Mobile Fraud- बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल सिमकार्ड आणि फसवणूक}

बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

शिरीष देशपांडे
दिल्लीमधील एका उद्योजकाचे मोबाईलमधील ड्युएल सिमकार्ड रिन्यू न केल्याने बँकेतून ७५ लाख रुपये चोरट्यांनी चोरले. हे ड्युएल सिमकार्ड बँकेत त्यांच्या खात्याला जोडलेले होते. हे कसे घडले?...

या उद्योजकांच्या मोबाईल फोनमधील दुसरे सिमकार्ड बँक खात्याला जोडलेले होते. ते बरेच दिवस रिन्यू न केल्याने मोबाईल कंपनीने ते दुसऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ठेवले होते. चोरटे लोक मोबाईल कंपनीच्या वितरकांकडून रिन्यू न झालेल्या कार्डच्या शोधातच असतात आणि असे उपलब्ध असलेले सिमकार्ड एका चोरट्याने घेतले. (Mobile Phone Sim Card what care to be taken to avoid fraud)

त्या नंबरला संलग्न असलेल्या यूपीआयवर जाऊन फर्गेट युजर आयडी यंत्रणा वापरून आयडी मिळवला. त्याआधारे कोणते बँक खाते जोडले आहे, त्याचा तपशील मिळवला आणि बँकेच्या पोर्टलवर जाऊन त्याच्याकडे असलेले सिमकार्ड आणि खातेधारकाची अन्य मार्गाने चोरलेली माहिती याचा वापर करून त्याने फर्गेट पासवर्डद्वारे नवा पासवर्ड मिळवला आणि बँकेतून ७५ लाख रुपये चोरले.

तुमच्या मनात प्रश्न येईल, की त्याने वॅलेटमधूनच का नाही पैसे चोरले? कारण असे, की वॅलेटमधून एका दिवशी एक लाख रुपयेच काढता येतात.

या घटनेवरून धडा घेत आपण बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे, ते पाहू.

१) आपल्या खात्याला जोडलेले सिमकार्ड व्हॅलिड (चालू) आहे ना, ते तपासा.

२) प्रीपेड कार्डनंबर या खात्याला जोडू नये; जोडलाच, तर वेळीच रिन्यू करावा.

३) फोन हरवला, तर तातडीने सिमकार्ड मोबाईल कंपनीला संपर्क करून रद्द करावे. जुना नंबर तात्पुरता रद्द करावा.

४) नवा फोन किंवा नंबर घेतला, तर जुना नंबर बँकेत जाऊन रद्द करावा, तो खरोखर बँकेने काढून टाकला आहे ना, याची खातरजमा करावी.

५) सिमकार्ड खराब झाले, तर तातडीने बदलून घ्यावे.

६) आपल्या खात्यात कमीतकमी पैसे ठेवावेत.

७) आपल्या बँक खात्यावर मधूनमधून लक्ष ठेवावे.

हे देखिल वाचा-

फसवणूक झाली, तर काय कराल?

१) ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

२) १९३० अथवा १५५२६० (महाराष्ट्रासाठी) या क्रमांकावर संपर्क साधा.

३) बँकेत समक्ष जाऊनही तक्रार नोंदवा आणि नुसती तक्रार नोंदवून थांबू नका, तर सतत पाठपुरावा करा.

४) आपल्या फोनवर किंवा संगणकावर असलेले या संदर्भातील काही पुरावे, संदर्भ असतील तर जपून ठेवा. ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. पुढे जाऊन आपल्याला हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील.

५) शक्य आणि आवश्यक असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(लेखक सीए आणि सायबर गुन्हेविषयक तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :mobileonline fraud