गुंतवणुकीची दहीहंडी
गुंतवणुकीची दहीहंडीEsakal

Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

गुंतवणूक व भारतीय सण-संस्कृती यांचा सुरेख मेळ आहे. मागील वर्षी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडून गुंतवणुकीचे धडे गिरविले होते. यावर्षी आपण पाहू या की श्रीकृष्ण जन्म अर्थात जन्माष्टमी आणि संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होणारी दहीहंडी यांचा गुंतवणुकीशी कसा मेळ आहे ते!

मागील वर्षीचा सप्टेंबर २०२२ मधील अनोख्या स्पर्धेचा विषय आठवत असेलच. नाही? विषय होता की गुंतवणुकीचे नियम Investment Rules, ज्यामध्ये तुमच्या देशाचे सण-संस्कृती (कल्चर) प्रतिबिंबित झाली पाहिजे. Money Tips Marathi lessons from Dahi Handi to grow your wealth in steps

गुंतवणूक व भारतीय सण-संस्कृती यांचा सुरेख मेळ आहे. मागील वर्षी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडून Lord Ganesh गुंतवणुकीचे धडे गिरविले होते. यावर्षी आपण पाहू या की श्रीकृष्ण जन्म अर्थात जन्माष्टमी. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होणारी दहीहंडी यांचा गुंतवणुकीशी Investment कसा मेळ आहे ते!

सर्व १६ कलांमध्ये पारंगत असणारा एकमेव देव म्हणजे श्रीकृष्ण. महाभारतामधील युद्धामध्ये त्याने अर्जुनाला दिलेला उपदेश याला तर आपण मॅनेजमेंट विषयावरील सर्वांत मोठे पुस्तकच समजतो.

चतुर, विद्वान आणि विष्णूचा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णाची Lord Krishna शिकवण आपल्याला फक्त धर्म, राजकारण, मॅनेजमेंट यामध्येच पारंगत करीत नाही, तर गुंतागुंतीचा गुंतवणूक विषयसुद्धा अतिशय सोपा करून सांगते. कसे?

चला, तर मग दहीहंडीचे थर आपल्याला काय शिकवतात ते थोडक्यात पाहू या.

१) आर्थिक नियोजन: Financial Planning

दहीहंडीचा सर्वांत खालचा थर अर्थात पाया. या थराला सर्वांत जास्त महत्त्व दिले पाहिजे. कारण, हा थर जितका भक्कम तितके त्यावरील थर टिकून राहण्याची शक्यता अधिक. श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी खूप आवडायचे. संपूर्ण गोकुळातील लोणी तो एकटा फस्त करून टाकीत असे.

त्यामुळे गोपी-गवळणी दही, दूध, लोणी एका हंडीत बांधून ती उंच जागी बांधून ठेवायच्या. आपली उद्दिष्ट्ये म्हणजे हेच तर उंच बांधलेल्या हंडीतील ते दही-दूध-लोणी. दहीहंडी फोडण्यापूर्वी जशी गोविंदांची नजर सतत त्या हंडीचा वेध घेत असते, तसेच गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी, आपल्याला नक्की काय साधायचे आहे ते स्पष्ट असले पाहिजे आणि नजर सतत त्यावर हवी.

हे देखिल वाचा-

गुंतवणुकीची दहीहंडी
Dnyaneshwari: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

आपण घरातून बाहेर पडल्यावर रिक्षात बसतो तेव्हा रिक्षावाले आपल्याला विचारतात, कोठे जायचे आहे? त्यांना जर आपण सांगितले, की चला, मग बघू कोठे जायचे आहे, तर ते निश्चितच हास्यास्पद होईल, नाही का? मग गुंतवणूक आपल्याला नक्की कशासाठी, काय साध्य करण्यासाठी करायची आहे, हे जर स्पष्ट नसेल तर ते असेच निरर्थक होईल.

