
इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
मंदार देशपांडे
हिंदू वारसा कायद्याच्या कलम २(एच) प्रमाणे ‘इच्छापत्र म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या पश्चात कशी व्हावी, या संबंधी इच्छेची कायदेशीरपणे, लिखित स्वरूपात केलेली उदघोषणा होय..जाणून घेऊ यात या इच्छापत्राविषयी सर्वकाही
मृत्यू ही प्रत्येक सजीवाच्या जीवनातली अटळ घटना आहे. मृत्यूची कल्पनाच अतिशय भीतीदायक, दुख:दायक आणि एकूणच भयानक आहे. आपल्याला दुसऱ्याच्या निधनानंतर दुःख होते, स्वतःच्या मृत्यूची (Death) तर कल्पनासुद्धा नको वाटते. परंतु, सध्याचे ताण-तणावपूर्ण जीवन, बैठ्या कामाचे स्वरूप, व्यायामाचा अभाव, तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे इच्छापत्र करण्यासाठी उतारवयाची वाट बघण्यात काहीही हशील नाही. (Procedure to know about How to make Legal will)
प्रपंचातील व्यक्ति आपल्या भविष्यासाठी(Future), आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी धनसंचय करतात, मालमत्ता (Property) जमा करत असतात. आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचा उपभोग सर्वांना योग्य त्या प्रमाणात मिळावा आणि सर्व लाभार्थीचे जीवन सुरक्षित व्हावे, अशी त्यामागे भावना असते. असा धनसंचय किंवा मालमत्ता ही रोख रक्कम, दागिने, घर, शेती, बँकांतील ठेवी, शेअर, बाँड, डिबेंचर, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आदी स्वरूपात असू शकते.
अगदी एखाद्या व्यवसायातील भांडवल (Capital), तसेच आपल्या नावाने असलेला एखादा हक्क याचाही यात समावेश होऊ शकतो. आपल्या पश्चात आपल्या वारसदारांत या मालमत्तेवरून वाद उत्पन्न होऊ नये, या साठी मृत्यूपत्र वा इच्छापत्र (Legal Will) करून ठेवणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र वा इच्छापत्र कसे असावे, यासंदर्भात कायद्यानुसार कोणताही आकृतिबंध नाही, त्यामुळे ते तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. इच्छापत्र या विषयाची सविस्तर माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच.
हा लेख आपल्या पुढे सादर करताना भारतीय वारसा कायदा १९२५ (Hindu Succession Act) आणि हिंदू वारसा कायदा १९५६ यांचाच विचार केला आहे. हे कायदे हिंदूंसोबतच शीख, बौद्ध, आणि जैन धर्मियांनाही लागू होतात. या व्यतिरिक्त इतर धर्मियांसाठी त्या त्या धर्मानुसार वेगळे कायदे आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे मृत्यू ही भीतिदायक गोष्ट आहे, त्यामुळे येथून पुढे आपण मृत्यूपत्र हा शब्द ना वापरता इच्छापत्र हा शब्द वापरतो.
इच्छापत्र म्हणजे काय?
हिंदू वारसा कायद्याच्या कलम २(एच) प्रमाणे ‘इच्छापत्र म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या पश्चात कशी व्हावी, या संबंधी इच्छेची कायदेशीरपणे, लिखित स्वरूपात केलेली उदघोषणा होय.’ तोंडी इच्छापत्र ग्राहय होत नाही, त्यामुळे ते लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे.
इच्छापत्र कोणी व कधी करावे?
हिंदू वारसा कायद्याच्या कलम ५९ प्रमाणे ‘सक्षम मनाच्या कोणत्याही सज्ञान व्यक्तिला आपल्या मालमत्तेसंबंधी इच्छापत्रा करता येते.’ या व्याख्येचे विघटन करून आपण ती सोप्या शब्दांत मांडू.
