
नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
शिरीष देशपांडे
सध्या नेट बँकिंगचे प्रमाण वाढलंय....त्याच बरोबर सायबर गुन्हेगारही सोकावलेत....जर तुम्ही नेट बँकिंग सुविधा वापरत असाल तर काय काळजी घ्याल या विषयीचा हा लेख....
दिल्लीमध्ये मिस्ड कॉल देऊन ५० लाख रुपयांची फसवणूक!.....एका सुरक्षारक्षक पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या संचालकाची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यांना संध्याकाळी सात ते आठ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ४४ मिस्ड कॉल आले. त्यांनी काही कॉलला प्रतिसाद दिला आणि काही कॉल घेतलेच नाही. काही वेळानंतर मात्र त्यांनी सर्व मेसेज पाहिले. त्यावेळी त्यांना कळाले, की त्यांच्या खात्यातून ५० लाख रुपये रियल टाइम ग्रॉस सेटलमेंटद्वारे (आरटीजीएस) ट्रान्स्फर झाले आहेत. (Net Banking Frauds Cyber crime and precautions)
आता आपण पाहू यात हे कसे घडले ते-
पोलिसांचा (Police) असा अंदाज आहे, की ही फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या मोबाइल फोनचे सिम कार्ड (Sim Card) बेकायदेशीररित्या बदली करून हा गुन्हा झाला असावा. म्हणजे सिम स्वॅप गुन्हा पद्धतीत कार्ड क्लोनिंग (Cloning) म्हणजे हुबेहूब खोटी प्रत बनवणे अथवा हरवलेले सिम बदलणे यापैकी एका पद्धतीचा वापर केला गेला असावा. म्हणजे चोरट्याने फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या मोबाइल (टेलिफोन) कंपनीला संपर्क करून, त्या फोनचे सिमकार्ड चोरट्यांच्या फोनवर जोडून तात्पुरते चालू करून घेतले आणि फोनचा पूर्ण ताबा मिळवला.
चोरट्यांनी फोनमधील ऑनलाइन बँकेची (Online Banking) सर्व माहिती, तसेच त्याआधीच चोरट्यांकडे त्या व्यक्तीची सोशल मीडियामधून जमा केलेली माहिती (उदा. खातेदाराची जन्मतारीख, त्याचे आधार कार्ड, त्याचे पॅन कार्ड आदी) या दोन्हींची सांगड घालून तयार झालेली सर्व माहिती वापरुन ऑनलाइन ४८.६३ लाख रुपये खात्यातून काढून घेतले गेले.
ते करताना आयव्हीआर (स्वयंचलित आवाज उत्तर) तंत्राद्वारे मिस्ड कॉलमधून ओटीपी मिळवले असावेत, खातेदाराने काही फोन कॉल उचलले; पण समोरुन काहीच उत्तर नव्हते म्हणून बंद केले, तसेच त्यांनी काही कॉल दुर्लक्षिलेही होते. मात्र, चोरटा ते सर्व कॉल ऐकत असावा. मात्र, नंतर त्यांनी फोनचे एसएमएस बघितले, त्यात त्यांचे खात्यातून ४८.६३ लाख ट्रान्स्फर झाल्याचा प्रचंड धक्का बसला आणि फसवणूक झाल्याची कल्पना आली. त्यांची पायाखालची जमीन सरकली.
आता आपण नेट बँकिंग सुविधा वापरणाऱ्या व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे, ते पाहू :
१. आपली बँकेसंबंधी गोपनीय माहिती उदा. अकाउंट नंबर, लॉग-इन आयडी, पासवर्ड, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड हे महत्त्वाचे आहे. ते संपूर्ण सुरक्षित राहतील, याची काळजी घेणे.
२. तुमच्या मोबाईलचे नेटवर्क बराच वेळ चालू नसेल, फोन लागत नाही, असे कोणी सांगितले तर लक्ष ठेवा. ताबडतोब मोबाईल कंपनी आणि जरुर पडल्यास बँकेशी संपर्क साधा.
३. आपल्याला आलेल्या फिशिंग (फसव्या/खोट्या) ई-मेलला उत्तर देवून आपली खासगी माहिती देऊ नका.
४. आपण नेट बँकिंग वापरत असलेल्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी. जरुरीप्रमाणे व्यवहार करायच्या आधी तेवढीच रक्कम जमा करावी.
५. नेट बँकिंग वापरत असाल तर त्यासाठी वेगळाच मोबाइल नंबर वापरावा; तो सोशल मीडिया अकाउंटला संलग्न असू नये.
६. बँकेच्या मदतीने आपल्या रोजच्या नेट बँकिंग व्यवहारावर बंधन घाला. उदा. रोजची ट्रान्स्फर मर्यादा घालावी, म्हणजे प्रत्येक व्यवहार रु. पन्नास हजार फक्त आणि दिवसाची एकूण ट्रान्स्फर मर्यादा रु. पाच लाख फक्त.
७. बँकेत समक्ष जाऊन बँकेच्या याबाबतीत असलेल्या सूचना माहीत करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करा.
८. आपल्या अकाउंटचा पासवर्ड वारंवार बदला, बँक खात्यातील व्यवहार मधूनमधून तपासा.
हे देखिल वाचा-
आपणच जर फसवले गेला असाल तर काय कराल?
१. ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
२. बँकेत समक्ष जाऊन तक्रार नोंदवा, नुसती तक्रार नोंदवून थांबू नका; भरपूर पाठपुरावा करावा.
३. आपल्या फोनवर किंवा कॉम्प्युटरवर असलेले या संदर्भातील काही पुरावे/संदर्भ असतील, तर ते जपून ठेवा. ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. हे एवढ्यासाठी करायचे, की पुढे जाऊन आपल्याला हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील.
४. शक्य असेल आणि आवश्यक असेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
(लेखक सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हे विषयक तज्ज्ञ आहेत.)