थोडक्यात, दहीहंडीचा सर्वांत खालचा थर म्हणजेच ‘आर्थिक नियोजन’, जी आपल्या गुंतवणूक प्रवासाची पहिली पायरी आहे. हा थर किंवा पायरी जर भक्कम असेल तर आपण उद्दिष्टांपर्यंत नक्कीच पोहोचू; अन्यथा वरील थर कोसळतील आणि आपण आपल्या उद्दिष्टांपासून लांबच राहू.

२. विमा:

आयुर्विमा आणि आरोग्य विमा हा हंडीचा दुसरा थर.

आयुर्विमा: हा फक्त शुद्ध विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स असावा. त्यामध्ये गुंतवणुकीची भेसळ करू नये. प्रत्येकाने त्यांच्या उत्पन्नानुसार आयुर्विमा घेणे आवश्यक आहे. आयुर्विमा का, किती आणि कसा करावा याचे एक शास्त्र आहे.

दोन वर्षांच्या मुलाचा; तसेच ८० वर्षांच्या ज्येष्ठ सभासदाचा आयुर्विमा Insurance करण्याची आवश्यकता नाही. मग तो कोणाचा करावा? तर, घरातील असा एखादा सभासद जो ठराविक उत्पन्न घरी आणतो आहे, ज्याच्या नसण्याने तो आणत असलेले उत्पन्न थांबेल आणि घरातील इतर सभासद आर्थिक अडचणीत येतील. अशा व्यक्तीचा आयुर्विमा जरूर असावा.

संशोधन असे दर्शविते, की अनेक विमाधारक सरासरी फक्त तीन वर्षे विमा हप्ता नियमित भरतात आणि नंतर त्यामध्ये खंड पडतो. पुढील हप्ता जर वेळेत भरला नाही तर विमा परत घ्यावा लागतो आणि त्यावेळी वय जास्त असेल तर हप्ता जास्त लागू शकतो किंवा काही गंभीर शारीरिक व्याधी जडल्या असतील तर विमा नाकारला सुद्धा जाऊ शकतो.

याला दुसरी बाजू आहे जी कोणी सहसा विचारात घेत नाही. माझे असे एक क्लायंट आहेत, की जे खूप पैसे कमवत आहेत. तसेच त्यांची संपत्ती आणि गुंतवणूकसुद्धा प्रचंड आहे.

त्यांच्याबाबतीत उद्या जरी ते निवर्तले तरीसुद्धा त्यांच्या घरातील सर्व सभासदांची सर्व उद्दिष्टे आरामात पूर्ण होणार आहेत. अशावेळी केवळ विमा हप्ता भरायला पैसे आहेत म्हणून विमा करणे निरर्थक आहे आणि विमा कंपनीचा नफा वाढविण्यासारखे आहे.

आरोग्य अर्थात मेडिकल विमा.

कोविड महासाथीनंतर आरोग्य विम्याचे महत्त्व बहुतेक लोकांना पटले. परंतु त्यानंतर विमा हप्त्याच्या दरात सुद्धा वाढ झाली. बहुतेक लोकांचा ते जिथे नोकरी करतात तिथे ‘समूह विमा’ काढलेला असतो. तरीसुद्धा, एक स्वतंत्र विमा असणे योग्य एवढ्यासाठी वाटतो, की उद्या जर नोकरी सोडली किंवा सुटली तर हे आरोग्य विमा कवच तात्काळ नाहीसे होते.

त्यामुळे एक ‘फॅमिली फ्लोटर प्लॅन’ असणे योग्य वाटते. आज तुम्हाला ‘गुगल’च्या मदतीने तुमचे वय नमूद केले, की सर्व विमा कंपन्यांची हप्त्याची रक्कम दिसते आणि त्यानुसार तुम्ही कंपनीची निवड करू शकता. आरोग्य विमा तुम्हाला ऑनलाईन ‘डायरेक्ट’ सहज करता येणे शक्य आहे, जो तुम्हाला स्वस्त पडतो.

पण अधिक माहिती आणि मदत हवी असेल तर अनुभवी विमा सल्लागारांची मदत घेणे चांगले! केवळ हप्ता कमी आहे म्हणून कंपनीची निवड न करता त्यांचा ‘क्लेम रेशो’सुद्धा तपासावा.