१) इच्छापत्र करण्यासाठी संबंधित व्यक्ति ही सक्षम मनाची असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ति मनोरुग्ण आहेत किंवा ज्यांची मनःस्थिती ठीक नाही, त्यांनी मनाच्या सक्षम अवस्थेत असताना केलेले इच्छापत्र ग्राहय मानले जाते. परंतु, इच्छापत्र करताना संबंधित व्यक्ति सक्षम मनाची आहे, अशी डॉक्टरांकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
२) इच्छापत्र करणारी व्यक्ति कायद्याने सज्ञान (वयाची १८ वर्षं पूर्ण केलेली) असणे आवश्यक आहे.
३) शेवटी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तिच्या नावाने मालमत्ता असणे आवश्यक आहे. स्वकष्टार्जित; तसेच हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेमधील आपला हिस्सा यांचाच इच्छापत्रात समावेश करता येतो.
इच्छापत्र करण्यासाठी व्यक्ति कायद्याने सज्ञान असावी, एवढीच आवश्यकता आहे. बाकी इच्छापत्र कधी करावे, हे प्रत्येक व्यक्तिच्या गरजेनुसार ठरते. इच्छापत्र करताना आपली स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, शारिरीक परिस्थिती, जबाबदारी आणि गरज या बाबीचा विचार करून ते लवकरात लवकर करावे.
कोणत्या बाबी समाविष्ट कराव्यात?
या आधी नमूद केल्याप्रमाणे, एखादी व्यक्ति त्याची स्वकष्टार्जित आणि वैध मालमत्ता; तसेच हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेतील त्याचा वाटा इच्छापत्राने दुसऱ्यास देऊ शकते. इच्छापत्र करताना त्यावेळी असलेली स्थावर (IMMOVABLE) आणि जंगम (MOVABLE) मालमत्ता समाविष्ट करावी. स्थावर मालमत्तेमध्ये घर, शेतजमीन, भूखंड आदी समाविष्ट होईल, तर जंगम मालमत्तेमध्ये बँकातील ठेवी, दागदागिने, कंपन्यांमधील भाग भांडवल (शेअर बाजारात नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत), रोख रक्कम, बँकेच्या खात्यातील शिल्लक रक्कम, वाहने यांचा समावेश होईल. इच्छापत्रात आपल्याकडे असलेले हक्कसुद्धा एखाद्या लाभार्थीच्या नावाने करता येतात.
उदाहरणार्थ, ‘क्ष’ ही व्यक्ति धरणग्रस्त आहे, त्यांना सरकारकडून नुकसानभरपाई म्हणून काही एकर शेतजमीन मिळण्याचा हक्क आहे, तर असा हक्क ‘क्ष’ आपल्या ठराविक लाभार्थीच्या नावाने प्रदान करू शकतो. आपण अजून एका उदाहरणाचा विचार करू. ‘क्ष’ या व्यक्तिला वडिलोपार्जित संपत्तीत काही वाटा मागण्याचा हक्क आहे, असा हक्क ‘क्ष’ आपल्या ठराविक लाभार्थीला प्रदान करू शकतो. या हक्कासंदर्भात काही प्रकरण कोर्ट-कचेरीमध्ये प्रलंबित असल्यास तो दावा पुढे सुरु ठेवण्याचा किंवा नव्याने दावा दाखल करण्याचा हक्कसुद्धा ठराविक लाभार्थीला प्रदान करता येतो. स्वामित्व हक्क, व्यापार चिन्ह, भागीदारीतील हक्कसुद्धा ठराविक लाभार्थीला प्रदान करता येतात.
संपत्तीचे वाटप कोणाला करता येते ?
