आपली साठवलेली काही हजारांची पुंजी नारायण मूर्तींच्या हाती दिली. ‘एका अर्थाने मी खूप उत्तम नाही, तर सर्वोकृष्ट अगदी अव्वल दर्जाची गुंतवणूकदार आहे. अतिशय योग्य व्यक्तीकडे मी माझी ठेव सुपूर्द केली आणि कालांतरानं इन्फोसिसचं साम्राज्य निर्माण झालं,’ असं सुधा मूर्ती हसत हसत सांगतात. तसं पाहिलं, तर सर्व महिलांमध्ये अंगभूतच पैशाला पैसा जोडण्याचं कसब असतं. घासाघीस करून वस्तू कमीत कमी पैशात पदरात पाडून पैसे वाचवण्याचा कल त्यांचा असतो. मात्र, तो कुठं गुंतवायचा, याविषयी त्या फारशा सजग नसतात, असं दिसून आलं आहे.

हे देखिल वाचा-

सकारात्मक परिवर्तन
आर्थिक गणितं मांडून पैसा गुंतवताना अतिशय संयम दाखवावा लागतो. एकदम भरपूर कमाई करण्याच्या मार्गानं जाऊन जोखीम पत्करण्याची गरज नसते. तसंच जोखमीचं संतुलन साधावं लागतं. ही कसरत महिला उत्तम करू शकतात, असा अनुभव गेल्या काही वर्षांत बाजारपेठेमध्ये येत आहे. मात्र, अशा आर्थिक आघाडीवर दक्ष असणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढण्याची आज गरज आहे. विशेष म्हणजे कमावणाऱ्या महिलांपैकी जवळपास ६० टक्के महिला स्वतंत्रपणे कोणताही आर्थिक निर्णय घेत नाहीत. त्यातही महानगरे वगळली आणि देशातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्तरातल्या शहरांमध्ये, तर ६५ टक्के महिलांचे गुंतवणुकीबाबत मतही विचारात घेतलं जात नाही. सगळे व्यवहार पुरूषमंडळी करतात. यामागे ‘तिला काय यामधलं समजणार आहे? किंवा तिला विचारण्याची गरजच काय?’ असाही विचार असतो. हे इथं खेदानं नमूद करावं लागत आहे.

गुंतवणुकीचा विचार करताना महिला सर्वाधिक बॅंकेतल्या ‘फिक्स डिपॉझिट’ला म्हणजे मुदत ठेवीला प्राधान्य देतात किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं त्यांना जास्त सोईचं आहे, असं वाटतं. आपली जमापुंजी भांडवली बाजारात गुंतवावी, असं महिलांना मनापासून अजिबात वाटत नाही. मात्र, हे चित्र अलिकडच्या काळात थोडं बदलत आहे. म्हणजे गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये म्युच्युअल फंडाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता महिला दाखवत आहेत, ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

विशिष्ट चाकोरीतून बाहेर पडून विमा कंपन्या, बॅंकांमध्ये नोकरी करणाऱ्या; तसंच बॅंकांमध्येही उच्च पदावर पोचण्याचं महिलांचं प्रमाण वाढल्यानंतर परिस्थितीत खूपच सुधारणा झाली आहे, असं मानलं जातं. आता महिलांची कार्यक्षेत्रही विस्तारली आहेत. सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्येही त्या धडाडीनं कार्यरत आहेत. त्याचाही परिणाम हळूहळू का होईना दिसून येत आहे. याचं थोडं श्रेय सरकारनं महिला सशक्तीकरणासाठी उचललेल्या पावलांना आणि बदललेल्या कायद्यांनाही द्यावं लागेल.

भारतामध्ये जसजसं आयटी क्षेत्राचं जाळं विणलं गेलं आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं मुली आयटी, संगणक इंजिनिअर बनून गलेलठ्ठ वेतनाची नोकरी करू लागल्या, तसंतसं आर्थिक आघाडीचं चित्र पालटू लागलं. आज महिला खरोखरीच आपल्या पायावर उभ्या आहेत. विशेष म्हणजे आर्थिक निर्णयही घ्यायला लागल्या आहेत. आपला पैसा कसा सुरक्षित राहील, याचा विचार त्या करीत आहेत. आपल्या नावावर घर घेणं, पैसा जमा करून स्टार्ट-अप सुरू करणं या गोष्टीही मुलांप्रमाणे अगदी सहजतेनं करायला लागल्या आहेत. विशेष म्हणजे आर्थिक नियोजनाचं महत्त्व त्यांना पटायला लागलं आहे.

विम्याबाबत सजगता
आणखी एक दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, पूर्वी घरातल्या कर्त्या पुरूषाचा आयुर्विमा उतरवला जात होता. आता नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलेचा विमा उतरवला जात आहे. अगदी लहान गावांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा विमा उतरवला जात आहे, ही लक्षणीय बाब मानावी लागेल. महिला युलिप आणि टर्म इन्शुरन्सला प्राधान्य देतात, असंही एका पाहणीत दिसून आलं आहे. व्यवसायामध्ये पती-पत्नी किंवा भाऊ आणि बहीण भागीदार असतील किंवा एकाच संयुक्त परिवारातील महिला-पुरूष असे चौघे-पाचजण भागीदार असतील, तर व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक, खेळते भांडवल, बॅंकेचे व्यवहार, या सर्व गोष्टी पुरूष भागीदार पाहतात आणि महिलांवर इतर गोष्टींची म्हणजे व्यवसायाचं मार्केटिंग, मालाची उपलब्धता, कामगारांचे पगार देणे, माल तपासणे अशा कामांची जबाबदारी सोपवली जाते. विशेष म्हणजे महिलाही गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यास फारशा उत्सुक नसतात, असं दिसून आलं आहे.