कंपनीकडे आलेले दावे जर त्यांनी ९० टक्क्यांच्या वर ‘पे’ केलेले, दिलेले असतील तर कंपनी योग्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. कंपनीच्या समूह विम्यामध्ये थोडे जास्त पैसे भरून घरातील इतर सर्व सभासदांची नावे सामील करून घेणे केव्हाही योग्य ठरते.

गुंतवणुकीची दहीहंडी
Bhagavad Gita: श्रीमद्‌भगवद्‌गीता- शरीर आणि मनात स्फुल्लिंग पेटवणारा 'प्रोग्रॅम'

३) आणिबाणी फंड

हंडीचा तिसरा थर सांगतो, की प्रत्येकाचा एक ‘इमर्जन्सी’ अर्थात आणीबाणी फंड असला पाहिजे. या फंडामध्ये महिन्याच्या घरखर्चाच्या किमान सहापट पैसे असणे आवश्यक आहे. समजा तुमचा घरखर्च महिना ४०,००० रुपये आहे, तर तुमचा आणीबाणी फंड किमान २,४०,००० रुपये असणे योग्य राहील. हे पैसे बँक किंवा म्युच्युअल फंडाच्या ओव्हरनाईट-लिक्विड योजनांमध्ये गुंतविले तरी योग्य ठरते.

याचे कारण म्हणजे म्युच्युअल फंडांच्या या योजना शेअर बाजारात पैसे गुंतवत नाहीत. ते या योजनांचे पैसे फक्त ‘मनी-मार्केट’मध्येच गुंतवतात, ज्याचा कालावधी खूप कमी असतो. या योजनांमधील पैसे तुम्हाला केव्हाही काढता येतात.

ओव्हरनाईट आणि लिक्विड योजनांना बहिर्गमन भार (एक्झिट लोड) नसतो, कोणताही ‘लॉक-इन पिरियड नसतो, योजनांचे निव्वळ मालमत्ता मूल्य दररोज काढले जाते. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशीसुद्धा काढले जाते.

त्यामुळे जरी म्युच्युअल फंड त्यांच्या कोणत्याही योजनांमध्ये मुद्दल अथवा परतावा याची खात्री देत नसले तरीही या योजना तुलनेने सुरक्षित असतात. ओव्हरनाईट योजनांमधील कमाल रु. ५० हजारांपर्यंतचे पैसे तर दोन मिनिटात ‘पेटीएम’द्वारे केव्हाही, अगदी रात्री १२ वाजतासुद्धा काढता येतात.

हे देखिल वाचा-

गुंतवणुकीची दहीहंडी
Financial Tips: गुंतवणूक, बचत आणि कर्ज काढण्यापूर्वी तरुणांनी फॉलो केल्या पाहिजेत अशा 10 सर्वोत्तम फायनान्स टिप्स

४) कर्ज

हंडीचा चौथा थर आपल्याला कर्ज कसे असावे, कसे नसावे, किती असावे याची जाणीव करून देतो. अनेक लोक एकीकडे चढ्या दराने काढलेले कर्ज फेडत असतात, उदाहरणार्थ १० टक्के आणि दुसरीकडे महिन्याची झालेली बचत ८ टक्क्यांनी बँकेत गुंतवत असतात, जे चुकीचे वाटते.

अशावेळी जास्तीच्या पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा महाग कर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे अधिक योग्य ठरते. चांगले कर्ज आणि वाईट कर्ज असे दोन प्रकार असतात. चांगल्या कर्जात फक्त शैक्षणिक कर्ज आणि थोड्याफार प्रमाणात गृहकर्ज येते.

बाकी सर्व कर्ज ही ‘वाईट’ या प्रकारात मोडतात आणि ती टाळलेलीच बरी! बहुतेक लोकांना क्रेडिट कार्डच्या बिलाची कमीतकमी रक्कम भरायची सवय असते. परंतु, उरलेली रक्कम बँक तुम्हाला कर्ज म्हणून दिल्याचे दाखविते; ज्यावर १८ टक्के ते २५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड जर वापरायचेच असेल, तर बिलाच्या शेवटच्या दिवसापूर्वी बिलाची संपूर्ण रक्कम भरायचे लक्षात ठेवावे आणि व्याज; तसेच दंड टाळावा.

