UPI Payments- परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युपीआय सेवा परदेशी प्रवाशांनासुद्धा}

परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

‘यूपीआय’ सुविधेचा किरकोळ पेमेंटसाठीचा सातत्याने वाढत असलेला वापर विचारत घेऊन रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणात यात आणखी एक नवी सुविधा देऊ केली आहे.

रिझर्व बँकेच्या या नव्या घोषणेमुळं आता परदेशी प्रवासी; तसेच अनिवासी भारतीय या सुविधेचा वापर आपल्या भारतभेटी दरम्यान सहजगत्या करू शकतील. सुरुवातीच्या टप्प्यात या सुविधेचा लाभ ‘जी-२०’ देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाच काही ठरविक अंतरराष्ट्रीय विमानतळांवर घेता येईल; मात्र नजीकच्या भविष्यात ही सुविधा सर्वत्र वापरता येणार आहे. (NRI also can use UPI Service in India Announces Reserve Bank)

‘जी-२०’ परिषदेचे औचित्य :
भारताकडे एक डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या एका वर्षाच्या कालावधीसाठी ‘जी-२०’चे (G-10) अध्यक्षपद आले आहे आणि यामुळे या कालावधीत सुमारे २०० मिटींग्ज भारतात विविध ठिकाणी होणार आहेत. त्या अनुषंगाने सबंधित देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, अन्य नेते व सबंधित पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने भारतात येत आहेत व येतील. या पार्श्वभूमीवर, अशा मोठ्या संख्येने भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांना या सुविधेचा खूपच उपयोग होईल, यामुळे त्यांना रोख रक्कम अथवा डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा करन्सी कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही.

नुकतीच म्हणजे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यानुसार वरील ‘जी-२०’ देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशाला एक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट(पीपीआय) वॉलेट दिले जाईल व ते ‘यूपीआय’शी (UPI Payments) जोडले जाईल. ज्यामुळे या प्रवाशांना सहजगत्या विविध प्रकारच्या सेवा व वस्तूचे पेमेंट करता येईल. आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पाईनलॅब प्रायव्हेट लिमिटेड व ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड या दोन बँका व दोन बिगरबँकिंग (एनबीएफसी) संस्था यूपीआय लिंक्ड वॉलेट उपलब्ध करणार आहेत. अनिवासी भारतीयांचा विदेशी मोबाईल नंबर त्यांच्या भारतातील ‘एनआरओ’ किंवा ‘एनआरई’ खात्याशी जोडलेला असल्यास, आता ते ‘यूपीआय’चा वापर करून पेमेंट करू शकतील.

हे देखिल वाचा-

परदेशात भारतीयांना करता येणार वापर :
भारतीयांना परदेशात गेल्यानंतर या सुविधेचा वापर करता येणार आहे. नुकतीच ही सुविधा ‘फोन-पे’ या मोबाईल अॅपने देऊ केली आहे. सुरुवातीस ही सुविधा फक्त सिंगापूर, भूतान, नेपाळ , मॉरीशस व युएई या पाच देशांतच उपलब्ध असणार आहे. ‘क्यूआर कोड’ असेल अशा सर्व ठिकाणी ही सुविधा वापरता येईल.

नुकतेच भारतातील ‘यूपीआय’ सिंगापूरच्या ‘पे-नाऊ’शी (PayNow) जोडले असून, २१ फेब्रुवारीपासून सिंगापूर व भारतातील रहिवासी भीम, गुगलपे,पेटीएम व तत्सम मोबाईल अॅप वापरून २४ तास अखंड (२४ बाय ७) आपापसात पेमेंट करू शकतील. नजीकच्या भविष्यात ही सुविधा अधिकाधिक देशांमध्ये देण्यात येईल. थोडक्यात, ‘यूपीआय’ची व्याप्ती आता दिवसेंदिवस भारतात व भारताबाहेरही वाढत जाईल.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

टॅग्स :Reserve Bank Of IndiaUPI