इच्छापत्र करून संपत्तीचे वाटप कोणाला व किती प्रमाणात करावे, हे ठरविण्याचा पूर्ण हक्क ते जारी करणाऱ्याला आहे. असे वाटप करताना लाभार्थी हा कायदेशीर व लगतचा (‘अ’ वर्ग) वारस असलाच पाहिजे, असे बंधन नाही. मालमत्ता नातेवाईक, मित्र-मैत्रीण, कर्मचारी, शेजारी, अगदी एखाद्या संस्थेला सुद्धा देता येते. काही वेळा अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते, की इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तिच्या आधी लाभार्थीचे निधन झाले. अशा वेळी इच्छापत्रात बदल करणे किंवा पुरवणी इच्छापत्र करावे लागू शकते. पण इच्छापत्र करतानाच प्रत्येक लाभार्थीच्या पुढे (संबंधित लाभार्थीचे माझ्या आधी निधन झाल्यास त्याचा वाट्याला येणारी संपत्ती ही **** यांना जाईल) अशी तरतूद केल्यास पुढचे सोपस्कार टाळता येतात.
काही वेळा इच्छापत्र जारी करणाऱ्या व्यक्तिची काही देणी असू शकतात. अशा वेळी एखाद्या लाभार्थ्याला मालमत्ता देताना अशी देणी चुकती करण्याची अट घालता येते. म्हणजेच मिळणाऱ्या मालमत्तेबरोबर त्यावर असणारे बोजेसुद्धा लाभार्थीला मिळतात. परंतु लाभार्थी अशी मालमत्ता आणि त्यावरील बोजे नाकारू शकतो.
अनेक वेळा पती आणि पत्नी यांची स्वतंत्र मालमत्ता असू शकते, त्यांना ती आपल्या जोडीदाराला द्यायची असते. परंतु आपला अंतकाळ कोणाला कळतो? अशा परिस्थितीमध्ये परस्परावलंबी इच्छापत्र करता येते. दोघांपैकी ज्याचे आधी निधन होईल, त्याची संपत्ती जो जीवित असेल, त्याच्या नावाने हस्तांतरित करता येते. दोघांच्याही मृत्यूनंतर मालमत्तेचे वाटप कोणाला व किती प्रमाणात करावे, हेही याच इच्छापत्रात नमूद करता येते.
काही परिस्थितीमध्ये जेव्हा दोन व्यक्ती एकत्रितपणे इच्छापत्र जारी करतात, त्याला संयुक्त इच्छापत्र म्हणतात. असे इच्छापत्र जारी करणारी व्यक्ति त्यांच्या इच्छेनुसार लाभार्थी ठरवू शकतात. ज्या व्यक्तिचे निधन होईल, त्यांच्या इच्छेनुसार मालमत्तेचे वाटप त्या त्या लाभार्थीला केले जाते. हयात असलेल्या व्यक्तिशी संबंधित इच्छापत्रातील तरतुदी जशा आहेत, तशाच लागू राहतात. इच्छापत्राप्रमाणे जर नातेवाईकांशिवाय इतर त्रयस्थ व्यक्ति किंवा संस्था यांना मालमत्तेचे वाटप झाले, तर त्यांना ते करपात्र उत्पन्न समजले जाते.
इच्छापत्र कसे करावे?
इच्छापत्र स्टँप पेपरवरच करावे लागते, असे कायद्यात कोठेही लिहिलेले नाही. साध्या कागदावर केले तरी चालते. असे इच्छापत्र कायदेशीर आणि पूर्णपणे वैध असते. इच्छापत्र लिहिण्यासाठी जो कागद वापरला जाईल, तो सहज न फाटणारा व जाड असावा; जेणेकरून शाईचे डाग मागच्या बाजूला उमटणार नाहीत. शक्यतो काळी शाई वापरावी, म्हणजे त्याच्या प्रती काढताना स्पष्ट येतील. इच्छापत्र कागदाच्या दोन्ही बाजूस लिहावे, जेणेकरून कोणालाही त्यात काही मजकूर लिहिता येणार नाही. जर पाठपोट लिहिणे शक्य नसेल, तर ‘हे पान जाणूनबुजून कोरे सोडले आहे’ असे कोऱ्या पानावर लिहून ठेवावे. इच्छापत्र ज्या कागदावर लिहायचे आहे, त्या कागदाला चारही बाजूंनी पुरेशी मोकळी जागा (समास) सोडावी; जेणेकरून ते जतन करताना छिद्र पाडल्यास किंवा टाचणी लावल्यास मजकूर जाणार नाही. इच्छापत्राच्या प्रत्येक पानावर क्रमांक लिहावा, तसेच प्रत्येक पानावर जारी करणाऱ्याने तारखेसह स्वाक्षरी करावी. इच्छापत्राच्या दोन पानांमध्ये पातळ कागद (बटर पेपर) लावावा.