५) प्राप्तिकर नियोजन

हंडीचा पाचवा थर आपल्याला प्राप्तिकराच्या नियोजनाचा सल्ला देतो. चौथ्या थरासारखेच प्राप्तिकराच्या थराचे आहे. एकीकडे मोठा प्राप्तिकर भरायचा आणि दुसरीकडे गुंतवणूक करायची हे अयोग्य होते.

प्रथम, प्राप्तिकर कसा वाचविता येईल ते पाहावे आणि त्यानंतर गुंतवणुकीकडे वळावे. प्राप्तिकर वाचविणारी गुंतवणूक केली, तर अधिक योग्य! जसे, की म्युच्युअल फंडांच्या टॅक्स सेव्हिंग्स योजना, ज्यांना ‘इएलएसएस’ म्हणतात.

हे देखिल वाचा-

गुंतवणुकीची दहीहंडी
Benefits of Charity: करा दान...मिळवा पुण्य आणि करसवलतही!

६) ॲसेट ॲलोकेशन अर्थात मालमत्ता विभाजन:

हंडीचा सहावा थर खूपच महत्त्वाचा. कारण हा थर म्हणजेच तुमचे ॲसेट ॲलोकेशन अर्थात मालमत्ता विभाजन. आपले सर्वांत जास्त लक्ष या थराकडे असणे चांगले. सर्वांत जास्त वेळ या थरासाठी दिला पाहिजे.

एक ‘थम्ब-रुल’ असे सांगतो, की १०० वजा तुमचे वय इतकी गुंतवणूक ‘इक्विटी’मध्ये (शेअर वा म्युच्युअल फंड) पाहिजे. समजा तुमचे वय ३८ आहे, तर तुमची ६२ टक्के गुंतवणूक ‘इक्विटी’मध्ये हवी. प्रत्येकाने आपल्या वय, उत्पन्न, खर्च, कर्जे, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आजारपण, तसेच जोखीम घेण्याची क्षमता या सर्वांचा विचार करूनच मालमत्ता विभाजन करावे.

त्याचप्रमाणे, आपले उद्दिष्ट सध्या करण्यासाठी आपल्या हातात वेळ किती आहे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. समजा उद्दिष्ट आहे, मुलीचे लग्न आणि त्याला वेळ आहे १२ वर्षे. अशावेळी केवळ बँकेमध्ये गुंतवणूक करून भागणार नाही. थोडी जोखीम घेऊन म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांचा लाभ घेणे निश्चितच योग्य राहील.

७) गुंतवणूक

हंडीचा सातवा थर हा असा थर आहे, ज्याला बहुतेक लोक पहिला थर समजतात आणि त्याखालील सहा थरांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांचा पाया कमकुवत राहून वरील थर ढासळतात. हा हंडीचा सातवा थर म्हणजेच गुंतवणूक.

महाभारतातील युद्धामध्ये जेव्हा अर्जुनाने आपलेच भाऊबंद शत्रू म्हणून समोर पाहिले, तेव्हा तो भावनाविवश झाला. श्रीकृष्णाने त्याला भावना बाजूला सारण्याचा उपदेश केला. हाच उपदेश गुंतवणुकीलासुद्धा लागू पडतो. गुंतवणूक तरी काय वेगळी असते? भावना आड येऊ न देता गुंतवणूक करणे आवश्यक असते.

केवळ कोणीतरी आपला मित्र अथवा नातेवाईक आहे म्हणून आणि त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गुंतवणूक करावी का, याचा विचार होणे आवश्यक आहे.

एखाद्या बँक अधिकाऱ्याचे ‘टार्गेट’ पूर्ण होणार आहे म्हणून आणि त्यांनी विनंती केली म्हणून, महिन्याच्या शेवटी आपल्या चालू अथवा बचत खात्यामध्ये मोठी रक्कम ठेवावी का? केवळ मी एखाद्या कंपनीत काम करतो म्हणून त्या कंपनीचेच शेअर खरेदी करून ते अनेक वर्षे सांभाळावेत का, या सर्वांचा विचार होते आवश्यक आहे. म्हणूनच, काही शेअरमध्ये भावनात्मकरित्या अडकून न पडता सातत्याने नफा काढून घेत राहिले पाहिजे.

