Investment Tips- जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काॅन्ट्रा फंड}

जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

डॉ. वीरेंद्र ताटके
आयुष्यात नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने जाऊन यश मिळवणारे काही लोक असतात. तसे काही म्युच्युअल फंडदेखील इतर फंडांपेक्षा वेगळ्या प्रकारचे गुंतवणूक धोरण अवलंबतात आणि उत्तम परतावा मिळवतात. अशा फंडांना कॉन्ट्रा फंड म्हणतात.

एसबीआय कॉन्ट्रा फंड :
एसबीआय कॉन्ट्रा फंड हा या प्रकारातील चांगली कामगिरी करणारा फंड आहे. जुलै १९९९ मध्ये स्थापन झालेल्या या फंडाची सध्याची मालमत्ता सुमारे ७,६०० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात या फंडाने वार्षिक ११ टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या पाच वर्षात १२ टक्के एवढा सरासरी वार्षिक परतावा दिला आहे. फंडाची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच गेल्या २३ वर्षात या फंडाने १८ टक्के एवढा घसघशीत सरासरी वार्षिक परतावा दिला आहे . (Know about contra fund investment)

कॉन्ट्रा फंडाचे धोरण :
साधारणतः म्युच्युअल फंड (Mutual Fund) त्यांची गुंतवणूक करताना सद्यस्थितीत उत्तम कामगिरी करणाऱ्या किंवा नजीकच्या काळात उत्तम कामगिरी करू शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असतात. कॉन्ट्रा फंड काही कारणांनी दुर्लक्षित राहिलेल्या; परंतु मूलभूतरित्या उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक (Investment) करतात. अर्थात, यासाठी कॉन्ट्रा फंडाच्या फंड मॅनेजरला डोळे उघडे ठेवून सातत्याने अशा कंपन्यांच्या शोधात राहावे लागते.

केवळ ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रकातील आकड्यांच्या पलीकडे जाऊन कंपनीच्या व्यवसायाच्या ताकदीचा अंदाज घ्यावा लागतो. यासाठी केवळ एखाद्या कंपनीचा अभ्यास करणे पुरेसे होत नाही, तर संबंधित क्षेत्राचादेखील अभ्यास करावा लागतो. कारण काहीवेळेस एखाद्या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचे काही कारणांनी पूर्ण दुर्लक्ष झालेले असते. कॉन्ट्रा फंड अशा क्षेत्रातील दुर्लक्षित कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो.

एसबीआय कॉन्ट्रा फंडाची गुंतवणूक :
एसबीआय कॉन्ट्रा फंडाची गुंतवणूक पहिली, तर त्यात एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक आहेच, शिवाय सद्भाव इंजिनीअरिंग, प्रताप स्नॅक्स, शेफलर इंडिया, ग्रीनप्लाय इंडस्ट्री यासारख्या फारशा माहित नसलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्येही या फंडाची गुंतवणूक आहे. म्हणजेच प्रथितयश कंपन्यांच्या शेअरबरोबर दुर्लक्षित कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी साधायची असेल, तर एसबीआय कॉन्ट्रा फंड योग्य ठरतो. अर्थात, फंड मॅनेजरचा अंदाज चुकला, तर त्याचा विपरीत परिणाम फंडाच्या कामगिरीवर होतो. त्यामुळे अशा फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला संभाव्य जोखमीची जाणीव असणे गरजेचे असते.

‘एसआयपी’ उत्तम पर्याय :
म्हणूनच अशा फंडात गुंतवणूक सुरू करताना ‘एसआयपी’चा मार्ग स्वीकारावा आणि त्यानंतर फंडाच्या कामगिरीविषयी अंदाज आल्यानंतर जेव्हा जेव्हा बाजार कोसळेल तेव्हा तेव्हा एकरकमी गुंतवणूक करत रहावे. या फंडातील ‘एसआयपी’ गुंतवणुकीचादेखील परतावा आकर्षक आहे. या फंडात गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेल्या ‘एसआयपी’ने तब्बल २२ टक्के परतावा दिला आहे, तर दहा वर्षातील गुंतवणुकीनेदेखील १६ टक्के परतावा दिला आहे.

थोडक्यात, आपल्या गुंतवणुकीत नवे रंग भरायचे असतील, तर ‘रंग माझा वेगळा’ असे म्हणणाऱ्या या फंडाचा विचार करायला हरकत नाही.

कॉन्ट्रा फंडाची वैशिष्ट्ये
- दुर्लक्षित; परंतु मूलभूतरित्या उत्तम कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक
- सद्यस्थितीत किंवा नजीकच्या काळात उत्तम कामगिरीची क्षमता असलेल्या कंपन्यांना प्राधान्य
- एखाद्या कंपनीचा नव्हे, तर संबंधित क्षेत्राचादेखील सखोल अभ्यास
- कंपनीच्या व्यवसायाच्या ताकदीचा अंदाज घेऊन निर्णय

(लेखक इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल या संस्थेत संचालक आहेत.)

टॅग्स :Mutual FundInvestment