कोणती विशेष काळजी घ्यावी?
इच्छापत्राला प्रस्तावना असावी, त्यामध्ये ते जारी करणाऱ्याने आपला हेतू स्पष्ट करावा. आपली पूर्ण ओळख (सरकारी व इतर ओळखपत्राच्या पूर्ण क्रमांकासह) नमूद करावी. यामुळे नामसाधमर्या असले तरी ओळख पटविण्यासंदर्भात वाद निर्माण होणार नाहीत. इच्छापत्रात स्थावर मालमत्तेचा समावेश करताना आपणाकडे जी मालमत्ता आहे, तिची पूर्णपणे आणि निश्चित ओळख होईल, असे पत्ते देणे आवश्यक आहे. सोबत त्या मालमत्तांच्या मालकीचे पुरावे जसे ७/१२ चा उतारा, घरपट्टीची पावती, सिटी सर्व्हेचा उतारा, भोगवटा दाखला, वीज बील, पाणीपट्टीची पावती आदी जोडणे आवश्यक आहे. असे पुरावे नजीकच्या तारखेचे असावेत. इच्छापत्र जारी करण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांपेक्षा जुने नसावेत.
जंगम मालमत्तेच्या बाबतीत बँका अथवा कंपन्याची नावे, ठेवीचे क्रमांक व रक्कम, समभाग प्रमाणपत्रे, त्यांचे क्रमांक, भागांची संख्या नमूद करावी. सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंचे वर्णन, वजन, काही वैशिष्ट्ये असतील, तर ती सुद्धा नमूद करावीत. वाहनाच्या बाबतीत त्यांचे तपशीलवार वर्णन, नोंदणी क्रमांक, चासिस नंबर नमूद करावेत. इच्छापत्रासोबत स्थावर व जंगम मालमत्तांचे छायाचित्र, छायाप्रत जोडल्यास अधिक श्रेयस्कर होईल व वाद निर्माण होण्याचे प्रसंग टाळता येतील. मालमत्तेच्या प्रकारानुसार त्यांची अनुक्रमांकासह परिशिष्टे जोडावीत. अशा परिशिष्टावर ते इच्छापत्राचे अविभाज्य भाग असल्याचे नमूद करावे. इच्छापत्राच्या प्रस्तावनेतच किती आणि कोणती परिशिष्ट आहेत, ते नमूद करावे.
इच्छापत्र कोणत्या भाषेत असावे याचे कोणतेच बंधन नाही. पण शक्यतो ते करताना आपल्या; तसेच लाभार्थींच्या मातृभाषेचा वापर करावा. केलेल्या इच्छापत्राची इंग्रजी प्रतसुद्धा करता येईल, परंतु असे करताना कोठेही मूळ इच्छापत्रात नमूद केलेल्या मजकुरापेक्षा वेगळा आणि विसंगत अर्थ प्राप्त होईल, असे प्रतिपादन नसावे. मूळ इच्छापत्रापेक्षा वेगळ्या भाषेतही ते जारी केल्यास कोणते इच्छापत्र ग्राहय धरावे, याचा स्पष्ट उल्लेख प्रस्तावनेत करणे आवशक आहे.