गीतेमध्ये काय सांगितले आहे?

श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, की जुने कपडे त्याग करून आपण जसे नवे कपडे परिधान करतो; त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसरीकडे जातो. त्याचप्रमाणे, गुंतवणुकीतील जुन्या कल्पना मागे सारून नवे प्रकार आणि पद्धतींना आपलेसे केले पाहिजे.

म्युच्युअल फंड आणि त्यामधील नव्या पद्धती जसे, की एसटीपी, एसडब्ल्यूपी, टॉप-अप एसआयपी, लिक्विड योजना, शेअर बाजार आदी सर्व स्वीकारले पाहिजे. महाभारतामध्ये १०० कौरव आणि त्यांच्या अफाट सेनेला फक्त ५ पांडव पुरून उरले; कारण पांडवांनी श्रीकृष्णाचा मनोभावे स्वीकार केला.

अगदी त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण म्हणजेच ज्ञान, शिक्षण असे मानून आपण जर गुंतवणुकीच्या पर्यायांचा आणि पद्धतींचा सखोल अभ्यास केला तर आपली उद्दिष्ट्ये आपण सहज गाठू शकू. परंतु, काही कारणांनी असे शिक्षण घेणे शक्य नसेल, तर श्रीकृष्णासारखाच एक तज्ज्ञ आणि अनुभवी असा गुंतवणूक सल्लागार पाठीशी असणे आणि त्याने किंवा तिने सांगितलेल्या मार्गानेच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

जेवणाच्या ताटाप्रमाणे पोर्टफोलिओ

गुंतवणूक आपल्या जेवणाच्या ताटाप्रमाणे असायला हवी. म्हणजेच काय, तर जेवणाच्या पानात जसे भाजी, पोळी, कोशिंबीर, लोणचे आदी असते, अगदी त्याचप्रमाणे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सुद्धा शेअर, म्युच्युअल फंड, बाँड, सोने, रिअल इस्टेट आदी विविध घटक असणे आवश्यक आहे.

गुंतवणूक जितकी सक्षम आणि चांगली, तितके तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या जवळ लवकर पोचाल. गुंतवणूक सर्व मालमत्ता विभागांमध्ये योग्य प्रमाणात विभागलेली असावी. कशी आणि किती प्रमाणात विभागावी हे समजत नसेल तर चांगल्या म्युच्युअल फंडांच्या ‘मल्टी ॲसेट ॲलोकेशन’ योजनांचा फायदा घेणे योग्य ठरेल.

आपल्या एकूण पोर्टफोलिओत सोन्याचे प्रमाण ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. हंडी आपल्याला ‘एसआयपी’चे सुद्धा महत्त्व सांगते. हंडीचा प्रत्येक थर म्हणजे ‘एसआयपी’ आणि ते जितके जास्त तितके तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेने कमी वेळात पोचाल.

बाप्पा जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सांगतो आहे, त्याचा अभ्यास करून जर आपण सर्वांनीच आपली गुंतवणूक योग्य प्रकारे केली तर आपले सर्वांचे जीवन शांत आणि समृद्ध होईल.

एकंदरीतच, भारतीय सण-संस्कृती ही प्राचीन, सभ्य, सर्वसमावेशक विचारांची आहे. देवापुढे सायंकाळी दिवा लावण्यापासून ते बाहेरून घरी आल्यावर हात, पाय स्वच्छ धुण्यापर्यंत आपल्या प्रत्येक चालीरीतींमध्ये, पद्धतीमागे एक शास्त्र आहे. गरज आहे ती या सर्वांकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहण्याची! बघा, पटते का?

(लेखक ए३एस फायनान्शिअल सोल्युशन्सचे प्रवर्तक आणि ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत)

मोबाईल: ९८२३६६६९१३

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com