महिलांकडून कमी गुंतवणूक
आजचा सर्वांत कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे, कमावत्या महिलांकडून होणारी अतिशय कमी गुंतवणूक! उत्पन्न कितीही असो, त्या उत्पन्नाच्या किमान २२ ते २४ टक्के गुंतवणूक महिलांनी करावी, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात महिला केवळ ६ ते १० टक्के गुंतवणूक करतात. त्यातही महिला वर सांगितल्याप्रमाणे मुदत ठेव, पीपीएफ, सोने, रिकरिंग डिपॉझिट अशा पारंपरिक साधनांमध्ये गुंतवणूक जास्त करतात. म्युच्युअल फंड, भांडवली बाजार, डिजिटल सोने, रोखे बाजार, रिअल इस्टेट यासारख्या जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांचा महिला फारच क्वचित विचार करतात, मात्र हा विचार मनापासून केलेला नसतो. यातही आपण २० वर्षापूर्वी घेतलेल्या ४० ग्रॅम नेकलेसची किंमत आजच्या बाजारभावाने दुपटीपेक्षा जास्त झाली आहे, असं सांगण्यात महिला धन्यता मानतात; परंतु नेकलेस विकून सोन्याच्या भावामध्ये झालेल्या वाढीचा लाभ घेवून दुसऱ्या कशातही किंवा व्यवसायात गुंतवण्यास त्या अजिबात तयार नसतात. अशा आभासी मूल्यवाढीचा प्रत्यक्षात काहीच लाभ नसतो. ही भारतीय महिलांची मानसिकता आहे आणि ती बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आज गरज आहे.

भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमालीचं सुधारलं आहे. यामध्ये महिलांनी अतिशय उत्तमतेनं भूमिका पार पाडली. घरातील एक महिला शिकली, की अवघं कुटुंब शिक्षित होतं, याचा चांगला अनुभव देशानं घेतला आहे. आता हीच गोष्ट आर्थिक साक्षरतेबाबतही करण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे सुदैवानं आज यासाठी प्रेरणा देण्यासाठी अनेक महिला आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत. अवघ्या देशाचा अर्थसंकल्प तयार करून देशाची आर्थिक गाडी चालविणाऱ्या निर्मला सीतारामन यांनीही वारंवार सांगितलं आहे, की महिलांनी कुटुंबाची आर्थिक सूत्रे आपल्या हाती घ्यावीत, यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे. त्यांची नावं मालमत्तेवर लावली जात आहेत. महिलांच्या नावे घर घेतल्यानंतर करसवलत दिली जात आहे. व्याजदरामध्ये सवलत मिळत आहे.

हे देखिल वाचा-

आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य
समाजाच्या सर्व स्तरातील महिलांनी आर्थिक स्वावलंबन या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि घरातल्या आर्थिक निर्णयामध्ये सहभागी झालं पाहिजे. तसंच ‘इम्पल्सिव्ह आणि ऑनलाइन’ खरेदीचा मोह टाळून, अधिक बचत केली पाहिजे आणि त्या बचतीचे रूपांतर योग्य गुंतवणुकीत कसे होईल, याकडे जागरूकतेनं लक्ष दिलं पाहिजे. प्रसंगी तज्ज्ञ आर्थिक नियोजनकारांचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्या बॅंक खात्यांचे व्यवहार व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत. व्यावसायिक महिलांनी आपला पैसा गुंतवताना, त्याचा परतावा किती मिळतो, याविषयी सजग असले पाहिजे. घरखर्चात काटकसर करून बचत करणाऱ्या गृहिणींनी गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा आवर्जून विचार केला पाहिजे.

आता इथं अनेकांना प्रश्न पडेल, की हे काम आम्ही का करायचं? घरातील पुरूष हे करत आहेतच. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक महिलेने स्वावलंबी होण्याची गरज असण्याचीही विविध कारणं आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे आता महिलांचं सरासरी आयुष्यमान वाढलं आहे. भारताचा विचार केला, तर पुरूषांपेक्षा महिला सरासरी पाच वर्ष अधिक जगतात, असं दिसून आलं आहे. अशावेळी आर्थिक सुरक्षितता हा प्रश्न महिलांच्या दृष्टीने ऐरणीवर येतो. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, अर्धी लोकसंख्या आर्थिक साक्षर बनली, तर देशाच्या प्रगतीला तितकाच जास्त हातभार लागणार आहे, हे नक्की.

३२ म्युच्युअल फंडांच्या मॅनेजरपदी महिला
म्युच्युअल फंडांचा विचार केला, तर आजमितीला देशातल्या चांगल्या ३२ फंडांच्या मॅनेजर म्हणून महिला कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या ३२ महिला फंड मॅनेजर एकूण ४.५५ लाख कोटी रूपयांची मालमत्ता सांभाळतात आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ करीत आहेत. याचाच अर्थ महिलांनी ठरवलं तर, त्या आर्थिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य करू शकतात.

या महिन्यातील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला गाजवत असलेल्या क्षेत्रांविषयी भरभरून कौतुक होत राहील आणि ते व्हायलाही हवंच. त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रात महिलांची वाटचाल अजून बिचकत सुरू आहे, याचाही विचार करायला हवा आणि त्या क्षेत्रातही महिलांनी सरस कामगिरी करायला हवी. घराच्या आर्थिक नियोजनाप्रमाणेच देशाचा आर्थिक संसार चालवण्याची क्षमता महिलांमध्ये आहे, हे आता सिद्ध झालं आहे. यामुळंच म्हणावसं वाटतं, ‘इथंही काकणभर सरस हो गं बये!’

(लेखिका मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत.)