इच्छापत्र हस्तलिखित, टंकलिखित किंवा संगणकावर केलेले असले तरी चालते. हस्तलिखित असल्यास अक्षर सुवाच्च, सुटसुटीत असावे, कोठेही खाडाखोड नसावी. इच्छापत्रातील भाषा सोपी, अर्थपूर्ण असावी, अलंकारिक भाषेचा अजिबात वापर करू नये. क्लिष्ट, अवजड शब्द आणि संज्ञा यांचा वापर टाळावा. द्वैअर्थी आणि संभ्रम निर्माण करणारे शब्द आणि संज्ञा वापरू नये. कोणताही मोघम तपशील लिहीण्याचे टाळावे. दोन ओळीत पुरेसे अंतर असावे, जेणेकरून मध्ये कोणालाही काही लिहिता येणार नाही. एखाद्या मालमत्तेसाठी एखादी विशेष संज्ञा वापरणे आवशक असल्यास, तीच संज्ञा संपूर्ण इच्छापत्रात वापरावी. इच्छापत्रातील भाषा अशी हवी, की त्यामधून ते जारी करणाऱ्याच्या अपेक्षा आणि इच्छा स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे संबंधितांना कळतील.
याआधी नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही सक्षम आणि सज्ञान व्यक्तीला इच्छापत्रा करता येते. त्यामुळे ते जारी करताना सोबत त्यावेळचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन, ते सोबत जोडणे श्रेयस्कर होईल. इच्छापत्र करताना किमान दोन त्रयस्थ (ओळखीचे; परंतु लाभार्थी नसलेले) साक्षीदार असावेत. इच्छापत्रासोबत एक परिशिष्ट जोडून त्यामध्ये इच्छापत्र जारी करणारी व्यक्ती, लाभार्थी, डॉक्टर, साक्षीदार यांची पूर्ण नावे, ओळखपत्राचे क्रमांक, त्यांचे संपर्क क्रमांक नमूद करावेत, सोबत त्यांची नजीकच्या काळातील छायाचित्रे जोडावीत.
इतरांकडून त्यात कोणताही बदल करणे शक्य होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इच्छापत्र जारी करणाऱ्याने इच्छापत्राच्या शेवटी एक सत्यवचन लिहिणे जरुरी आहे. ते या प्रमाणे- ‘‘मी हे इच्छापत्र पूर्णपणे शुद्धीत आणि निरोगी असताना जारी केले आहे. ते जारी करताना किंवा त्यातील संपत्ती वाटपाच्या तरतुदी ठरवताना माझ्या मनावर कोणतेही दडपण आणि कोणाचाही दबाव नाही.’’ इच्छापत्र जारी करणाऱ्या व्यक्तीला जर लिहिता-वाचता येत नसेल, तर ते इच्छापत्र त्याने कोणाकडून लिहून घेतले आहे, ते नमूद करावे. तसेच इच्छापत्र पूर्ण ऐकून, ते आपल्या इच्छेप्रमाणे जारी झाले असल्याचे नमूद करावे.
इच्छापत्राप्रमाणे संपत्तीचे वाटप कसे होईल?
आपण जारी केलेल्या इच्छापत्राप्रमाणे संपत्तीचे वाटप करण्यासाठी एखाद्या व्यवस्थापकांची नियुक्ती करता येते. या कामी एखादा जवळचा नातेवाईक, मित्र-मैत्रीण, एखादी विश्वासू व्यक्ती, फॅमिली डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांची नियुक्ती करता येते. परंतु अशी व्यक्ती ही इच्छापत्राची लाभार्थी नसावी. अशा व्यवस्थापकांना मानधन देण्याचीसुद्धा तरतूद इच्छापत्रात करता येते. आजकाल काही बँका, खासगी संस्था; तसेच विश्वस्त संस्था सुद्धा अशा प्रकारची सेवा सशुल्क देतात. इच्छापत्राच्या व्यवस्थापकाने संबंधित इच्छापत्राची किंवा/आणि त्यातील तरतुदीनुसार कारवाई न केल्यास त्यावर विश्वासघाताचा दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करता येतो.
