Financial Planning- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जफेडीचे पाच मार्ग}

आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

संजय अगरवाल

कर्ज ही देखील एक जबाबदारी आहे. तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे आणि त्या पेमेंटचा तुमच्या बचत आणि गुंतवणुकीच्या मार्गावर परिणाम होणार नाही, याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे..जाणून घ्या कर्जफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग....

एक व्यक्ती म्हणून तुम्ही स्वाभाविकपणे अनेक स्वप्ने बघत असता. तुमच्या अनेक आशा-आकांक्षा असतात. त्यासाठी तुम्ही तुमचे पैसे वाचवत असता आणि गुंतवणूक करत असता. दुर्दैवाने, तुमची बचत आणि गुंतवणूक नेहमी पुरेशी पडू शकत नाही आणि इथेच तुम्ही कर्ज मिळवण्याचा पर्याय निवडता. कर्ज तुम्हाला तुमच्या आर्थिक क्षमता आणि तुमचे ध्येय यातील अंतर भरून काढण्यात मदत करू शकते. (Smart ways to get rid of your loans)

कर्ज एक मजबूत पूल म्हणून काम करत असताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, की कर्ज ही देखील एक जबाबदारी आहे. तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे आणि त्या पेमेंटचा तुमच्या बचत आणि गुंतवणुकीच्या मार्गावर परिणाम होणार नाही, याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या कर्जाच्या परतफेडीचे नियोजन करण्याचे पाच स्मार्ट मार्ग आहेत.

१) तुमचे कर्ज जाणून घ्या: ही एक साधी सोपी तीन पायऱ्यांची प्रक्रिया आहे. प्रथम, तुम्ही तुमच्या सर्व मासिक दायित्वांचे आणि खर्चाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. यामध्ये नियमित कर्जदेयके आणि तुम्हाला कराव्या लागणाऱ्या ऐच्छिक आणि एकूणच खर्चाचा समावेश आहे. दुसरे म्हणजे तुमची कर्जाची (Loans) कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा, कर्जाच्या किंमतीबद्दल स्वत:ला अवगत करा आणि तुम्हाला कोणत्याही छुप्या खर्चाबद्दल, विलंबित पेमेंटचे परिणाम आणि डिफॉल्ट आदींबद्दल माहिती आहे, याची खात्री करा. तिसरे म्हणजे तुम्ही कर्ज का घेत आहात, हे जाणून घ्या आणि तुमच्या कुटुंबाला त्याबद्दल माहिती द्या. कारण कर्ज ही सामूहिक जबाबदारी आहे, जी संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकते.

२) बजेट तयार करा आणि त्यावर ठाम राहा: पैसा (Money)आणि वित्त यांचा समावेश असलेल्या कोणत्याही कामात पहिली पायरी म्हणजे नेहमी बजेट तयार करणे. बजेट तुम्हाला विशिष्ट क्षेत्रे किंवा बाह्यखर्च आणि जमा होत असलेली रक्कम ओळखण्यात मदत करू शकते आणि त्यानुसार तुम्ही तुमचे सर्व बाह्यखर्च विनाअडथळा पूर्ण करू शकता, याची खात्री करता येते. त्यामुळे कर्ज घेणे आणि त्याची पूर्तता करता येते की नाही, हे पाहणे म्हणजेच हा एक व्यवहार्य पर्याय आहे की नाही हे ठरवण्यासाठी देखील आपल्याला बजेटची मदत होईल. गरज आणि महत्त्वावर आधारित तुमच्या गरजांना प्राधान्य द्या आणि ईएमआयवर अतिखरेदी टाळा. नेहमी लक्षात ठेवा, की तुम्ही आरामात फेडू शकाल अशीच कर्जे घ्या.

३) उच्च किमतीचे कर्ज त्वरित फेडा: जरी कर्ज तुम्हाला मदत करू शकत असले तरीही तुमच्यासाठी शक्य तितक्या लवकर कर्जाची परतफेड करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. त्याही पुढे जाऊन जर तुमच्यावर एकापेक्षा जास्त कर्जे असतील, तर तुम्ही जास्त किमतीची कर्जे लवकर फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि उरलेले कर्ज एका कर्जात अनुकूल परतफेडीच्या अटींसह एकत्र केले पाहिजे.

४) तुमचे ईएमआय चालू ठेवा: दंड आकारण्याव्यतिरिक्त ईएमआय पेमेंट न होणे किंवा कर्ज चुकवणे यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर मोठा परिणाम होऊ शकतो. येथे गृहितक असे आहे, की जर तुम्ही तुमचे ईएमआय कार्यक्षमतेने पूर्ण करू शकत नसाल, तर तुमच्या परतफेड करण्याच्या क्षमतेला बाधा येते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला स्पर्धात्मक अशा चांगल्या दराने कर्ज मिळणे कठीण होईल. त्यामुळे तुम्ही नियमित पेमेंट करत आहात ना, याची खात्री करा आणि सुरक्षित, तरल साधनांमध्ये सहा महिन्यांइतक्या ‘ईएमआय’ची रक्कम बाजूला ठेवा.

५) तज्ज्ञांची मदत घ्या: जर तुम्हाला तुमचे कर्ज फेडण्यात काही आव्हाने येत असतील, तर तुम्ही व्यावसायिक मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. कर्ज सल्लागार तुम्हाला परतफेड पर्यायांमध्ये मदत करतील. ते तुमच्या वतीने वित्तपुरवठादारांशी वाटाघाटी देखील करू शकतात. शिवाय व्याजदर कमी करण्यात आणि तुमच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात मदत करू शकतात. तात्पुरत्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला ‘सॉफ्ट लोन’चा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

मुख्य गोष्ट अशी आहे, की कर्ज घेणे ही वाईट गोष्ट नाही. परंतु, एकदा कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्याबाबत तुम्ही शिस्तबद्ध असले पाहिजे आणि कमीत कमी उच्च किमतीच्या कर्जाची लवकरात लवकर परतफेड करण्याची योजना तयार केली पाहिजे. यामुळे अनेकदा तुमच्यावर कर्जासोबत असलेले आर्थिक, तसेच भावनिक ओझे कमी व्हायला मदत होईल.

(लेखक ‘एडलवाईज एआरसी’च्या रिटेल ॲसेटस बिझनेसचे प्रमुख आहेत.)