इच्छापत्राची नोंदणी करावी का?
भारतीय वारसा कायद्याप्रमाणे इच्छापत्र कायदेशीरपणे वैध होण्यासाठी त्याची नोंदणी करणे आवश्यक नाही. परंतु माझ्या मते, ते जरुरी आणि व्यवहार्य आहे. इच्छापत्राची नोंदणी ही सकृतदर्शनी त्याच्या ग्राह्यतेचा पुरावा आहे. (संदर्भ- Guru Dutt Singh vs. Durga Devi. AIR १९६६ J&K, ७५.). तसेच नोंदणी निबंधकांकडे कोणताही दस्त नोंद करताना संबंधित व्यक्तीच्या खरेपणाची खातरजमा केली जाते. त्यामुळे इच्छापत्रावरील स्वाक्षरी खरोखरच ते जारी करणाऱ्याची आहे किंवा नाही, या शंकेला वाव राहात नाही.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणी निबंधक तो दस्त शासकीय मुद्रागारात पाठवितात, तेथे तो जतन केला जातो. यामुळे आपोआपच त्यात कोणताही फेरबदल करणे कोणालाही शक्य होत नाही. अशा प्रकारच्या नोंदणीसाठी नाममात्र शुल्क लागते. तथापि, फक्त इच्छापत्र नोंदीत नाही म्हणून त्याच्या खरेपणाबद्दल शंका उपस्थित करणे योग्य नाही. (संदर्भ- Ishwardeo Narain Singh vs. Kamata Devi AIR १९५४ SC २८०). मूळ इच्छापत्राची जर नोंदणी केली असेल, तर पुढील प्रत्येक बदलाची नोंदणी करावी लागते.
इच्छापत्र रद्द करता येते का?
एकदा केलेले इच्छापत्र ते जारी करणाऱ्याला कधीही रद्द करता येते. आता ते रद्द कसे करता येते, ते पाहू.
१) केलेले मूळ इच्छापत्र आणि त्याच्या सर्व प्रती जाळून टाकणे.
२) केलेल्या मूळ इच्छापत्रावर आणि त्याच्या सर्व प्रतीवर (आणि त्यांच्या प्रत्येक पानावर) ‘हे इच्छापत्र रद्द केले आहे,’ असे नमूद करून तारखेसह स्वाक्षरी करणे.
३) केलेले मूळ इच्छापत्र रद्द करण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे, नवे इच्छापत्र जारी करणे. मात्र, हे करताना प्रस्तावनेत ‘‘मी या आधी (तारीख/महिना/वर्ष) रोजी केलेले इच्छापत्र पूर्णपणे रद्द केले आहे व त्याऐवजी आज रोजी (तारीख/ महिना/ वर्ष) हे इच्छापत्र जारी करत आहे,’’ असे नमूद करावे.
४) याशिवाय इच्छापत्र जारी करणाऱ्याला प्रमाणित आवेदन (Attested declaration) करून ते रद्द करता येते.
हिंदू, शीख, बौद्ध, आणि जैन धर्मियांव्यतिरिक्त इतर धर्मियांमध्ये विवाहाआधी केलेले इच्छापत्र विवाह झाल्यावर आपोआप रद्दबातल ठरते. परंतु, शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे या विषयी जास्त उहापोह करता येणार नाही.
तरतुदीमध्ये बदल शक्य आहे का?
इच्छापत्र जारी करणारी व्यक्ती त्याच्या हयातीत त्याने जारी केलेल्या इच्छापत्रात वेळोवेळी बदल करू शकते. मृत्यूच्या तारखेच्या लगतच्या तारखेचे इच्छापत्र वैध असते. मूळ इच्छापत्राला गरजेनुसार पुरवणी इच्छापत्रही जारी करता येते. परंतु, असे करणे शक्यतोवर टाळावे. पुरवणी इच्छापत्र करताना मूळ इच्छापत्रातील कोणत्या कलमात बदल केला आहे, ते स्पष्ट करावे व इतर कलमांत कोणताही बदल नाही, हेही स्पष्ट करावे. पुरवणी इच्छापत्र हे मूळ इच्छापत्राचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद करावे. तथापि, इच्छापत्र एकदाच करावे व त्यात बदल टाळावा. इच्छापत्र जारी केल्यानंतर संचित होणाऱ्या स्थावर; तसेच जंगम मालमत्तेची वाटणी कशी करावी, याचा आधीच विचार करून ठेवावा व त्याप्रमाणे इच्छापत्रात योग्य प्रकारे ते नमूद करावे.
तरतुदींची माहिती कोणाला द्यावी?
इच्छापत्रातील तरतुदींची माहिती कोणाला द्यावी या संबंधी कायद्यात कोणतीही तरतूद नाही. माझ्या मते, अशा तरतुदीची माहिती कोणालाही देऊ नये, लाभार्थींना तर अजिबात देऊ नये. इच्छापत्रातील तरतुदीमुळे एखादा लाभार्थीना नाराज झाला, तर ते जारी करणाऱ्याला नाहक रोषाला सामोरे जावे लागेल. प्रसंगी शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. अगदीच आवश्यक असेल, तर अशा तरतुदीची माहिती जवळच्या नातेवाईकाला, एखाद्या विश्वासू व्यक्तीला द्यावी. परंतु, अशी नातेवाईक किवा विश्वासू व्यक्ती ही इच्छापत्राची लाभार्थी नसावी, याची काळजी घेणे इष्ट.
या आधी नमूद केल्याप्रमाणे मृत्यूपत्र वा इच्छापत्र कसे असावे, यासंदर्भात कायद्यामध्ये कोणताही आकृतिबंध नाही, त्यामुळे ते जारी करताना खूप काळजी घ्यावी लागते. याची मांडणी कशी करावी, याबद्दलही दुमत असू शकते. मृत्यूपत्र वा इच्छापत्र हा विषयच मुळात खूप विस्तृत आहे, ते लिहिण्याची प्रक्रिया देखील क्लिष्ट व गुंतागुंतीची असू शकते. भविष्यातील वाद व अडचणी टाळण्यासाठी ते निष्णात व तज्ज्ञ सल्लागाराकडून करून घेणे इष्ट होय.
इच्छापत्र कोठे जतन करून ठेवावे?
इच्छापत्राची नोंदणी केल्यास त्याची एक प्रत सरकारकडे सुरक्षित राहते. आवश्यक वाटल्यास इच्छापत्राच्या प्रती जवळचे नातेवाईक, विश्वासू व्यक्ती; तसेच इच्छापत्र व्यवस्थापकांकडे असावी. इच्छापत्राची एक प्रत आपल्या बँक लॉकरमध्ये ठेवावी; कारण आपला लॉकर आपल्या संमतीशिवाय दुसऱ्या कोणालाही वापरता येत नाही. जर एकापेक्षा जास्त ठिकाणी प्रती ठेवल्या तर काही विशेष खबरदारी घ्यावी लागेल. मृत्यूपश्चात इच्छापत्राचे वाचन करताना सर्व प्रती एकत्र करून, सर्व एकमेकांशी जुळतात ना, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. इच्छापत्र जारी करणाऱ्याने त्यासोबत एक पत्र वेगळे ठेऊन हे बंधन घालावे. मूळ इच्छापत्राच्या प्रस्तावनेत त्याच्या प्रती कोठे कोठे ठेवलेल्या आहेत, हे नमूद करणे उत्तम.
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)